मातीतलं सोनं

    27-Apr-2026   
Total Views |

एखाद्या राष्ट्राला जर प्रगतीची नवनवीन शिखरं गाठायची असतील, तर मानवी संसाधनांचा विकास आणि सुशासन या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक. 21वे शतक हे परिवर्तनाचे शतक असेल, याचा अंदाज इतिहासकारांनी आधीच वर्तवला होता. मात्र, या पलीकडे जाऊन या परिवर्तनाची गती आणि सभोवताली सुरू असलेल्या भूराजकीय संघर्षातून एक नवा कालखंड आकाराला येत आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अमेरिका, रशिया आदी महासत्तांच्या रांगेतील तितकाच परखड आणि चिवट प्रतिस्पर्धी म्हणजे चीन. तंत्रज्ञानाच्या जोरावर, जागतिक राजकारणात स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारा हा महाकाय देश, सध्या चर्चेत आहे तो सुरू असलेल्या नवनवीन प्रयोगांमुळे. चीनचे कारनामे लोकांच्या काळजात धडकी भरवणारे आहेतच; मात्र त्याचबरोबर एका नव्या जगाला साद घालणारेसुद्धा आहेत.

चीनमधील शापोटौ वाळवंट प्रायोगिक संशोधन केंद्रातील संशोधकांनी, वाळवंटीकरण थांबवण्यासाठी एक आगळा-वेगळा प्रयोग केला होता. यामुळे भविष्यात जैविकशास्त्रामध्ये क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनमधील वैज्ञानिकांनी केवळ दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये, नापीक वाळूचे सुपीक जमिनीत रूपांतर करण्याची एक क्रांतिकारक पद्धत विकसित केली. सायनोबॅक्टेरिया, या विशेष प्रकारच्या प्रकाशसंलेषण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा वापर करून, संशोधकांनी जैविक मृदा कवचाची निर्मिती केली. हे कवच सतत सरकणाऱ्या वाळूच्या ढिगाऱ्यांच्या पृष्ठभागावर एक जिवंत थर तयार करते. जेव्हा वाळूवर हे ‌‘जैविक कवच‌’ पसरवले जाते, तेव्हा त्यातील छोटे जीवाणू नैसर्गिक डिंक तयार करतात. वाळूचे कण सुटे असल्याने, तिथे झाडे जगू शकत नाहीत. हा नैसर्गिक डिंक वाळूच्या कणांना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवतो. परिणामी, वाळूचा एक सलग थर तयार होतो, जो लवकर विखुरत नाही. हे कवच जमिनीमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरससारखी पोषक तत्त्वांचे प्रमाण वेगाने वाढवते. नैसर्गिकरित्या वाळूची माती व्हायला शेकडो वर्षे लागतात, पण या तंत्रामुळे ही प्रक्रिया अत्यल्प काळात पूर्ण होते. हे कवच वाळूची जलसंधारण क्षमताही वाढवते. यामुळे कडक उन्हातही जमिनीतील ओलावा टिकून राहतो. हे तंत्रज्ञान वाळूवर एका ‌‘जिवंत चादरी‌’सारखे काम करते, जी वाळूला जमिनीशी घट्ट पकडून ठेवते, तिला खत देते आणि पाणी साठवूनही ठेवते. यामुळे वाळवंटातही झाडे लावणे स्वस्त आणि सोपे होते. ही नावीन्यपूर्ण जैवतंत्रज्ञानविषयक रणनीती ऱ्हास झालेल्या परिसंस्था पुनर्संचयित करण्यासाठी आणि जागतिक अन्नसुरक्षेच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी, एक परिवर्तनकारी उपाय ठरणार आहे.

‌‘सायनोबॅक्टेरिया‌’ हे असे सूक्ष्मजीव प्रयोगशाळेत वाढवता येतात आणि वाळवंटातील परिसंस्था सुधारण्यासाठी वाळवंटात सोडले जाऊ शकतात. हे जीव अत्यंत कोरडेपणा सहन करू शकतात; जेव्हा पाणी उपलब्ध असते, तेव्हा ते वेगाने वाढतात आणि एक कवच तयार करतात. जे कवच वाऱ्यामुळे होणाऱ्या धूपेपासून संरक्षण करते आणि झुडपे व गवताला मुळे रुजवण्यासाठी पोषक तत्त्वेही पुरवते. यामुळे वाळवंटात वनस्पती स्थापित करण्यातील मुख्य आव्हाने दूर होतात. या तंत्रज्ञानाचा वापर कोरड्या हवामानामध्ये केला जाऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

शापोटौ वाळवंट प्रायोगिक संशोधन केंद्र मागची अनेक दशकं कार्यरत आहे. त्यांनी नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या मृदाकवचाचे निरीक्षण केले आणि तोच नैसर्गिक मार्ग कृत्रिमरित्या वेगवान कसा करता येईल, यावर संशोधन केले. नैसर्गिकरित्या वाळूचे रूपांतर मातीत व्हायला 100 वर्षांहून अधिक काळ लागू शकतो. चिनी शास्त्रज्ञांनी विशेष सूक्ष्मजीव मिश्रणाचा वापर करून, ही वेळ फक्त दहा ते 16 महिन्यांवर आणली. वाळवंटीकरण, दुष्काळ, जागतिक तापमानवाढ अशा समस्यांना तोंड देणं, हे 21व्या शतकात जगणाऱ्या माणसांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. अशा वेळी सुपीक जमीन, माती या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व होणार आहे. जागतिक पातळीवर अवतरणाऱ्या समस्येशी दोन हात करून चीनसारख्या राष्ट्राने स्वतःपुरते का होईना, परंतु उत्तर शोधले आहे. मातीतून सोनं उगवण्याची हीच कला, आता इतर देशांनीदेखील शिकण्यावाचून पर्याय नाही, असेच म्हणावे लागेल.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.