Marathi Poet : आत्मशोधाचा प्रवास म्हणजे कविता! : अशोक बागवे
26-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Marathi Poet ) “ जी पोटात राहत नाही, ओठांवर येते ती म्हणजे कविता. कविता आपला सभोवताल पेटवत नाही तर उजळवते. कविता हा आत्म उत्खननाचा आत्मशुद्धीचा आणि आत्मशोधाचा प्रवास आहे. “ असे प्रतिपादन जेष्ठ कवी अशोक बागवे यांनी केले.
दि. २५ एप्रिल रोजी, ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वा. अ. रेगे सभागृहात सृजनसंवाद प्रकाशन प्रकाशित, कवी वरदविनायक खांबेटे लिखित 'स्वामिनी' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. ज्येष्ठ लेखिका समीक्षक डॉ. वंदना बोकील कुलकर्णी, ज्येष्ठ कवी साहित्यिक अशोक बागवे, सृजन संवाद प्रकाशनाचे प्रकाशक गीतेश शिंदे आणि ठाणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना कवी वरदविनायक खांबेटे म्हणाले की ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाशी त्यांचे नाते लहानपणापासून जुळलेले आहे. मी ज्यावेळी कविता करायला लागलो तेव्हा असे लक्षात आले की चिंतनशील विषय आपोआपच काव्यामध्ये उतरले आहेत. कविताही आपसूकच उतरते आहे तिचा करता-करविता वेगळाच आहे. प्रकाशक गीतेश शिंदे म्हणाले की आजच्या प्रकाशन सोहळ्याला, कवितेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात माणसांनी एकत्र येणं हे नक्कीच आशादायक चित्र आहे. आपल्या आपल्या आवाजाची कविता लिहावीशी वाटणं ही गोष्टच दुर्मिळ आहे. मात्र, वरदविनायक खांबोटे यांनी वृत्तबद्ध काव्य करून एक वेगळा आविष्कार निर्माण केला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे म्हणाले की ज्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला कवीचे आई-वडील उपस्थित असतात, तिथे दीपप्रज्वलन हे आधीच संपन्न झालेले असते. आज कवितेचे अनेक भाग आपल्याला बघायला मिळतात सामाजिक कविता प्रेमाची कविता, मात्र कवितेचे मूळ म्हणजे कविता हे शिकवण्याची वेळ आता आलेली आहे. आपल्या अनुभवाची सावली जो उजळतो तो कवी. ज्यात दडवलेले जास्त असतं ती कविता खरी. हल्ली काही जणं म्हणतात की आम्हाला कविता लिहायला वेळ मिळत नाही मात्र खऱ्या अर्थाने अवेळी होते ती कविता. कविता ही विषयावर नव्हे तर आशयावर अवलंबून असते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी आमडेकर यांनी केले.
सुमार पुस्तकांच्या बेसुमार गर्दीत चांगले साहित्य हरवते ! : डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
याप्रसंगी काव्यसंग्रहाचे विवेचन करताना व लोकांशी संवाद साधताना ज्येष्ठ समीक्षक डॉ. वंदना बोकील कुलकर्णी म्हणाल्या की “ पूर्वीच्या तुलनेत आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात प्रकाशन पार पडतात. अनेकांना लिहिलेले, प्रकाशित करण्याची संधी मिळते. मात्र, पुस्तकांवर लेखकांच्या लिखाणावर संस्कार करणे ही प्रक्रिया सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे. प्रकाशक गीतेश शिंदे आणि कवी वरदविनायक खांबेटे यांनी या प्रक्रियेची व्यवस्थितीत काळजी घेतली आहे. अन्यथा आजच्या तारखेला सुमार पुस्तकांच्या बेसुमार गर्दीत चांगले साहित्य हरवते हेच आपल्याला बघायला मिळते.”