काळाचा काव्यगत न्याय

    27-Apr-2026
Total Views |

अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचाराविरोधातले आंदोलन ‌‘हायजॅक‌’ करून, त्याचा फायदा स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी करणाऱ्या केजरीवाल यांना नियतीने सणसणीत चपराक लगावली आहे. चुकीच्या पद्धतीने जो पक्ष स्थापन करण्यात आला, तो आज संपण्याच्या मार्गावर आहे. काळाचा न्याय म्हणतात तो हाच!

राजकारणात एक म्हण कायम प्रचलित आहे की, तुम्ही ज्या मार्गाने सत्तेच्या शिखरावर पोहोचता, त्याच मार्गावर तुमचा अंतही दडलेला असतो. आम आदमी पक्षाच्या आणि विशेषतः अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे. एके काळी पर्यायी राजकारणाचा टेंभा मिरवत, देशातील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला शिव्याशाप देत आणि अण्णा हजारे यांच्यासारख्या निस्वार्थी समाजसेवकाच्या पाठीमागे दडून, स्वतःचा राजकीय स्वार्थ साधणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‌‘आप‌’ आज संपल्यात जमा आहे. पक्षाचे तरुण आणि अत्यंत महत्त्वाचे असे राघव चड्ढा यांनी आपल्या सात सहकारी खासदारांसह पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी, ही एका भ्रामक राजकीय प्रयोगाच्या अंताची अधिकृत घोषणा आहे.

आज आम आदमी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा असून, ज्यांनी पक्षाला रामराम ठोकला, त्यांना ‌‘गद्दार‌’ ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न ‌‘आप‌’च्या नेतृत्वाकडून होत आहे. यातच भर म्हणून, खासदार आणि भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी पक्ष सोडताच, पंजाबमधील ‌‘आप‌’ सरकारने त्यांची सुरक्षा तातडीने काढून घेतली. एकीकडे जनतेला रेवड्या वाटून स्वतःच्या कथित उदारतेचे आणि दातृत्वाचे ओंगळवाणे प्रदर्शन करणाऱ्या आम आदमी पक्षाला, एका राष्ट्रीय खेळाडूला किमान सुरक्षा देण्याइतकाही मनाचा मोठेपणा दाखवता आला नाही, हे त्यांच्या कोत्या मनोवृत्तीचेच दर्शन घडवणारे आहे.

आज ‌‘आप‌’वर ओढावलेल्या या संकटाची मुळे शोधायची असतील, तर आपल्याला एक दशक मागे जावे लागेल. 2011चे ते वर्ष, जेव्हा दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधले होते.

राळेगणसिद्धीचे अण्णा हजारे हे या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. देशातील जनता, तरुण, शेतकरी, नोकरदार वर्ग अण्णांच्या एका हाकेवर रस्त्यावर उतरला होता. सर्वांना वाटत होते की, आता देशात खऱ्या अर्थाने पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था निर्माण होईल. पण, याच आंदोलनाच्या व्यासपीठावर एक असा गट सक्रिय होता, ज्याला देशहितापेक्षा स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा अधिक खुणावत होत्या. केजरीवाल आणि त्यांच्या साथीदारांनी अतिशय शिताफीने अण्णा हजारे यांच्या लोकप्रियतेचा, त्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि जनतेच्या भावनांचा वापर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला.

अण्णा हजारे यांनी वारंवार स्पष्ट केले होते की, या आंदोलनाचा उद्देश कोणताही राजकीय पक्ष स्थापन करण्याचा नाही. परंतु, केजरीवाल यांनी अण्णांच्या या तत्त्वांना हरताळ फासला. आंदोलनाच्या राखेवर त्यांनी आम आदमी पक्ष नावाच्या राक्षसी राजकीय महत्त्वाकांक्षेची इमारत उभी केलीच. अण्णांना अंधारात ठेवून, जनतेच्या भावनांशी खेळून ज्या पक्षाचा जन्म झाला, त्या पक्षाचा पायाच फसवणूक आणि संधिसाधूपणाचा होता. ज्यांनी आपल्या राजकीय गुरूची, जन्मदात्या आंदोलनाची आणि देशातील लाखो निष्पाप नागरिकांची फसवणूक केली, त्यांच्या वाट्याला आज तोच विश्वासघात येत आहे. केजरीवालांनी राजकारणात जो स्वार्थ आणि फसवणुकीचा पायंडा पाडला, तोच आज त्यांच्याच पक्षाचा मुळासकट नायनाट करत आहे.

गेल्या काही वर्षांत ‌‘आप‌’चे राजकारण हे आरोप करणे, जबाबदारी झटकणे आणि स्वतःला नेहमी ‌‘पीडित‌’ म्हणून रंगवणे याभोवतीच फिरत राहिले. दिल्लीतील दारू घोटाळा असो, मोहल्ला क्लिनिकमधील अनियमितता असो किंवा पंजाबमधील ढासळती कायदा व सुव्यवस्था असो. ‌‘आप‌’चे नेतृत्व प्रत्येक वेळी दुसऱ्यांवर बोट दाखवून, नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत आले आहे. मात्र, जनता आणि पक्षातीलच विचारवंत नेते किती काळ या खोट्या ‌‘नॅरेटिव्ह‌’वर विश्वास ठेवणार? राघव चड्ढा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उचललेले पाऊल हे याच घुसमटीचा स्फोट ठरले . आज ‌‘आप‌’ फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि पक्षाची शकले होणे, ही आता निव्वळ औपचारिकता उरली आहे.

सर्वांत धक्कादायक आणि हास्यास्पद बाब म्हणजे, जेव्हा राघव चड्ढा आणि इतर नेत्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ‌‘आप‌’च्या अधिकृत प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी त्यांना ‌‘गद्दार‌’ असे संबोधण्यास सुरुवात केली. आम आदमी पक्षाचा हा दुटप्पीपणा आता जनतेला नवीन नाही. ज्यावेळी इतर पक्षांतील नेते फोडून ‌‘आप‌’मध्ये घेतले जातात, तेव्हा त्यांना क्रांतिकारी आणि सत्याच्या मार्गावर चालणारे म्हटले जाते. मात्र, जेव्हा स्वतःच्या पक्षात राहून नेत्यांना सत्य समजते आणि ते पक्षाच्या हुकूमशाही प्रवृत्तीला कंटाळून बाहेर पडतात, तेव्हा त्यांना एका रात्रीत गद्दार ठरवले जाते. केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला ‌‘लोकशाही मूल्ये‌’, ‌‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य‌’ आणि ‌‘विचारस्वातंत्र्य‌’ हे शब्द स्वतःच्या सोयीनुसार वापरणेच माहीत आहे. पक्षात कोणताही अंतर्गत लोकशाहीचा मागमूसही नाही, हे याआधीही प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, कुमार विश्वास आणि मयंक गांधी यांच्यासारख्या अनेक संस्थापक नेत्यांना पक्षातून बाहेर काढताना सिद्ध झाले आहे.

इसवी सन 2011-12 मध्ये अरविंद केजरीवाल यांनी जे बीज रोवले होते, ते एका फसवणुकीचे बीज होते. अण्णा हजारे यांचे वय, त्यांचे वलय आणि त्यांचा प्रामाणिकपणा याचा केजरीवाल यांनी पुरेपूर गैरफायदा घेतला. अण्णांचे ते उपोषण, गद, ते देशभक्तीचे वातावरण या सर्वांना ‌‘कॅश‌’ करून, केजरीवाल यांनी दिल्लीची गादी बळकावली. ‌‘आम्ही सरकारी बंगला घेणार नाही‌’, ‌‘आम्ही लाल दिव्याची गाडी घेणार नाही‌’, ‌‘आम्ही भ्रष्ट नेत्यांशी हातमिळवणी करणार नाही,‌’ या सर्व आश्वासनांचे काय झाले, हे देशाने डोळ्यांनी पाहिले आहे. शीशमहल प्रकरणातून केजरीवालांच्या राहणीमानाचा बुरखा फाटला, तर ‌‘इंडी‌’ आघाडीच्या माध्यमातून कट्टर राजकीय विरोधकांच्या गळ्यात गळे घालताना, त्यांच्या तत्त्वांची लक्तरे वेशीवर टांगली गेली.

निसर्गाचा नियम कुणालाही चुकत नाही. अण्णा हजारे यांच्या पाठीत खंजीर खुपसून जो पक्ष उभा राहिला, तो पक्ष आज अंतर्गत बंडाळीने आणि महत्त्वाकांक्षेच्या संघर्षाने पोखरून निघाला आहे. केजरीवाल यांच्या हातून त्यांचा पक्ष निसटणे, त्यांचे सर्वांत विश्वासू सहकारी त्यांना सोडून जाणे आणि पक्षात उभ्या फुटीचे वारे वाहणे, हा खऱ्या अर्थाने काळाचा काव्यगत न्याय आहे. नियतीने दिलेला हा फटका इतका जोरदार आहे की यातून ‌‘आप‌’चे सावरणे, आता अशक्य असेच. भारताच्या राजकीय इतिहासात आम आदमी पक्ष हा एक असा धडा म्हणून नोंदवला जाईल, जो सांगेल की फसवणुकीच्या पायावर उभी राहिलेली इमारत कितीही चकचकीत असली, तरी ती कधीही कोसळू शकते आणि जेव्हा ती कोसळते, तेव्हा काळाचा काव्यगत न्याय कसा असतो, हे संपूर्ण जगाला दिसते!