आजच्या वेगवान, पाश्चात्य प्रभावाखालील जीवनशैलीत आपण आपल्या मूळ ‘स्व’पासून दूर जात आहोत का? हा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर येतो. भौतिक यश, उपभोग आणि स्पर्धा यांच्या गदारोळात भारतीय जीवनदृष्टीतील मूल्ये, संस्कार आणि संतुलन हरवत चालले आहे. अशा वेळी भारताच्या स्वदेशी जीवनशैलीत दडलेला ‘स्व’ हा वर्तमान आणि भविष्य घडवणारा मार्गदर्शक विचार ठरतो. या ‘स्व’चा शोध आणि त्याचे पुनरुज्जीवनच अधिक अर्थपूर्ण, संतुलित आणि समृद्ध जीवनाची दिशा ठरवू शकते.
भारताच्या स्वदेशी जीवनशैलीत अंतर्भूत असलेल्या ‘स्व’ संकल्पनेत भारतीय निर्मित वस्तूंचा प्रामुख्याने वापर करण्यासोबतच, अनेक महत्त्वाचे पैलूही आहेत. भारताच्या शिक्षणपद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी १९६४-१९६६ या कालावधीत, डॉ. डी. एस. कोठारी यांच्या नेतृत्वाखाली एका आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाचा एक महत्त्वाचा निष्कर्ष असा होता की, भारताचे वैचारिक विश्व युरोपकेंद्रित झाले आहे, जे भारतकेंद्रित असणे आवश्यक आहे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी, काही समकालीन उदाहरणांकडे पाहणे उपयुक्त ठरेल.
दृष्टिकोनातील बदल : युरोपकडून भारताकडे : मध्य-पूर्व नव्हे, पश्चिम आशिया
आज इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला, भारतासह जगभरातील माध्यमे ‘मध्य-पूर्व (मिडल इस्ट)’ क्षेत्रातील युद्ध असे संबोधतात. स्वातंत्र्यानंतर भारतही दीर्घ काळ या प्रदेशाला याच नावाने ओळखत होता. मात्र, अलीकडे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याला ‘पश्चिम आशिया’ असे संबोधण्यास सुरुवात केली आहे. प्रश्न असा पडतो की, युद्धाचे स्थान बदलले आहे का? नाही. बदलला आहे, तो आपला दृष्टिकोन! आखाती प्रदेशाला ‘मध्य-पूर्व’ असे म्हणणे, याचा अर्थ आपण अजूनही वैचारिकदृष्ट्या युरोपच्या दृष्टिकोनातूनच जग पाहात आहोत. युरोपसाठी भारत ‘पूर्व’ आहे, जपान ‘सुदूर पूर्व (फार इस्ट)’ आहे आणि खाडी प्रदेश ‘मध्य-पूर्व’ आहे. परंतु, भारत आता स्वतंत्र आहे. त्यामुळे आपल्या परिभाषा आपल्याच दृष्टिकोनातून ठरल्या पाहिजेत; पाश्चात्य अनुकरणातून नव्हे. म्हणून भारतासाठी युरोप हा पश्चिम आहे, जपान हा पूर्व आहे, आणि आखातीचा प्रदेश हा ‘पश्चिम आशिया’ आहे. ही विचारसरणीची पायाभूत दिशा भारताची असेल, युरोपची नव्हे. हाच स्वदेशी चेतनेचा खरा अर्थ आहे.
शासनातून न्यायाकडे
ब्रिटिश भारतात राज्य करण्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांनी लोकांना दंड देण्याच्या दृष्टीने अनेक कायदे तयार केले, ज्यांना ‘Indian Penal Code (IPC)’ असे म्हटले गेले. आज भारतात लोकशाही आहे. आता उद्दिष्ट दंड देणे नसून न्याय देणे आहे. याच भावनेतून ‘आयपीसी’चे नाव बदलून, ‘भारतीय न्याय संहिता (बीएनएस)’ असे करण्यात आले. हा केवळ नावाचा बदल नाही, तर तो दृष्टिकोनातील बदल आहे. अशा प्रकारचे अनेक बदल शासनाकडून होत आहेत आणि पुढेही होतील.
कालगणना आणि भारतीय चेतना
ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी भारतात सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या गतीवर आधारित शास्त्रसंमत कालगणना प्रचलित होती. महिन्यांची नावेही नक्षत्रांवर आधारित होती. आपल्या शास्त्रज्ञांना ५०-१०० वर्षांनंतर होणार्या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची अचूक गणना करता येत असे. पाश्चात्य ‘ग्रेगोरियन कॅलेंडर’ सुरुवातीला फक्त दहा महिन्यांचे होते. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या नावांचे अर्थच अनुक्रमे सातवा, आठवा, नववा आणि दहावा असे आहेत. नंतर गणना पूर्ण करण्यासाठी, ज्युलियस सीझरने ‘जुलै’ आणि सम्राट ऑगस्टसने ‘ऑगस्ट’ महिना जोडला. त्यामुळे सातवा म्हणून ओळखला जाणारा महिना प्रत्यक्षात नववा झाला.
भारतीय तिथी आणि जीवनातील संस्कार
आजही भारतात आपले सर्व सण हे भारतीय तिथीनुसारच साजरे केले जातात. उदाहरणार्थ, रामनवमी चैत्र शुद्ध नवमीला, रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला, श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण कृष्ण अष्टमीला साजरी केली जाते. मग प्रश्न असा उभा राहतो, आपण आपले वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवसही भारतीय तिथीनुसारच साजरे करू शकत नाही का? लग्नाचा दिवस ठरवताना आपण गुरुजींकडून शुभ मुहूर्त विचारतो, मग त्याची वर्षगाठ फक्त इंग्रजी तारखेनुसारच का साजरी करतो? हा आग्रह यासाठीच आहे, कारण ही आपली कालगणना आहे, प्राचीन, शास्त्राधिष्ठित आणि वैज्ञानिक. हेच आपले ‘स्व’ आहे.
वाढदिवस साजरा करण्याचा बदललेला भाव
इंग्रजी तारखेनुसार वाढदिवस साजरा करताना मध्यरात्रीपर्यंत वाट पाहणे, केक कापणे आणि चेहर्यावर केकचे क्रीम लावणे अशा उथळ परंपरा रूढ झाल्या आहेत. भारतीय परंपरेनुसार दिवसाची सुरुवात ब्रह्ममुहूर्ताला होते. जर तिथीनुसार वाढदिवस साजरा केला, तर संपूर्ण भावविश्वच बदलून जाते. सकाळी लवकर उठणे, स्नान करून देवासमोर दीप प्रज्वलित करणे, घरातील ज्येष्ठांना नमस्कार करणे, एखादा चांगला संकल्प करणे आणि समाजासाठी काही करण्याचा निर्धार करणे अशा प्रकारे वाढदिवस साजरा केल्यास संपूर्ण कुटुंबात आनंद, संस्कार आणि उत्सवाचे वातावरण निर्माण होते. हीच भारताची स्वदेशी जीवनशैली आहे; जिथे विचार, वेळ, संस्कार आणि आचरण हे सर्व आपल्या ‘स्व’शी जोडलेले असते. कमी खर्चात कुणाचाही विरोध न करता, केवळ दृष्टिकोन बदलून आपण आपले जीवन अधिक अर्थपूर्ण आणि भारतीय बनवू शकतो.
शिक्षण, शिकणे आणि जीवनाचा उद्देश : भारताचा ‘स्व’ दृष्टिकोन
अलीकडे एक लेख वाचनात आला. त्यामध्ये लेखक लिहितो, "मी असे अनेक लोक पाहिले आहेत, जे फारसे शिकलेले नसले, तरी जीवनाच्या अनुभवातून बरेच काही शिकलेले आहेत. आणि असेही लोक पाहिले आहेत, जे खूप शिक्षित आहेत, पण जीवनातील शिकवणीपासून पूर्णपणे वंचित आहेत.” शिक्षण आणि शिकणे हे दोन्ही सारखे नाहीत. शिक्षणामुळे उपजीविकेचे साधन मिळते, पण शिकण्यामुळे जीवनाला उद्देश मिळतो. जेव्हा जीवनाचा उद्देश स्पष्ट होतो, तेव्हा जीवनाची दिशा ठरते. दिशा ठरली की प्राधान्यक्रम स्पष्ट होतात आणि त्या उद्दिष्टाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न होत राहिले, तर जीवन नदीच्या प्रवाहासारखे सहजपणे वाहू लागते.
नदी आपल्या दोन्ही काठांच्या मर्यादेतून वाहते, कारण तिला आपले गंतव्य ठावूक असते, तिला समुद्राला मिळायचे असते. याउलट, केवळ शिक्षण घेऊन पैसा कमावणार्या व्यक्तीचे जीवन तलावातील पाण्यासारखे होते. वरून मोठे आणि स्थिर दिसते, पण आतून स्थिर राहिल्यामुळे कुजते आणि दुर्गंध पसरवते. पुस्तके आपल्याला शिकण्यास मदत करतात. असेही म्हटले जाते, प्रथम आपण वाचायला शिकतो आणि नंतर शिकण्यासाठी वाचतो. जशी मासळी पाण्यात राहते, तसेच आपण वेळेत राहतो. मासळी असे म्हणू शकत नाही की, माझ्याकडे पाणी नाही. त्याचप्रमाणे कोणतीही व्यक्ती असे म्हणू शकत नाही की, माझ्याकडे वेळ नाही. प्रत्यक्षात समस्या कार्य-व्यवस्थापनाची-प्राधान्यक्रमांची असते. जेव्हा आपण आपली कामे योग्य प्राधान्यक्रमाने आणि नियोजनपूर्वक करतो, तेव्हा जीवनाच्या उद्दिष्टासाठी वेळ आपोआप उपलब्ध होतो. त्यानंतर त्या नियोजनाची अंमलबजावणी करणे आवश्यक असते. म्हणूनच जीवनात केवळ पैसा कमावणे हेच उद्दिष्ट नसावे, तर काही उच्च ध्येय असावे.
त्या ध्येयपूर्तीसाठी सूर्योदयापूर्वी उठण्याचा संकल्प, त्यासाठी प्रयत्न आणि नंतर सराव आवश्यक असतो. एकदा उठण्याची वेळ निश्चित झाली की, झोपण्याची वेळही आपोआप ठरते. या दोन काठांमध्ये जेव्हा जीवन वाहते, तेव्हा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपोआप संतुलित राहते. नियमित व्यायाम, योग, सूर्यनमस्कार हे जीवनाचा नैसर्गिक भाग होतात, हेही भारताच्या ‘स्व’चेच एक सुंदर स्वरूप आहे.
थोडं अधिक देणं : भारताचा मूक संस्कार
इंग्रजांच्या राज्यापूर्वी भारतात एकसंध शासन नव्हते. भाषा, पूजापद्धती आणि जीवनशैलीमध्ये विविधता होती. तरीही एक परंपरा संपूर्ण भारतभर शतकानुशतके दिसून येते; जेव्हा द्रव पदार्थ (दूध, तेल इ.) मोजून दिले जातात, तेव्हा माप पूर्ण भरल्यानंतरही थोडे वरून अधिक दिले जाते. तसेच तराजूत वजन करतानाही काटा समतोल आल्यानंतर, मूठभर थोडे जास्त देण्याची पद्धत होती आणि आजही विशेषतः ग्रामीण भारतात ही परंपरा जिवंत आहे. ही केवळ व्यवहाराची पद्धत नाही, तर भारताचा ‘स्व’भाव आहे. यामागची भावना स्पष्ट आहे की, मी जो मोबदला घेत आहे त्याच्या बदल्यात समाजाला कमी नव्हे, तर थोडं अधिकच देईन. समाजाला अधिक परत देण्याची ही वृत्ती यालाच ‘भारत’ म्हणतात.
भ्रष्टाचाराचा कायमस्वरूपी उपाय
दुर्दैवाने, आधुनिक शिक्षण व्यक्तीला अधिक आत्मकेंद्रित बनवत असून, केवळ आर्थिक फायद्याच्याच दृष्टीने विचार करायला प्रवृत्त करत आहे. पण, भारतातील सामान्य माणूस समाजाला अधिक देण्यातच आनंद अनुभवतो, हाच भारताचा ‘स्व’भाव आहे. जर या ‘स्व’भावाचे जागरण झाले आणि तो आचरला गेला, तर भ्रष्टाचाराला जागाच उरणार नाही. भाव स्पष्ट आहे, मी माझ्या कामासाठी जे वेतन किंवा मोबदला घेतो, त्यापेक्षा अधिक समाजाला परत द्यायचे आहे; कोणत्याही परिस्थितीत कमी नाही. हाच भारताच्या ‘स्वदेशी’ जीवनशैलीचा आणि ‘स्व’चा खरा अविष्कार आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या आयरिश शिष्या भगिनी निवेदिता यांनी, समाजजीवनाबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण विचार मांडला आहे. त्यांचे म्हणणे असे की, ज्या समाजात लोक आपल्या परिश्रमाने मिळवलेल्या उत्पन्नाचा उपयोग केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजहितासाठी करतात, तेथे सामूहिक प्रयत्नांतून एक प्रकारचे सामाजिक भांडवल निर्माण होते. या सामाजिक भांडवलाच्या बळावर समाज समृद्ध होतो आणि प्रत्येक व्यक्तीही प्रगती करते. हाच खरा धर्म आहे, जो कोणत्याही पंथापुरता मर्यादित नसून, समाजाला एकत्र बांधणारी जीवनदृष्टी आहे. निवेदिता पुढे सांगतात की, ’ज्या समाजात लोक आपल्या परिश्रमाचे फळ केवळ स्वतःसाठी साठवतात आणि समाजाला परत देत नाहीत, त्या समाजात काही व्यक्ती श्रीमंत दिसू शकतात, पण संपूर्ण समाज गरीबच राहतो.’ म्हणूनच, हा विचार ‘स्वदेशी’ जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवला, तर समाजाचे संपूर्ण चित्र बदलू शकते. यासाठी प्रत्येक व्यक्तीचे सजग आणि सक्रिय योगदान आवश्यक आहे. भारताचा विचार आणि आचरण नेहमी असेच राहिले आहे. उत्पादनात विपुलता, वितरणात समानता आणि उपभोगात संयम. आपल्या गरजा मर्यादित ठेवून, उरलेले समाजाच्या हितासाठी आत्मीयतेने अर्पण करणे, हाच धर्म आहे; तर इतरांना त्रास देऊन किंवा त्यांच्या हक्कांवर गदा आणून स्वतःचा स्वार्थ साधणे, हे पाप आहे. याच भावनेतून, स्वातंत्र्यानंतर भारताने काही प्रतीकात्मक आणि मूल्यप्रधान निर्णय घेतले.
लोकसभेचे बोधवाक्य आहे ‘धर्मचक्र प्रवर्तनाय’, राज्यसभेचे ‘सत्यं वद, धर्मं चर’ आणि सर्वोच्च न्यायालयाचे ‘यतो धर्मस्ततो जयः|’ आपल्या राष्ट्रध्वजातील चक्रही धर्मचक्राचेच प्रतीक आहे. भारत मुळात धर्मप्रधान राष्ट्र आहे. जेव्हा धर्माच्या अधीन राहून अर्थ आणि काम हे पुरुषार्थ चालतात, तेव्हा मोक्ष आपोआप साध्य होतो. दया हा धर्म आहे, अहंकार पाप आहे. म्हणूनच जीवनात एकीकडे एकांतात आत्मसाधना आणि दुसरीकडे समाजात राहून सेवा, या दोन्हींचा समतोल आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांनी या भावनेला ‘शिवभावाने जीवसेवा’ या सूत्रातून स्पष्ट केले. म्हणजेच ‘मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा’, ’दरिद्रनारायणाची सेवा म्हणजेच ईश्वरपूजा’. यालाच भारताचा ‘स्व’ म्हणतात. हीच आपली स्वदेशी जीवनशैली आहे. भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायात म्हटले आहे, ‘स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः’ आणि ‘स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः’ म्हणजेच, मनुष्य आपल्या स्वधर्मानुसार कर्म करत राहून सिद्धी प्राप्त करतो आणि आपल्या कर्मांद्वारे ईश्वराची उपासना करतो. संत ज्ञानेश्वर हेच अधिक सोप्या शब्दांत सांगतात, ‘तेया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा, तोषा लागी.’ (अर्थ-समाजरूपी सर्वव्यापक ईश्वराची आपल्या कर्मरूपी फुलांनी केलेली पूजा त्याला संतुष्ट करते.)
या सर्व विचारांचा गाभा एकच आहे, आपले प्रत्येक कर्म समाजपूजेच्या भावनेतून व्हावे. जसे आपण पूजेसाठी ताजे, सुगंधी आणि उत्तम फुले निवडतो, तसेच समाजासाठी केलेले आपले कार्यही उत्कृष्ट, शुद्ध आणि सर्वोत्तम असावे. हाच भारताचा ‘स्व’ असून, तोच आपला स्वभाव बनावा. तोच आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हावा. मग आपले समाजजीवन आणि राष्ट्रजीवन किती सुंदर, समृद्ध आणि आनंददायी होईल! हीच खरी स्वदेशी जीवनशैली आहे.
- डॉ. मनमोहन वैद्य
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.)