धुळे जिल्ह्यातील साक्री तालुयात, बुराई नदीच्या उत्तर काठावर एक शांत गाव वसलेले आहे, बलसाणे! बाहेरून पाहिले, तर हे गाव इतर कुठल्याही खान्देशी खेड्यासारखेच वाटते. पण या गावाच्या शिवारात उभ्या आहेत, नऊहून अधिक प्राचीन मंदिरांच्या भग्न, परंतु बोलया वास्तू. हेन्री कझन्स, पर्सी ब्राऊन, ए. व्ही. नाईक, जी. बी. देगलूरकर भारतीय स्थापत्यशास्त्राच्या या दिग्गज अभ्यासकांनी या स्थळाला वेळोवेळी भेटी देऊन, त्याचे दस्तऐवजीकरण केले. तरीही बलसाणे आजपर्यंत पर्यटनाच्या मुख्य प्रवाहाबाहेरच राहिले. हा मंदिरसमूह पाहण्यासाठी येणार्यांची संख्या नगण्य असून, तीच शोकांतिका आहे.
बलसाणेचा सर्वांत जुना लिखित उल्लेख १२व्या शतकातील एका शिलालेखात आहे. त्यात या गावाचे नाव ‘बलसाणके’ असे आहे. हा शिलालेख गावातील मठाच्या प्रवेशद्वाराच्या आडव्या दगडावर कोरलेला आहे. त्यात उल्लेख आहे की, "पंडित महालुक याने इसवी सन ११८४ मध्ये बुराई नदीच्या काठावरील या राजमठाचा जीर्णोद्धार केला आणि तो ब्राह्मणांच्या वास्तव्यासाठी पुन्हा बांधला.” म्हणजे हा मठ मूळचा ११व्या शतकातील असावा आणि त्याच्या भोवतालची मंदिरे त्याहूनही जुनी!
इतिहासाचे धागे उलगडण्याचा प्रयत्न केला, तर बलसाणे हे यादव काळातील मध्ययुगात एक सांस्कृतिक केंद्र असल्याचे दिसते. प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ ए. व्ही. नाईक यांनी १९४२ मध्ये दिलेल्या भेटीच्या वेळी निरीक्षण केले की, येथील मंदिरांच्या शिखरांवर मालवाच्या परमार शैलीचा आणि जंघेवर गुजरातच्या चालुय शैलीचा प्रभाव दिसतो. दक्षिणेकडे राष्ट्रकूट, उत्तरेकडे परमार आणि पश्चिमेकडे गुजरातचे चालुय या तीन सांस्कृतिक प्रवाहांचा संगम येथील स्थापत्यात दिसतो, हे बलसाणेचे वैशिष्ट्य.
बलसाणेच्या मंदिरांमध्येमंदिर क्र. एक सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण आणि जुने आहे. हे दख्खनमधील सर्वांत जुने ‘त्रिकूट मंदिर’ असण्याची शयता आहे. म्हणजे, एकाच मंडपाशी तीन स्वतंत्र गर्भगृहे जोडलेली असलेले मंदिर. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून पूर्व दिशेला शिवाचे, दक्षिणेला विष्णूचे आणि उत्तरेला देवीचे-बहुधा पार्वतीचे गर्भगृह आहे. तिन्ही गर्भगृहे अंतराळाद्वारे मध्यवर्ती मंडपाशी जोडलेली आहेत.
या मंदिराचे शिखर भूमिज शैलीचे आहे. हे दख्खनच्या मंदिर स्थापत्याचे एक वैशिष्ट्यपूर्ण रूप. पर्सी ब्राऊन यांनी या शिखराची तुलना थेट अंबरनाथ शिवमंदिराशी करुन, दोन्ही एकाच कालखंडातील असल्याचे सांगितले आहे. भूमिज शिखराचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक बाजूच्या केंद्रवर्ती उभ्या पट्ट्यांमध्ये लहान लहान उरुश्रृंगांच्या (छोटी शिखरे) रांगा आहेत. ही रचना दख्खनचे वेगळेपण अधोरेखित करते.
मंदिराच्या आतील भागात चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकार वितान (छप्पर) आहे, ज्यावर फुलाफुलांची नक्षी बघायला मिळते. द्वारशाखा ‘पंचशाखा’ पद्धतीच्या आहेत. आतील शाखेवर वेलबुट्टी, दुसर्यावर संगीतकारांसह फुलांची नक्षी, मध्यभागी स्तंभशाखा, चौथ्यावर स्वारांसह व्याल आणि बाहेरील शाखेवर पुन्हा वेलबुट्टी. द्वाराच्या वरच्या खाचांमध्ये नृत्यांगनांच्या मूर्ती, तर काही खाचांमध्ये महिषासुरमर्दिनी आणि गणेश. हे शिल्पांचे विश्व प्रचंड समृद्ध आहे.
कोष्ठांमध्ये काही विलक्षण शिल्पे आहेत. शिवाच्या गर्भगृहाच्या भद्रावर नटेश, भैरव आणि महाकाली; विष्णूच्या गर्भगृहाच्या भद्रावर नरसिंह, दुर्गा आणि त्रिविक्रम! शिवाच्या मंदिरात त्रिविक्रमाची प्रतिमा असणे, हे एकाचवेळी शास्त्राच्या नियमांची मर्यादा आणि त्यापलीकडचे सांस्कृतिक सहजीवन सांगते.
मंदिर क्र. एकच्या जंघेवर असलेल्या विशेष नक्षीला ‘गुम्फना’ म्हणतात. शिल्पप्रकाश या प्राचीन शिल्पशास्त्राच्या ग्रंथात या नक्षीचे वर्णन आहे. एक वेटोळे असलेली वेल, ज्याच्या वर्तुळांमध्ये वाघ, हत्ती, पक्षी असे प्राणी कोरलेले असतात. बलसाणेच्या या मंदिरावर हे ‘गुम्फना’ प्रत्यक्ष आहे. म्हणजे हे मंदिर बांधणार्या कारागिरांनी त्या काळचे शिल्पशास्त्र ग्रंथ अभ्यासांती दगडात उतरवले!
बलसाणेच्या दुसर्या मंदिरगटातील मंदिर क्र. पाच हे एक वेगळ्याच प्रकारचे कोडे आहे. आज येथे ‘कानबाई माता’ या नावाने ओळखली जाणारी देवी विराजमान आहे. हे वैष्णव मंदिर आहे, असे स्थानिक सांगतात. परंतु, या मंदिराचा मूळ आराखडा पाहिला, तर एक विलक्षण गोष्ट दिसते. गर्भगृह, अंतराळ, मंडप आणि मुखमंडप यांच्या दोन्ही बाजूंना एकूण दहा छोटी उपगर्भगृहे आहेत. त्या प्रत्येकात विष्णूच्या एका अवताराची मूर्ती असण्याची योजना होती. हे दशावतार मंदिर आहे!
कुमुद कानिटकर यांच्या संशोधनात, या मंदिराच्या उपगर्भगृहांच्या उंबरठ्यांवर विविध कोरीव प्रतिमा आढळतात. कोठे वराह, कोठे नृसिंह, कोठे वामन दहा अवतारांनी वेढलेला, तर एका उंबरठ्यावर नवग्रहांची मांडणी दिसते. मंदिराच्या अंगणात लाल रंगाने रंगवलेला एक विशाल यज्ञवराहही दिसतो. त्याच्या अंगावर असंख्य देवता आणि ऋषींच्या सूक्ष्म प्रतिमा कोरलेल्या आहेत. यज्ञवराह असणे हे त्या जागांचे महत्त्व अजूनच अधोरेखित करते. अतिशय महत्त्वाच्या ठिकाणीच आपल्याला यज्ञवराह दिसून येतो. यात वराह आकारातच तो असतो, पण त्याच्या अंगावर अनेक देवता कोरलेल्या असतात. समोर लक्ष्मी असते, तर पायाशी विष्णूची लांच्छने कोरलेली असतात.
मंदिरांपासून जवळ असलेल्या मठाच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख, हा सर्वाधिक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज आहे. पाच ओळींच्या संस्कृत शिलालेखात उल्लेख आहे की, पंडित महालुक, जो गणित आणि धर्मशास्त्रात पारंगत होता, त्याने राजा कृष्णास पृथ्वी मिळवण्यात मदत केली आणि त्याने हा राजमठ ब्राह्मणांसाठी जीर्णोद्धरित केला. शेवटची ओळ सांगते की, हा मठ शेकडो कल्पांपर्यंत टिकावा. शिलालेखाचा लेखक होता, ‘दंड’ नावाचा वास्तुशिल्पी. एका मठाच्या दगडावर त्याच्या निर्मात्याचे नाव कोरलेले असणे, हे मध्ययुगीन कारागिरीच्या अभिमानाचे एक दुर्मीळ उदाहरण आहे.
मठाचा आतील भाग साधा आहे. चार मध्यवर्ती खांब छताला आधार देत होते आणि दोन्ही टोकांना दोन छोटे कक्ष होते. आज फक्त भिंतीच उरल्या आहेत.
बलसाणेचा मंदिर मंदिरसमूह वेरूळ (एलोरा) गुंफांच्या (आठवे शतक) आणि सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराच्या (११वे शतक) दरम्यानचा एक महत्त्वाचा दुवा आहे. म्हणजे, दख्खनच्या मंदिर परंपरेतील एक संक्रमणकाळच् बलसाणेत गोठलेला आहे. दगड कोरण्याच्या कलेतून खडक खोदण्याकडे आणि तेथून मोकळ्या जागी स्वतंत्र मंदिर उभारण्याकडे हा प्रवास स्पष्टपणे दिसतो.
अभ्यासकांनी एक महत्त्वाची गोष्ट नोंदवली आहे. बलसाणेच्या सर्व मंदिरांचे बांधकाम १५० वर्षांच्या कालखंडात झाले. मंदिर क्र. दोन सर्वांत जुने (इसवी सन १०५०-११००), त्यानंतर क्र. एक आणि चार (सन ११०० च्या आसपास) आणि क्र. पाच नंतरचे (सन ११५०-१२००). या क्रमात उत्क्रांती दिसते. पहिल्या मंदिरांवर शिल्पांचा बहर आहे, नंतरच्यांवर बाह्य शिल्पे कमी होतात. कुमुद कानिटकर यांच्या विश्लेषणानुसार हे एक शैलीतील परिवर्तन आहे. १२वे शतक उलटताना, दख्खनच्या मंदिरांवरील बाह्यांग अलंकार साध्या भूमितीय नमुन्यांकडे वळू लागले.
बलसाणे धुळ्यापासून जवळ आहे, मुंबई-धुळे महामार्गावरून साक्री मार्गे सहज जाता येते. तरीही येथे माहितीफलक नाहीत, उचित रस्ते नाहीत आणि संरक्षण तुटपुंजे आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या यादीत काही मंदिरे आहेत; मात्र सक्रिय संवर्धनाचा अभाव दिसतो. या मंदिरांसमोर उभे राहिल्यावर खरा इतिहास हा केवळ दगडांत असतो, याची जाणीव होते. बलसाणेचा मंदिरसमूह आपल्याला हेच सांगतो की, खान्देशाची भूमी केवळ ज्वारी-बाजरीची नाही; ती एका अत्यंत समृद्ध, बहुस्तरीय सांस्कृतिक इतिहासाचीही भूमी आहे. ती ओळखण्याची, जपण्याची आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे.
इंद्रनील बंकापुरे