अमरावती शहरातून मलबारी शिळकरी कस्तुराची प्रथमच नोंद

    27-Apr-2026
Total Views |
malabar whistling thrush



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
अमरावती शहरातून प्रथमच मलबारी शिळकरी कस्तुर या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे (malabar whistling thrush) . हा पक्षी प्रामुख्याने पश्चिम घाटाचा रहिवासी असल्याने अमरावती शहरातून त्यांची नोंद होणे, तशी दुर्मीळ घटना आहे. (malabar whistling thrush)
 
 
 
मलबारी शिळकरी कस्तुर हा प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळणारा पक्षी असला तरी, पूर्व घाट आणि मध्य भारतामधून त्याच्या नोंदी आहेत. मेळघाटातील वर्षभर पाणी असणाऱ्या दऱ्या खोऱ्यांमध्ये हा पक्षी आढळतो. सुमधुर शीळ घालण्यासाठी हा पक्षी ओळखला जातो. या पक्ष्याचे दर्शन आता अमरावती शहरातील वडाळी वन परिसरात झाले आहे. वन्यजीव छायाचित्रकार अमेय नामदेव ठाकरे, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक डॉ. स्वप्निल सोनोने व वन्यजीव अभ्यासक शंतनु पाटील यांनी या पक्ष्याला कामेराबद्ध केले आहे.याविषयी अमेय नामदेव ठाकरे यांनी सांगितले की, नेहमी प्रमाणे जंगलामध्ये भ्रमण करत असताना एक वेगळा आवाज जंगलातून आमच्या कानावर पडत होता. परंतु हा आवाज अमरावती सारख्या ठिकाणी येणे अशक्य असल्याने आम्ही सर्वप्रथम दुर्लक्ष केले. परंतु नंतर आवाज जवळ येत आहे असे वाटल्यावर जेव्हा लक्ष केंद्रित केले तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. कारण मलबारी शिळकरी कस्तुर चक्क आमच्या डोळ्यासमोर येऊन बसला होता.
 
 
मलबारी शिळकरी कस्तुर या पक्ष्याचा अधिवास हा घनदाट जंगल असतो. हा पक्षी अमरावती शहरात प्रथमच आढळून आला आहे. हा पक्ष्यामधील नर आणि मादी सारखेच दिसतात. पावसाळ्यात त्यांची वीण होते. हा पक्षी अमरावती जिल्ह्याचा विचार केला असता मेळघाटात जेथे वर्षभर पाणी असते व गर्द हिरवाई असते अशा ठिकाणी प्रामुख्याने आढळून येतो. आता अमरावती शहराच्या परिसरात हा पक्षी आढळल्याने अमरावतीच्या पक्षी जैवविविधतेत एक महत्वपूर्ण नोंद झाली आहे.