शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

Total Views |

स्वातंत्र्य, आत्मशोध आणि नात्यांच्या बळावर उभ्या राहिलेल्या एका ‌‘मुसाफिर‌’च्या निर्मात्या शर्मिष्ठा चक्रवर्ती हिच्या स्वच्छंदी जीवनप्रवासाविषयी...

मुंबईसारख्या धावत्या शहरात, आजूबाजूच्या गजबजाटात, स्वतःसाठी वेळ काढणे हीच एक मोठी ‌‘लक्झरी‌’ मानली जाते. पण, काही लोक असतात, फक्त वेळ काढत नाहीत, तर स्वतःचे एक वेगळ जगही तयार करतात. शर्मिष्ठा चक्रवर्ती ही अशीच एक स्त्री. जिने आपले कॉर्पोरेट आयुष्य आणि बाईकिंगचा मुक्त प्रवास, या आयुष्याच्या दोन टोकांमध्ये एक अद्भुत समतोल साधला आहे. शर्मिष्ठाची कथा ही अशा एका स्त्रीची कथा आहे, जिने स्वतःचा मार्ग स्वतः मार्ग निवडला. एवढेच नाही, तर त्या मार्गावर चालताना, अनेकांना सोबत घेऊनच पुढे जाण्याचा निर्णयही घेतला. शिस्तबद्ध व्यावसायिकता आणि बेधडक साहस यांचा संगम असणाऱ्या शर्मिष्ठाच्या व्यक्तिमत्त्वात अनोखीच चमक जाणवते.

आठवड्याच्या सात दिवसांत शर्मिष्ठा कॉर्पोरेट कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करते. या दिवसात बैठका, डेडलाईन्स, जबाबदाऱ्या यांनीचे तिचे आयुष्य व्यापलेले असते. मात्र, शुक्रवारची संध्याकाळ शर्मिष्ठा पूर्णपणे एका नव्या रूपात दिसते. हेल्मेट घालून बाईकवर स्वार झालेली आणि रस्त्यांवर वेगाशी स्पर्धा करणारी एक ‌‘मुसाफिर‌’ हीच शर्मिष्ठाची खरी ओळख.

शर्मिष्ठा ‌‘मुसाफिर मोटारसायकल टूर्स प्रा. लि.‌’ या संस्थेची संचालिका असून, ‌‘द मुसाफिर्स‌’ या बाईकिंग समुदायाची एक प्रेरणादायी बाईक स्वारसुद्धा आहे. पण ही कहाणी एका दिवसात घडलेली नाही. 2010 मध्ये एका साध्या बाईक राईडच्या माध्यमातून शर्मिष्ठाच्या कथेची सुरुवात होते. 2010 मध्ये शर्मिष्ठा आणि तिच्या मित्राने एक छोटी बाईक रायडिंग केली. तेव्हाच ‌‘ग्रुप बाईक रायडिंग‌’ ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. जानेवारी 2011 मध्ये त्यांनी पहिली राईड आयोजित केली. यावेळी फक्त 15 बाईकस्वार सहभागी झाले होते. आज ‌‘द मुसाफिर्स‌’चे सुमारे 500 सदस्य आहेत. हा आकडा नात्यांची, विश्वासाची आणि एकत्रित प्रवासाची साक्ष असल्याचे शर्मिष्ठा सांगते.

एका बाईक राईडने शर्मिष्ठाच्या आयुष्याला दिशा दिली. शर्मिष्ठा सांगते, पहिली राईड हा स्वतःला भेटण्याचा, समृद्ध करणारा अनुभव होता. ती सांगते, “जेव्हा बाईक चालवते, तेव्हा मी स्वतःसोबत असते. त्या शांततेत मला माझे विचार ऐकू येतात. तो अनुभव ध्यानासारखा असतो. हीच भावना पुढे ‌‘द मुसाफिर्स‌’ या बाईकिंग क्लबच्या रूपात आकाराला आली.” 2010-11च्या काळात मुंबईत बाईकिंग क्लब्स होते, पण ते बाईकच्या एका विशिष्ट ब्रॅण्डभोवतीच फिरत होते. शर्मिष्ठाला बाईकपेक्षा बाईकिंगची आवड महत्त्वाची वाटत होती. म्हणूनच तिने एक असा मंच उभारला, जिथे कोणत्याही ब्रॅण्डची बाईक असो, रायडरची जिद्द आणि प्रवासाची ओढ हेच खरे निकष होते.

‌‘द मुसाफिर्स‌’ची खासियत म्हणजे, इथले वातावरण कौटुंबिक आहे. या क्लबमध्ये कोणी सीईओ असो, कोणी कर्मचारी, कोणी महागडी गाडी चालवत असो, तर कोणी साधी बाईक, इथे सगळेच समान असतात. प्रत्येकजण एकमेकांचा ‌‘मुसाफिर‌’ असतो. या समूहात सामील होताना, प्रत्येक नवीन सदस्याची मानसिकताही तपासली जाते. शर्मिष्ठासाठी ‌‘द मुसाफिर्स‌’ म्हणजे केवळ राईड नाही, तो अमूल्य वेळ आहे. एक अशी जागा जिथे लोक एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांसाठी उभे राहतात.

राईडदरम्यान काही अडचण आली, अपघात झाला, तर मदतीसाठी धावून जाणारे हात कधीच कमी पडत नाहीत. आनंदाच्या क्षण एकत्र साजरे करणं आणि कठीण काळात एकमेकांना आधार देणे, हीच ‌‘द मुसाफिर्स‌’ची ओळख असल्याचे शर्मिष्ठा सांगते.

शर्मिष्ठाच्या नेतृत्वाखाली या समूहाने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात ते हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरपर्यंत प्रवास केला आहे. लांब पल्ल्याच्या राईड्समध्ये 700-800 किमी अंतर पार करणे त्यांच्यासाठी नवीन नाही. शर्मिष्ठा सांगते, “बाईक किती मोठी आहे, यापेक्षा रायडरची मानसिकता किती कठोर आहे, हेच महत्त्वाचे असते.”

या प्रवासात शर्मिष्ठाच्या आजवरच्या अनेक आठवणी आहेत. काही आठवणी रोमांचक आहेत, तर काही आठवणी अत्यंत भावनिकही. शर्मिष्ठा सांगते, “एका रात्री एका छोट्या गावात बाईक बंद पडल्यावर, एका अनोळखी मेकॅनिकने मदतीचा हात पुढे केला. त्याने केवळ बाईक दुरुस्त करतानाच, गरम चहा आणि जेवणही दिले.”

आजतागायत शर्मिष्ठाने एक लाखांहून अधिक किमीचा प्रवास केला असून, आजही हा सिलसिला सुरूच आहे. आपले दैनंदिन कामकाज सांभाळून आपली आवड जपणारी शर्मिष्ठा, अनेक महिलांसाठी प्रेरणा देणारी ठरते. विशेष म्हणजे, शर्मिष्ठाला या प्रवासात कुटुंबीयांचीही साथ भक्कम आहे. लग्नापूर्वीच शर्मिष्ठाचा हा बाईक रायडिंगचा प्रवास सुरू झाला. ती अशा काळात प्रवास करत होती, जेव्हा ‌‘गुगल लोकेशन‌’ आणि अन्य तांत्रिक बाबी प्रचलित नव्हत्या. मात्र, तरीही कुटुंबीयांनी तिच्या या आवडीला पाठिंबा दिला. शर्मिष्ठाचा जीवनसाथीही तिला याच ‌‘मुसाफिर‌’मध्ये मिळाला. त्यामुळे तिला कधीही अडचण आली नाही.

आज शर्मिष्ठा ईशान्य भारत, भूतान आणि थायलंड अशा नव्या प्रवासांसाठी सज्ज आहे. तिच्यादृष्टीने प्रत्येक राईड ही एक नवीन कथाच आहे, एक नवीन अनुभव आहे आणि स्वतःला पुन्हा शोधण्याची एक संधी आहे. पण या सगळ्यापलीकडे, शर्मिष्ठाची खरी ताकद आहे ती इतरांना प्रेरणा देणे. शर्मिष्ठाने दाखवून दिले अहे की, स्त्रिया चौकटी मोडूनही नवीन मार्ग तयार करू शकतात. शर्मिष्ठाची कहाणी सांगते, स्वप्न पाहा, धाडस करा आणि स्वतःचा मार्ग निवडा. समाज काय म्हणेल, यापेक्षा तुमचे मन काय सांगते, ते ऐका. कारण शेवटी, प्रत्येकजण आपल्या आयुष्याचा ‌’मुसाफिर‌’ असतो. ‌’द मुसाफिर‌’चा हा प्रवास असाच सुरू राहो, यासाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या शर्मिष्ठाला अनेकानेक शुभेच्छा!


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.