Mumbai Metro : एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबई मेट्रो प्रकल्पांना वेग

मेट्रो ६ आणि २बी वर महत्त्वपूर्ण स्टील स्पॅन उभारणीचे टप्पे यशस्वी

Total Views |
Mumbai Metro Project
 
मुंबई : (Mumbai Metro) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शहरातील मेट्रो लाईन ६ आणि मेट्रो लाईन २बी या दोन महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांमध्ये अभियांत्रिकीच्या दृष्टीने अत्यंत कठीण टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करत प्रगतीला गती दिली आहे. कार्यरत रेल्वे मार्गांवर कोणताही व्यत्यय न आणता स्टील कॉम्पोझिट स्पॅन उभारणीची ही कामगिरी मुंबईतील पायाभूत सुविधांच्या उभारणीत महत्त्वाची मानली जात आहे.
 
मेट्रो लाईन ६ प्रकल्पांतर्गत जोगेश्वरी परिसरात पश्चिम रेल्वे मार्गावर पियर उभारणी आणि ४२ मीटर लांबीचा, सुमारे १६८.९६ मेट्रिक टन वजनाचा स्टील कॉम्पोझिट स्पॅन यशस्वीरीत्या स्थापित करण्यात आला. ५०० आणि ६०० टन क्षमतेच्या हायड्रॉलिक क्रेन्सच्या साहाय्याने सुमारे १०–१२ मीटर उंचीवर हा स्पॅन बसवण्यात आला. विशेष म्हणजे, संपूर्ण प्रक्रिया नियोजित रेल्वे ब्लॉकमध्ये आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण झाली.(Mumbai Metro)
 
हेही वाचा : Sanskar Shibir, : सोलापूरातील डब्ल्यू.आय.टी. जैन टेम्पल येथे श्री जिनधर्म संस्कार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट
 
दरम्यान, मेट्रो लाईन २बी प्रकल्पांतर्गत कुर्ला आणि टिळक नगर स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला. ४१.५ मीटर लांबीचा, ११ मीटर रुंदीचा आणि सुमारे १७८ मेट्रिक टन वजनाचा स्टील स्पॅन यशस्वीरित्या उभारण्यात आला. हैदराबाद येथे तयार करण्यात आलेला हा कॉम्पोझिट स्ट्रक्चर मुंबईत आणून साइटवर एकत्रित करून बसवण्यात आला. दोन ५०० टन क्षमतेच्या क्रेन्सच्या टँडम लिफ्टिंगद्वारे आणि अतिरिक्त स्टँडबाय क्रेनच्या सहाय्याने ही प्रक्रिया अत्यंत अचूकतेने पार पडली.(Mumbai Metro)
 
मेट्रो लाईन (Mumbai Metro) ६ ही स्वामी समर्थ नगर (लोखंडवाला) ते विक्रोळी दरम्यान धावणारी सुमारे १४.५ किमी लांबीची पूर्व–पश्चिम कनेक्टिव्हिटी देणारी महत्त्वाची मार्गिका असून तिचे सुमारे ८७ टक्के सिव्हिल काम पूर्ण झाले आहे. दुसरीकडे, मेट्रो लाईन २बी ही डीएन नगर ते चेंबूर दरम्यानची महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. (Mumbai Metro)
 
 
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.