ज्ञानाची खरी ताकद ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली, तरच समाज प्रबुद्ध होतो, या ध्येयाने आयुष्य वेचणार्या डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे कार्य मराठी ज्ञानपरंपरेतील एक अद्वितीय पर्व ठरते. विद्वत्ता, संशोधननिष्ठा आणि समाजजागृती यांचा अद्वितीय संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो. ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा’च्या निर्मितीतून त्यांनी मराठी भाषेला ‘ज्ञानभाषे’चा दर्जा मिळवून दिला. प्रतिकूल परिस्थितीत, अल्प साधनसामग्रीत आणि प्रचंड चिकाटीने उभारलेला हा महाकाय प्रकल्प म्हणजे त्यांच्या ध्यास, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठेचे ज्वलंत प्रतीक होय. अलीकडेच दि. १० एप्रिल रोजी झालेल्या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
मराठी साहित्यात आणि ज्ञानपरंपरेत ज्ञानकोशकार म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे एक विद्वान, संशोधक आणि समाजचिंतक होते. मराठीत पहिला व्यापक ज्ञानकोश तयार करून त्यांनी, सर्वसामान्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचे मोठे कार्य केले. केतकर यांचा जन्म दि. २ फेब्रुवारी १८८४ रोजी, तत्कालीन मध्य प्रांतातील रायपूर येथे झाला. बालपणापासून ते अत्यंत जिज्ञासू वृत्तीचे होते. शिक्षणाच्या काळातच त्यांना समाजशास्त्र, इतिहास, धर्म आणि तत्त्वज्ञान यांची विशेष आवड निर्माण झाली. पुढे त्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन अभ्यास केला आणि ‘समाजशास्त्र’ विषयात संशोधनही केले. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून ते ‘बीए’, ‘एमए’ व ‘पीएचडी’ झाले. केतकर हे केवळ ज्ञानकोशकार नव्हते, तर ते एक प्रगल्भ विचारवंतही होते. त्यांनी समाजव्यवस्था, धर्म, इतिहास आणि संस्कृती यांवर संशोधनात्मक लेखनही केले. त्यांच्या लेखनात चिकित्सक दृष्टी, तर्कशुद्धता आणि संशोधनाची सखोलता दिसून येते. ते समाजातील अंधश्रद्धा आणि रूढी यांवर टीका करत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कारही करत. ‘आशावादी’, ‘गावसासू’, ‘ब्राह्मणकन्या’, ‘परागंदा प्रियंवदा’ या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबर्या. या कादंबर्यामधून तत्कालीन सामाजिक प्रश्न, स्त्री-पुरुष संबंध आणि मध्यमवर्गीय जाणिवांचे मर्मग्राही विश्लेषण आढळते. त्यांनी अमेरिकेत असताना ‘The history of caste in india’ हा प्रबंध लिहिला. यात त्यांनी जातिव्यवस्थेच्या उत्पत्तीचा आणि मानसिकतेचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून वेध घेतला. भारतीय समाजशास्त्राला एक स्वतंत्र ओळख करून देण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.
केतकर हे निखळ हिंदुत्ववादी होते. हिंदुत्वातील जातिभेद त्यांना अमान्य होते. त्यांचा हिंदी राष्ट्रवाद हिंदुत्वाधिष्ठित होता. द. न. गोखले यांनी डॉ. केतकरांवर चरित्र लिहिले आहे. त्यात ते लिहितात, "हिंदुस्थानात प्रादेशिक राष्ट्रवादाची वाढ होऊन त्यावर हिंदू संस्कृतीची छाप राहावी, असे ध्येय भारतीय समाजासाठी केतकरांनी निश्चित केलेले होते. हिंदू समाज हा अनेक जातींचा व संप्रदायांचा एक सामाजिक संघ आहे, तो स्वतःच धर्म (religion) किंवा संप्रदाय नाही, असे हिंदू समाजाच्या स्वरूपाचे निदान त्यांनी केलेले होते. तेव्हा मुसलमान, ख्रिश्चन, बेने इस्रायल, पारसी वगैरे अहिंदू समाजांनी हिंदूच्या सामाजिक संघात एकेक संप्रदाय म्हणून समाविष्ट व्हावे, असे त्यांचे सांगणे होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मुसलमान किंवा ख्रिश्चन समाज विशिष्ट पारमार्थिक मत स्वीकारणारा समूह वाढत गेल्याने वाढले, तर हिंदू समाज केवळ सन्निकर्षाने वाढला. हिंदू समाजामध्ये स्वतःच्या पृथक्त्वाची भावना मुसलमान व ख्रिश्चन हिंदुस्थानात येईपर्यंत नव्हती; तो समाज ‘सर्व जग एक आहे,’ असेच समजत असे आणि ‘मानवधर्मा’चा आग्रह धरी, अशी केतकरांची मांडणी होती. त्यामुळे एक जगाचे ध्येय आणि तदर्थं घडणारी हिंदी राष्ट्रवादाची प्रस्थापना म्हणजे, मूळच्या हिंदू कल्पनेचाच विस्तार होय, असे ते मानीत. ‘हिस्टरी ऑफ कास्ट’च्या व ‘हिंदुइझम’च्या लेखनासाठी त्यांनी विदेशात जो समाजशास्त्रीय अभ्यास केला होता, त्यामुळे सामाजिक घडामोडींचा छडा लावण्याची विशिष्ट समाजशास्त्रीय दृष्टी त्यांना प्राप्त झालेली होती. (पृष्ठ ५३)”
केतकरांचे सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे कार्य म्हणजे, मराठी ज्ञानकोशाची निर्मिती. त्या काळात मराठी भाषेत सर्व विषयांचे व्यवस्थित संदर्भ देणारा असा ग्रंथ नव्हता. ही उणीव लक्षात घेऊन त्यांनी, महाराष्ट्रीय ज्ञानकोश तयार करण्याचे मोठे कार्य हाती घेतले. हा ज्ञानकोश अनेक खंडांमध्ये प्रकाशित झाला. या कार्यामुळे मराठी भाषेला एक महत्त्वपूर्ण ज्ञानसंपदा प्राप्त झाली. केतकर यांनी १९१६ ते १९२८ या काळात ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ या महाकाय प्रकल्पाचे काम पूर्ण केले.त्याकाळी सोयी-सुविधांचा अभाव असतानाही, त्यांनी हे प्रचंड काम एकहाती पेलले. दोन दशकांची ही तपस्या होती. या ज्ञानकोशात केवळ माहिती नव्हती, तर जगाचा इतिहास, विज्ञान आणि संस्कृती यांचे मराठीतून केलेले ते पहिले शास्त्रशुद्ध संकलन होते. ज्ञानकोशाचे एकूण २३ खंड आहेत. यांचे वैशिष्ट्य असे की, त्याची रचना ‘अ’ ते ‘ज्ञ’ अशी शब्दकोशासारखी न करता, ती पाच प्रमुख विभागात त्यांनी केली. यातील विभाग १ ते ५ (प्रस्तावना खंड) अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. कारण यांत केवळ शब्दार्थ नसून, मानवी ज्ञान व इतिहासाचा तात्त्विक आढावा त्यांनी घेतला आहे. हिंदुस्थान आणि जग, वैदिक संस्कृती, बुद्धपूर्व व बुद्धोत्तरजग, विज्ञानाचा इतिहास हे या विभागात विषय आहेत. विभाग ६ ते २१ यामध्ये आकारविल्हे क्रमाने विविध विषयांची माहिती आहे. विभाग २२ मध्ये संपूर्ण ज्ञानकोशातील विषय शोधण्यासाठी विषयानुक्रमणिका आहे, तर शेवटच्या विभागात (विभाग २३) भारताच्या अर्वाचीन इतिहासावर प्रकाश टाकला आहे.
केतकर अमेरिकेत ज्यावेळी शिक्षण घेत होते, त्यावेळी अमेरिकन ज्ञानकोश व ब्रिटिश ज्ञानकोश हे जगप्रसिद्ध झाले होते. त्यापासून प्रेरणा घेऊन भारतात तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू आदि भाषांत ज्ञानकोश तयार होऊ लागले होते. भारतात त्यावेळी ब्रिटिशांचे राज्य होते. मराठीसह अन्य भारतीय भाषांना शूद्र भाषेचे स्थान देऊन, इंग्रजी भाषेस प्रथम स्थान देण्याचा ब्रिटिशांचा कुटिल प्रयत्न होता. इंग्रजी भाषेचे वर्चस्व कमी करण्यासाठी देशी भाषांत राज्यकारभार, भाषावार प्रांतरचना व देशी भाषांतून शिक्षण देणारी प्रांतवार विद्यापीठे यांचा डॉ. केतकर नेहमी पुरस्कार करीत. मूळात देशभक्त असलेल्या केतकर यांना, स्थानिक संस्कृती व देशी भाषेबद्दल अतोनात आस्था होती. त्यातूनच त्यांना ज्ञानकोशनिर्मितीची कल्पना सूचली. मराठीत ज्ञानकोशाची कल्पना मांडणारे वा त्याची रचना करणारे डॉ. केतकर पहिले गृहस्थ नव्हते. चरित्रकार द. न. गोखले यांनी डॉ. केतकरांवर जे चरित्र लिहिले आहे, त्यात ज्ञानकोशनिर्मितीची विस्तृत माहिती आढळते.
गोखले त्या चरित्रात लिहितात की, "महाराष्ट्रात ज्ञानकोशाच्या रचनेचे प्रयत्न त्या काळी आपल्या परीने झाले होते. जनार्दन हरी आठल्ये किंवा डॉ. सांबारे यांच्यासारख्या गृहस्थांनी, अव्वल इंग्रजी अमदानीतच मराठी ज्ञानकोश काढण्याची खटपट केली होती; पण दुर्दैवाने ती सफल झाली नव्हती. १९०६च्या पुणे येथील साहित्य-संमेलनात प्रा. विष्णू गोविंद विजापूरकर यांनी व इतर वक्त्यांनी ‘मराठी विश्वकोश व्हावयास पाहिजे,’ अशी हाक दिली होती आणि सुबुद्ध महाराष्ट्र ज्ञानकोशाच्या रचनेसाठी उन्मुख आहे, याची साक्ष पटविली होती. परिस्थिती अशी चोहो बाजूंनी परिपक्व होत चालली होती; तेव्हा १९१५-१६ साली केतकरांसारखी कर्तबगार व विद्वान व्यक्ती महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या रचनेसाठी पुढे सरसावल्यानंतर तिच्या हाताला यश येत गेले, हे स्वाभाविक होते. १९१५च्या ऑगस्टच्या सुमारास ज्ञानकोशाची कल्पना, केतकरांनी प्रथम नागपूरला मूर्त स्वरूपात डॉ. मुंजे, डॉ. चोळकर, माधवराव पाध्ये वगैरे मंडळींच्या बैठकीमध्ये मांडली. अनेकांनी या संकल्पनेची त्यावेळी थट्टा केली. बहुतेकांनी ‘ही योजना म्हणजे एक मौजेचा, महत्त्वाकांक्षी, परंतु फाजील महत्त्वाकांक्षी व त्यामुळे हास्यास्पद असा कार्यक्रम होय,’ म्हणून तिची बोळवण केली. लोकमान्य टिळकांनी ज्ञानकोशाविषयी १९१५ साली असे उद्गार काढले की, हे कार्य जवळजवळ अशक्य कोटीतील किंवा अत्यंत कठीण असे आहे. १९१८च्या सुमारास कार्याला प्रारभ झाल्यानंतर ते म्हणाले की, ‘कार्य पुरे होण्यास २० वर्षे लागतील, असा माझा अंदाज आहे.’ इतिहासाचार्य राजवाड्यांनी तर असे भविष्य वर्तविले होते की, ‘हे कार्य परिपूर्ण होण्यास एक हयात खर्ची पडेल.’ (डॉ. केतकर - द. न. गोखले, मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठ ८२,८३.)”
ज्ञानकोशनिर्मितीत लोकमान्य टिळक, डॉ. भांडारकर, इतिहासाचार्य राजवाडे, वासुदेवशास्त्री खरे यांचे प्रत्यक्ष सहकार्य वा मार्गदर्शन केतकर यांना लाभले नाही, ही वस्तुस्थिती होती. परंतु, त्यामुळे केतकर डगमगले नाहीत. त्यांनी रुढार्थाने प्रसिद्ध नसलेला व्यक्तींना हाताशी धरले, त्यांना विद्वान बनवले व स्वतःच्या हिमतीवर ज्ञानकोशनिर्मिती केली. केतकरांचे परिश्रम, चिकाटी, विद्वत्ता, संघटनकला, हाती घेतलेल्या कार्यावर अढळ व अतूट श्रद्धा व निष्ठा यांमुळेच ते कार्य तडीस नेऊ शकले. ज्ञानकोश निर्माण होताना, त्यांनी संपादक आणि व्यवस्थापक अशी दुहेरी भूमिका बजावली. ग्रंथ निर्माण करताना व त्याच्या निर्मितीनंतर धनसंकलनासाठीही त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कोणाचीही तमा न बाळगता १२-१२ तास, उन्हा-तान्हातून, पावसातून ते पायपीट करत, त्याचा प्रचार व प्रसार करत, त्यासाठी हस्तपत्रकेही स्वतः वितरित करत व त्याची विक्रीही करत.
ज्ञानकोशाच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्याचे मोठे कार्य केले. त्यांनी ‘प्राचीन महाराष्ट्र’ या ग्रंथातून महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकला.
ज्ञानकोशनिर्मितीचा केतकर यांचा उद्देश केवळ माहिती देणे, हा नव्हता; तर मराठी माणसाला जागतिक स्तरावरील ज्ञान स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून देणे, हा होता. त्यांनी अनेक पाश्चात्य संकल्पनांना मराठीत पारिभाषिक शब्द दिले, ज्यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध झाली. डॉ. केतकर यांचा ज्ञानकोश हा केवळ मराठी भाषेतील पहिला ज्ञानकोश नाही, तर आधुनिक महाराष्ट्राच्या बौद्धिक इतिहासाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. आजच्या डिजिटल आणि माहितीच्या युगातही त्याची उपयोगिता आहे. विशेषतः १९२०च्या दशकांत महाराष्ट्राची सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक स्थिती काय होती, हे जाणून घेण्यासाठी हा सर्वांत विश्वसनीय असा प्राथमिक स्रोत आहे. इतिहासकार आणि संशोधकांसाठी हा कोश म्हणजे एक ‘टाईम कॅप्सूल’ आहे. विज्ञानातील प्रगती, नवीन शोध आणि बदललेली भौगोलिक सीमा यांमुळे माहितीच्या बाबतीत तो अद्ययावत नसला, तरी वैचारिक बैठक आणि ऐतिहासिक माहिती यासाठी त्याचे महत्त्व मात्र वादातीत आहे. अभ्यासूंसाठी हा संपूर्ण ज्ञानकोश आज इंटरनेटवर उपलब्ध आहे. ज्ञानप्रसारासाठी आयुष्य अर्पण करणारे डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन दि. १० एप्रिल १९३७ रोजी झाले. त्यांच्या कार्यामुळे ते आजही मराठी ज्ञानपरंपरेत आदराने स्मरणात आहेत. त्यांनी ज्ञानकोशनिर्मितीच्या माध्यमातून मराठी समाजाला ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिला. त्यांच्या कार्यामुळे मराठी भाषेला शास्त्रीय आणि बौद्धिक समृद्धी प्राप्त झाली. त्यामुळे त्यांचे स्थान मराठी साहित्य आणि संशोधन क्षेत्रात अत्यंत मानाचे आहे.
- रवींद्र साठे
(लेखक ‘महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळा’चे सभापती (राज्यमंत्री दर्जा) आहेत.)