लोकल, ‘बेस्ट’ बससेवा, मेट्रो आणि मोनोरेलनंतर लवकरच मुंबईकरांना ‘वॉटर मेट्रो’चा आधुनिक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक, शाश्वत आणि जागतिक स्तरावर अग्रगण्य ‘हायड्रोफॉईल’ तंत्रज्ञानाधारित बोटींची निवड केली आहे. हे तंत्रज्ञान जगात एकमेव स्वीडनस्थित ‘कॅन्डेला’ कंपनीकडे आहे. त्यानिमित्ताने ‘कॅन्डेला’ कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव्ह हास्सेलस्कोग, तसेच कंपनीचे प्रादेशिक प्रमुख नकुल विराट यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद...
‘हायड्रोफॉईल’ तंत्रज्ञानाला ‘गेम चेंजर’ म्हटले जाते. तेव्हा, या तंत्रज्ञानावर आधारित ‘कॅन्डेला’ कंपनी विकसित करण्यामागे आपली नेमकी प्रेरणा काय होती?
२०१४ मध्ये मला जाणवले की, इलेट्रिक वाहने बाजारात वेगाने लोकप्रिय होत होत्या. पण, बोट्स आणि फेरींच्या बाबतीत फारसे नवे प्रयोग होत नव्हते. त्यामुळे या क्षेत्रात नावीन्यपूर्ण निर्मितीचा मी विचार केला. फेरीबोट इतकी ऊर्जा वापरत नाहीत आणि बॅटरीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल इतकी ऊर्जा साठवता येत नाही. तेव्हाच मला ‘हायड्रोफॉईल’ तंत्रज्ञानाची कल्पना सूचली. या तंत्रज्ञानात बोटीच्या खाली पंखांसारखी रचना (विंग्स) असते. यामुळे बोटीचा मुख्य भाग पाण्याबाहेर उचलला जाऊन, घर्षण मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे बॅटरीवरही लांब पल्ल्याचा वेगवान प्रवास शय होतो.
फेरी बोट निर्मिती क्षेत्रात अन्यही काही कंपन्या आहेत. अशा वेळी एखाद्या राज्याने ‘कॅन्डेला’चीच निवड का करावी?
या क्षेत्रात प्रत्यक्षात फारसे स्पर्धक नाहीत. खरं तर, सध्या जगात ‘इलेट्रिक हायड्रोफॉईल’ बोटी प्रत्यक्षात विकसित करून पुरवणारी, आमचीच एकमेव कंपनी आहे, असे म्हणणे योग्य ठरेल. या क्षेत्रात आम्ही आघाडीवर आहोत.
’P-१२’ मध्ये ८० टक्क्यांपर्यंत कमी ऊर्जावापराचा दावा केला जातो. ‘हायड्रोफॉईल’ तंत्रज्ञानामुळे हे प्रत्यक्षात कसे शय होते?
८० टक्के ऊर्जाबचत होण्याचे मुख्य कारण म्हणजे, बोटीचा मोठा भाग (हुल) पाण्यात नसतो, फक्त ‘हायड्रोफॉईल’चे पंखच पाण्यात असतात. परिणामी, घर्षण मोठ्या प्रमाणात कमी होेऊन, बोट चालवण्यासाठी लागणारी ऊर्जादेखील कमी लागते. याशिवाय, आम्ही अत्याधुनिक संगणक प्रणाली, सेन्सर्स आणि सॉफ्टवेअरचा वापर करून बोटीचे नियंत्रण करतो. त्यामुळे बोट अधिक स्थिर राहते आणि लाटांचा परिणाम कमी होतो. यामुळे धक्के कमी होतात आणि पाण्यातील लाटादेखील कमी निर्माण होतात, यांचा सर्वाधिक फायदा होतो.
पारंपरिक डिझेल बोटींच्या तुलनेत या बोटीचे फायदे कोणते?
इलेट्रिक वाहनांप्रमाणे सुरुवातीला बॅटरी उत्पादनामुळे जास्त पर्यावरणीय परिणाम होत नाहीत. कारण, आमच्या बोटी एकूणच कमी साहित्य वापरून तयार केल्या जातात. पारंपरिक फेरी स्टील किंवा अॅल्युमिनियमपासून बनवल्या जातात, तर आम्ही हलकेपणा टिकवण्यासाठी ऑप्टिमाईझ्ड कार्बन फायबरचा वापर करतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच पर्यावरणीय परिणाम कमी असतो. कार्यक्षमतेच्या दृष्टीने आम्ही सुमारे ८० टक्के ऊर्जाबचत साध्य करतो. जर ही बोट हरितऊर्जेवर चालवली गेली, तर कार्बन उत्सर्जनात ९० टक्क्यांपर्यंत घट करता येते.
मुंबईकर, ‘कॅन्डेला’ झ-१२ विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. तेव्हा, फेरीबोटीची वैशिष्ट्ये, तिच्या प्रवासी क्षमतेविषयी काय सांगाल?
‘कॅन्डेला’ ही फेरी १२ मीटर लांब आणि ४.५ मीटर रुंद आहे. ती एकावेळी सुमारे ३० प्रवाशांना घेऊन जाऊ शकते. तसेच, कमी आसने असलेला ‘बिझनेस-लास’ हा पर्यायदेखील या फेरीबोटीत उपलब्ध आहे. या बोटीची रेंज सुमारे ४० नॉटिकल मैल (अंदाजे ७५ किमी) आहे आणि ती ३० नॉट्स (सुमारे ५५ किमी/तास) इतया कमाल वेगाने धावू शकते. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा बेट असा आता वापरात असणार्या फेरीने प्रवास केला, तरी त्या फेरीच्या तुलनेत आमची फेरी अधिक वेगवान असेल.
‘स्टॉकहोम’सह इतर प्रकल्पांनंतर, ‘कॅन्डेला’च्या जागतिक धोरणात भारत आणि महाराष्ट्र किती महत्त्वाचे आहेत?
भारत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, भारतात प्रचंड क्षमता आहे. मात्र, येथे जलमार्गांचा पुरेसा वापर झालेला नाही. मुंबईसारख्या शहरांमध्ये वाहतुककोंडी ही मोठी समस्या आहे. अशा ठिकाणी जलमार्ग हे जलद व अधिक ठोस पर्याय ठरू शकतात. समुद्रमार्गे प्रवासाचा कालावधी निश्चित असतो, रस्त्यावरील वाहतुकीपेक्षा तो अधिक विश्वासार्हही असतो. तसेच, या बदलासाठी सरकारची ठोस भूमिका आम्हाला अत्यंत प्रभावी वाटली. या परिवर्तनाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
मान्सूनच्या काळात फेरीबोटींचे एकूणच व्यवस्थापन कसे केले जाईल?
मुंबईत मान्सून हा जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे आव्हानात्मक काळ असतो. त्यामुळे सुरुवातीला आम्ही सावध भूमिका घेणार आहोत. सध्या चालू असलेल्या फेरीबोटींप्रमाणेच, त्याच कालावधीत या फेरीची सेवा सुरू असेल. भविष्यात मान्सूनमध्ये सेवा देण्याचा विचार करू शकतो; मात्र सुरक्षिततेला आमच्याकडून नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
पहिल्या टप्प्याची सुरुवात कधी अपेक्षित आहे?
पहिली फेरी बोट मे २०२६च्या अखेरीस येण्याची अपेक्षा आहे. ‘कस्टम लिअरन्स’नंतर, जूनच्या सुरुवातीला ही बोट सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र जागतिक गुंतवणुकीच्याही केंद्रस्थानी दिसतो. तेव्हा, आंतरराष्ट्रीय टेंडरिंग आणि परदेशी सहभाग सुलभ करण्यात महाराष्ट्राच्या धोरणांची परिणामकारकता कशी आहे?
माझ्या मते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले दमदार नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून राबवण्यात येणार्या उपक्रमांमुळे, महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढे जात असल्याचे स्पष्टपणे दिसते. भारतात सागरी धोरण विकसित करून, ‘वॉटर मेट्रो’ नेटवर्क उभारण्याचे सक्रिय काम करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. अशा प्रकारची स्पष्ट दिशा, महत्त्वाकांक्षा आणि ठोस आराखडा आंतरराष्ट्रीय कंपन्यांना सहभागासाठी अधिक सुरक्षित बनवतो. तसेच, पूर्वी अडथळा ठरणारी लालफितीची प्रक्रिया कमी करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. यासोबतच, मंत्री नितेश राणे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आमच्या कंपनीलाही अधिक चांगले काम करण्यासाठी त्यांनी सतत प्रोत्साहन दिले. मुंबईमध्ये आमची बोट सेवा सुरू करण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यातही मदत केली. नियमावली समजून घेण्यात आणि प्रक्रिया सुलभ करण्यातही त्यांनी मोठी मदत केली. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि त्यामागील प्रभावी अंमलबजावणी खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यामुळे या उपक्रमाचा मोठा भाग होण्यास आम्ही उत्सुक असून, मुंबईला आमचे प्रमुख प्रादेशिक केंद्र करण्याची आमची इच्छा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटीचा अनुभव कसा होता?
मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक वेळा भेटण्याची संधी मिळाली. नेमके काय साध्य करायचे आहे, हे ते चांगल्या प्रकारे जाणतात. ते इतया सोप्या भाषेत समजावून सांगतात की, कोणालाही त्यांचं म्हणणं अगदी सहज लक्षात येईल. केवळ दृष्टी आणि स्पष्ट संवादच नव्हे, तर त्यांच्या टीममार्फत ते कामाचा पाठपुरावादेखील अत्यंत प्रभावीपणे करतात. माझ्या मते, ते अतिशय साधे व्यक्तिमत्त्व आहेत. लोकांच्या गरजा समजून घेतात आणि नवकल्पनांचा लोकांना लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी वेगाने काम करण्यावर भर देतात.
मंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीविषयी आपला अनुभव काय आहे?
माझ्या मते, मंत्री नितेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्याच विचारसरणीचे आहेत. राणे मंत्रिमंडळातील एक तरुण मंत्री असून, नव्या पिढीच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या कशा पूर्ण करायच्या, याची त्यांना चांगलीच जाण आहे. प्रत्येक वेळी त्यांच्याशी संवाद साधताना, त्यांचे धोरण आणि व्हिजन अत्यंत स्पष्ट असल्याचे जाणवते. एखादा मंत्री किंवा राजकारणी तुम्हाला आव्हान देतो, तुमच्याकडून सर्वोत्तम काम करून घेतो आणि तेही अधिक वेगाने करण्यास प्रवृत्त करतो, असे क्वचितच पाहायला मिळते.
भारतात किंवा महाराष्ट्रात व्यवसाय विस्ताराची काही योजना आहे का?
याचे सोपे उत्तर म्हणजे ‘होय!’ आम्हाला महाराष्ट्र हा एक मोठा ‘इनोव्हेशन हब’ आहे. भारतात अनेकजण बंगळुरु आणि इतर शहरांचा उल्लेख करतात पण आमच्या मते, महाराष्ट्रही तितकेच महत्त्वाचे नवोन्मेष केंद्र आहे. महाराष्ट्र सरकारकडून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रभावी धोरणे राबवली जात आहेत. येथे मागणी, नवकल्पना आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने, भविष्यात उत्पादन प्रकल्प उभारण्याची मोठीच संधी आम्हाला दिसते. महाराष्ट्रात धोरण, मनुष्यबळ आणि नवोन्मेषी विचारसरणी यांचा उत्तम संगम दिसतो. आम्ही या प्रकल्पाकडे फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित म्हणून पाहात नाही, तर आशिया-प्रशांत, मध्य-पूर्व आणि आफ्रिका यांसाठीचे एक प्रादेशिक केंद्र म्हणून पाहात आहोत.
मुंबईकरांसाठी हा फेरी प्रवास किती परवडणारा असेल?
परवडणार्या प्रवासाबाबत बोलताना सध्या लोक किती खर्च करतात, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ऑपरेटरच्यादृष्टीने पाहिले, तर त्यांना बोटीची खरेदी, तिची देखभाल आणि इंधन खर्चही करावा लागतो. त्यासोबत दुरुस्तीचा खर्चही असतो. या तुलनेत आमच्या बोटींचा खर्च खूपच कमी आहे. पारंपरिक बोटींसाठी दर १००-२०० तासांनी सर्व्हिसिंग करावी लागते, तर आमच्या बोटींसाठी सुमारे तीन हजार तासांनीच सर्व्हिसिंग आवश्यक असते. तसेच, आम्ही पाण्यापासून ठरावीक उंचीवर तरंगत असल्यामुळे, बोटीचा फक्त सुमारे पाचच टक्के भाग पाण्याशी संपर्कात असतो. परिणामी, कमी ऊर्जा लागते आणि मोठ्या बॅटरीची गरजही भासत नाही. यामुळेच एकूण खर्च कमी होतो. जेव्हा ऑपरेटरचा खर्च कमी होतो, तेव्हा प्रवाशांसाठीचे भाडेही कमी ठेवता येते. त्यामुळे याचा फायदा प्रवासी आणि ऑपरेटर दोघांनाही होतो.
प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव कसा असेल?
पारंपरिक बोटीमध्ये समुद्रात प्रवास करताना ‘सी-सिकनेस’, ‘रोलिंग’ आणि ‘पिचिंग’ जाणवते. पण, आमच्या बोटीमधून प्रवास करताना, विमानात बसल्यासारखा अनुभव येतो. कंपने नाहीत, समुद्रात उलटीसारखा त्रास होत नाही आणि बोटीचा मोठा आवाजही नसतो. त्यामुळे तुम्ही सहजपणे संवाद साधू शकता. याशिवाय, हा प्रवास शून्य उत्सर्जन असलेला, पर्यावरणपूरक आणि तितकाच किफायतशीर आहे. त्यामुळे सर्वच दृष्टिकोनांतून हा अनुभव अधिक चांगला ठरतो.