जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांच्यात सातत्य ठेवून केलेल्या आठ वर्षांच्या कठोर तपश्चर्येला आलेले फळ प्रत्यक्ष अनुभवणार्या मखमलाबादच्या वैजंती विजय लिलके हिच्याविषयी...
घरची परिस्थिती अगदीच बेताची असल्याने टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडिलांच्या पाचवीला पूजलेल्या मोलमजुरीने अजूनही पाठ सोडलेली नाही. जसे मिळेल तसे वडील घरांना रंग देण्याचे काम करतात. अशा हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना गरिबीचे चटके सहन करत चांगले शिक्षण दिले. एक मुलगी स्पर्धा-परीक्षेची तयारी करत असून, दुसरी लहान मुलगी वैजंती हिची नुकतीच पोलीस दलात निवड झाली आहे. वैजंती हिने उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तब्बल आठ वर्षे कठोर मेहनत घेतली. या मेहनतीच्या आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर पोलीस भरतीसाठी सतत केलेल्या प्रयत्नांना यंदा यश आले असून, तिची नाशिक ग्रामीण पोलीस दलात निवड झाली आहे. आपला पाल्य लहान असताना शाळेत गेल्यानंतर त्यांना विचारले जाते, ‘तू काय होणार?’ त्यावर तेही अगदीच निरागस भावनेने आपल्याला ‘डॉक्टर व्हायचं’, ‘पोलीस व्हायचं’ किंवा ‘इंजिनिअर व्हायचं,’ अशा प्रकारची बाळबोध उत्तरे देतात. अशीच काहीशी भावना नाशिक शहराला लागूनच असलेल्या मखमलाबाद गावातील कोळीवाडा भागात राहणार्या वैजंती विजय लिलके हिची आहे. तिला जसे कळायला लागले, तेव्हापासूनच पोलीस होण्याची आवड होती. ही आवड जोपासण्यासाठी तिने नेहमीच शर्थीचे प्रयत्न केले.
आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी तिने कधीच हार मानली नाही. आपल्याकडे असलेली जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर ग्रामीण पोलीस दलात जाण्याची भरारी तिने घेतली. अजूनही तिचे वडील विजय लिलके हे रंगकाम काम करतात. कधी हाताला काम नसेल, तर पत्नीला सोबत घेत इतरांच्या शेतात जाऊन मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांची मोठी मुलगी ‘विनंती’ ही स्पर्धा-परीक्षेची तयारी करत आहे, तर भाऊ शिक्षण घेत आहे. मखमलाबाद येथील नाशिक महापालिकेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेऊन बारावीपर्यंतचे शिक्षण गावातील ‘मविप्र’ संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. दरम्यान, वैजंती हिला पोलीसच व्हायचे असल्याने तिने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उर्वरित पदवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच कला-वाणिज्य महाविद्यालयातून बाहेरून केले. साधारणपणे २०१८ सालापासून तिने पोलीस भरतीसाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. पण, घरची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची असल्याने तिने माडसांगवी येथील ‘संघर्ष करिअर अॅकेडमी’मध्ये प्रवेश घेतला. याच ठिकाणी सतत आठ वर्षे सातत्याने ती सराव करत राहिली.
नाशिक ग्रामीण पोलीस दलात तिने दोनवेळा प्रयत्न केले; परंतु यश मात्र काही पदरात पडत नव्हते. पण, तिने हार न मानता आपले प्रयत्न सुरूच ठेवले. त्यात तिची उंची अगदी काही मिमीने कमी असल्याने तिला डावलले जात होते. पण, तिच्या नशिबाचे फासे तिच्या बाजूने पडलेच. २०२५ मध्ये शासनाचा ’जीआर’ निघाला आणि त्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातून येणार्या मुलींना उंचीसाठी सवलत मिळाली. त्याचा फायदा झाल्याने लगेचच वैजंती हिची बुलढाणा येथे पोलीस भरतीसाठी निवडही झाली; परंतु जागा एक आणि ती पदरात पाडून घेण्यासाठी उमेदवार मात्र दोन अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण, दोघींनाही सारखेच गुण मिळाले होते. परिणामी, वैजंतीला ‘वेटिंग‘ वर ठेवण्यात आले. त्यानंतरही आपल्या प्रयत्नांत तसूभरही फरक पडू न देता, वैजंतीने प्रयत्न सुरूच ठेवले आणि नाशिक ग्रामीण पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. यावर्षी सगळेच जुळून आल्याने अखेर तिच्या प्रयत्नांना यश आले. सततचे अपयश पचवलेल्या वैजंती आणि तिच्या कुटुंबासाठी मिळालेले हे यश निश्चित सुखावणारे होते.
पोलीस दलात निवड झाल्यानंतर वैजंती हिने दिलेली प्रतिक्रियाच तिच्या यशाचे महत्त्व अधोरेखित करते. संवाद साधताना ओलावलेल्या डोळ्यांनी ती सांगू लागते की, "लहानपणापासूनच पोलीस व्हायची इच्छा होती. पण, घरची परिस्थिती बेताची असल्याने आई-वडिलांना मोलमजुरीशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मी आणि माझी मोठी बहीण विनंती हिनेही शिकून काहीतरी चांगले करायचे, असे मनात कायमचे कोरले. त्या बळावरच मोठी बहीण सध्या स्पर्धा-परीक्षेची तयारी करत असून भाऊसुद्धा शिक्षण घेत आहे. तर, मी गेल्या आठ वर्षांपासून माडसांगवी येथील ‘संघर्ष करिअर अॅकेडमी’मध्ये सातत्याने पोलीस भरतीचा सराव केला. तिथे सराव करत असताना पदवीपर्यंतचे शिक्षणही बाहेरून पूर्ण केले. दोनवेळा ग्रामीण पोलीस दलात प्रवेश करण्यासाठी अपयश आले; पण मनात जिद्द ठेवल्याने तिसर्या वेळी यश मिळाले,” असे वैजंती विजयी मुद्रेने सांगते. अशा या स्वप्नवेड्या तरुणीला उंच भरारी घेण्यासाठी कायमच तिच्या पंखांना बळ मिळावे, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत‘कडून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
- विराम गांगुर्डे