’वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोग’(CSTT) (उच्चतर शिक्षा विभाग) भारत सरकार, नवी दिल्ली आणि ‘कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक’चे ‘भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘भारतीय ज्ञान परंपरेचा शिक्षार्थी कोश (संस्कृत-मराठी)’ या कार्यशाळेचे आयोजन, मार्चअखेरीस रत्नागिरी उपकेंद्रामध्ये करण्यात आले होते. संस्कृत भाषेतील भारतीय ज्ञानपरंपरेशी संबंधित संज्ञांना मराठी भाषेत अचूक, अर्थपूर्ण आणि सुसंगत प्रतिशब्द शोधणे, हाच या कार्यशाळेचा उद्देश होता. कार्यशाळेच्या शेवटी एकूण २ हजार, ३८७ संस्कृत शब्दांना, मराठीतील समर्पक प्रतिशब्द निश्चित करण्यात आले. त्यानिमित्ताने या कार्यशाळेच्या फलश्रुतीचा मागोवा घेणारा हा लेख...
जगाच्या पाठीवर भारत एकमेव असा देश आहे, ज्या देशाला संस्कृती, भाषा, निसर्ग यांसारख्या बाबतीत वैविध्य प्राप्त आहे. त्यामुळे कलाकुसरीप्रमाणेच हा देश नटलेला आहे. याच देशाला एक प्राचीन आणि दीर्घ ज्ञानपरंपरा लाभलेली असून, ती मानवजातीच्या बौद्धिक इतिहासातील एक अत्यंत समृद्ध, व्यापक आणि बहुआयामी परंपरा मानली जाते. हजारो वर्षांच्या कालखंडात विकसित झालेल्या या परंपरेने संपूर्ण जगाला विचार, तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांची दिशा दिली. या परंपरेत वेद, उपनिषद, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, दर्शनशास्त्र, आयुर्वेद, योगशास्त्र, गणित, ज्योतिष, नाट्यशास्त्र, वास्तुशास्त्र, साहित्य अशा असंख्य शाखांचा समावेश आहे. या ज्ञान शाखांमध्ये अनेक विद्वान भारतीयांनी केलेले संशोधन आणि चिंतन, आजही तितकेच उपयुक्त आणि अभ्यासनीय आहे. अशा या विस्तीर्ण असणार्या ज्ञानसंपदेचा मूलाधार देववाणी अर्थात संस्कृत भाषा आहे.
संस्कृत ही केवळ एक प्राचीन भाषाच नसून, ती एक वैज्ञानिक, संरचित आणि अत्यंत अभिव्यक्तशील भाषाही आहे. संस्कृतमधील प्रत्येक शब्दामध्ये एक विशिष्ट अर्थछटा, संदर्भ आणि तात्त्विक गाभा दडलेला असतो. त्यामुळे संस्कृतमधील संज्ञांच्या अचूक आकलनाशिवाय, भारतीय ज्ञानपरंपरेचे सखोल ज्ञान प्राप्त होऊच शकत नाही. तथापि, आधुनिक काळात संस्कृत भाषा सामान्य लोकांच्या वापरातून दूर गेल्यामुळे, या ज्ञानपरंपरेतील अनेक संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात ज्ञानाचा प्रसार वेगाने होत असला, तरी तो प्रामुख्याने इंग्रजीसारख्या जागतिक भाषांपुरताच मर्यादित राहतो. यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना, अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच ज्ञानाचे स्थानिकीकरण आणि मातृभाषेत सुलभीकरण ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. या प्रक्रियेत शब्दकोश निर्मिती, परिभाषा कोश आणि तांत्रिक शब्दावली विकसित करणे, हे मूलभूत घटक ठरतात. याच उद्दिष्टासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेला ’वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोग’ हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण संस्थात्मक घटक आहे. या आयोगाची स्थापना देशातील विविध भारतीय भाषांमध्ये वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दसंपदा विकसित करण्यासाठी झाली. आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार, तो विविध विषयांतील, जसे की विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यक, सामाजिक विज्ञान आणि मानविकी संज्ञांचे भारतीय भाषांमध्ये मानकीकरण करतो. इंग्रजी आणि इतर परभाषांतील संज्ञांचे अचूक व सुसंगत रूपांतर करून, द्विभाषिक आणि बहुभाषिक शब्दकोश तयार केले जातात. तसेच विद्यापीठे आणि संशोधन संस्थांच्या सहकार्याने कार्यशाळा, परिसंवाद आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून, भाषिक सक्षमीकरणाला चालना दिली जाते. शिक्षण मातृभाषेत सुलभ व्हावे आणि ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, हाच या आयोगाचा मुख्य हेतू आहे.
दरम्यान, हेतुपूर्ततेसाठी आयोगाप्रमाणेच महाराष्ट्रातील नागपुरातल्या रामटेक येथील ‘कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय’ही संस्कृत भाषा प्रचार-प्रसाराकरिता आणि आधुनिक तंत्रज्ञानाने संस्कृत भाषेतील अध्यापनाकरिता भरीव काम करत आहे. याच विश्वविद्यालयाचे रत्नागिरीतील ‘भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र’देखील याच हेतुनुसार कार्यरत आहे. दरम्यान, ’वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोग’ आणि ‘कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक’चे ‘भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने, भारतीय ज्ञान परंपरेचा शिक्षार्थी कोश (संस्कृत-मराठी) या कार्यशाळेचे आयोजन, दि. २३ ते २७ मार्च या कालावधीत रत्नागिरी उपकेंद्रात करण्यात आलेले होते.
ही कार्यशाळा भारतीय ज्ञानपरंपरेच्या सुलभीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश संस्कृत भाषेतील भारतीय ज्ञानपरंपरेशी संबंधित संज्ञांना मराठी भाषेत अचूक, अर्थपूर्ण आणि सुसंगत प्रतिशब्द शोधणे हा होता. कार्यशाळेच्या शेवटी एकूण २ हजार, ३८७ संस्कृत शब्दांना, मराठीतील समर्पक प्रतिशब्द निश्चित करण्यात आले. ही केवळ आकडेवारी नसून, ज्ञानाच्या व्यापक प्रसारासाठी केलेले एक ठोस आणि योजनाबद्ध कार्य आहे. या कार्यशाळेत आयुर्वेद, सैन्यशास्त्र, व्याकरण, ज्योतिष, वास्तुशास्त्र, धातुशास्त्र, गणित, विज्ञान, भूगोल यांसारख्या विविध विषयांशी संबंधित शब्द होते. काही शब्द हे आपण व्यवहारात जसे वापरतो, ते बहुतांश वेळेला संस्कृतप्रचुर असतात. अशा वेळेस याचा विचार करून, कार्यशाळेत संस्कृतप्रचुर शब्द जसेच्या तसे घेण्यात आले, तर उर्वरित शब्दांना मराठी भाषेत प्रतिशब्दही शोधण्यात आले.
कार्यशाळेत ‘आयुर्वेद’ विषयावर असंख्य शब्द पडताळण्यात आले. वैद्यकीय पेशात नेहमीच्या वापरात असलेले आणि संस्कृतप्रचुर असणारे बालरोग, बल, भगंदर, मज्जा, मधुमेह, मल, मलपरीक्षा, मांस हे शब्द तसेच ठेवण्यात आले, तर अगदतन्त्र-विषविज्ञान, अग्निकर्म-डाग देणे, भृशम-पुष्कळ, मेदविकार-लठ्ठपणा, लघुपाक-पचनक्षमता, स्तोकम्-थोडे, अभिष्यन्दः-गळती/स्राव, एला-वेलची, औष्णम्-कोमट, सोमाळे असे मराठी भाषेतील प्रतिशब्दही शोधण्यात आले.
त्याचप्रमाणे, कार्यशाळेतील सांघिक कार्यात ‘दर्शन’सारख्या विस्तृत विषयातील काही संज्ञा मराठीतदेखील तशाच वापरल्या जातात, ज्या शास्त्रीयदृष्ट्या लिष्ट आहेत. यात प्रामुख्याने अत्यन्ताभाव, अद्वैत, अधर्म, अपरिग्रह, आत्मज्ञान यांसारख्या शब्दांचा समावेश होतो. ‘ज्योतिष’ विभागामधील अङ्गुलि-पर्व-पेर, अवाची-दक्षिण दिशा या शब्दांना प्रतिशब्द शोधण्यात आले. ‘सैन्यशास्त्रा’त शतघ्नी-तोफ यांसारखे शब्द नव्याने शोधण्यात आले. ‘गणितीय भाषे’तील अनुलोम-सरळ क्रम, अयुग्मम्-विषमसंख्या-कोटि, आयतनम्-घनफळ असे मराठीनिष्ठ शब्द शोधण्यात आले. याशिवाय ‘धातुशास्त्रा’त नागः-कथिल, रांगा, वंग, पञ्चलोहम्-पञ्चधातू, पिष्टिः-धातुलेप, मुण्डलोह-बिडे (ओतलेले लोखंड), रासविधानम्-धातुशुद्धी, लोहिताय-तांबे असे धातुशास्त्रातील शब्द, चर्चात्मक माध्यमातून शोधण्यात आले. त्याचप्रमाणे ‘भूगोल’ विषयातील अनूपभूमिः-दलदलीची जमीन, इरिका वनम्-खारफुटी वन, कान्तारम्-ओसाड भूप्रदेश अशा शब्दांचाही शोध घेण्यात आला.
प्रत्येक शब्दाची चिकित्सा ही साधक-बाधक चर्चेतून करण्यात आल्याने, निर्माण झालेला संस्कृत-मराठी शब्दकोश हा अधिक विश्वासार्ह आहे. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे, शब्दनिश्चितीची सखोल आणि शास्त्रीय प्रक्रिया. प्रत्येक शब्दाचा अर्थ निश्चित करताना, त्याचा मूळ संदर्भ, तात्त्विक आशय, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आधुनिक उपयोग यांचा बारकाईने विचार करण्यात आला. त्यामुळे तयार होणारा कोश हा एक संदर्भयुक्त, अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त ज्ञानस्रोत ठरणार आहे. या कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी सक्रिय सहभाग घेतला. उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. निधी पटवर्धन, प्रा. प्रज्ञा भट, प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. कश्मिरा दळी, संस्कृत अभ्यासिका अक्षया भागवत, बंगळुरु येथील ‘अगस्त्य गुरुकुला’तील प्रा. पूर्वा चुनेकर, प्रकल्प साहाय्यक व संशोधिका प्रा. सई ओक, तसेच समन्वयक स्वरूप काणे यांनी या कार्यात मोलाचे योगदान दिले. प्रत्येक तज्ज्ञाने आपल्या क्षेत्रातील ज्ञानाच्या आधारे चर्चेत सहभाग घेतला आणि शब्दनिश्चिती प्रक्रियेला दिशा दिली.
या कार्यशाळेत निवडलेले शब्द ४० हून अधिक विषयांशी संबंधित असल्याने, हा कोश विविध ज्ञानशाखांना जोडणारा एक व्यापक आणि बहुआयामी प्रकल्प ठरतो. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत सामूहिक बौद्धिक चिंतन हा दृष्टिकोन प्रभावीपणे वापरण्यात आला. प्रत्येक शब्दावर सखोल चर्चा, मतभेद, पुनर्विचार आणि अंतिम सहमती या टप्प्यांमधूनच निष्कर्ष काढण्यात आला. या प्रक्रियेमुळे शब्दांची अचूकता, सुसंगती आणि विश्वसनीयता अधिक दृढ झाली आहे. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सहभागी तज्ज्ञांचा सन्मान कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास ’वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोगा’चे अधिकारी, उपकेंद्रातील विद्यार्थी, संशोधक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करतानाच, भविष्यात अशाच अधिक उपक्रमांची आवश्यकताही व्यक्त केली.
या प्रकारच्या कोशनिर्मितीमुळे दोन महत्त्वपूर्ण फायदे स्पष्टपणे दिसून येतात. एक म्हणजे, संस्कृतमधील गूढ आणि क्लिष्ट संकल्पना मराठीत सुलभ होतात आणि दुसरे म्हणजे, मराठी भाषेची शब्दसंपदा अधिक समृद्ध होऊन तिची अभिव्यक्ती क्षमता वाढते. तसेच, अशा उपक्रमांमुळे संशोधनाला नवी दिशा मिळते. विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना त्यांच्या मातृभाषेतून अभ्यास करता येतो, ज्यामुळे त्यांची विचारशक्ती अधिक विकसित होते. यामुळेच हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे.
एकंदरीत, हा प्रकल्प भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. २ हजार, ३८७ शब्दांचे मराठी रूपांतर, हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार होऊन, अधिकाधिक भारतीय भाषांमध्ये अशा प्रकारचे कोश तयार झाले, तर भारतीय ज्ञानपरंपरा अधिक व्यापक पातळीवर पोहोचेल. ज्ञान, भाषा आणि संस्कृती यांना जोडणारा हा सेतू निश्चितच आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल.
- डॉ. दिनकर मराठे स्वरूप काणे
(लेखक डॉ. दिनकर मराठे ‘भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, नागपूर’चे संचालक आहेत आणि सहलेखक स्वरूप काणे हे CDEO समन्वयक, रत्नागिरी उपकेंद्र आहेत.)