‘जिहाद’ विरुद्ध ‘क्रुसेड’

    25-Apr-2026
Total Views |
US–Iran Conflict 
 
अमेरिकेचे इराणविरुद्धचे युद्ध हे ‘क्रुसेड विरुद्ध जिहाद’ असे युद्ध आहे. असे युद्ध भूमी जिंकण्यासाठी, राज्यतंत्र बदलण्यासाठी केवळ केले जात नाही, तर लोकांची जीवनमूल्ये बदलण्यासाठी केली जातात. गेल्या ७० वर्षांचा अमेरिकेचा अशा प्रकारचा इतिहास हा पूर्णपणे अपयशाचा इतिहास आहे. या अपयशातून ते काही शिकत नाहीत आणि पुन्हा त्याच त्याच चुका करून प्राप्त झालेल्या प्रचंड सैन्यशक्तीचा वापर करून जगावर प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
 
दुसर्‍या महायुद्धात जर्मन आणि जपानचा पराभव करून अमेरिका जगातील एक महासत्ता म्हणून उभी राहिली. त्याचवेळी रशियाचादेखील महासत्तेच्या रूपाने उदय झाला. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या भाषेत सांगायचे तर, जग दोन ध्रुवीय झाले. एक ध्रुव रशिया आणि कम्युनिस्ट राष्ट्रांचा आणि दुसरा ध्रुव अमेरिका आणि अन्य लोकशाही राष्ट्रांचा. रणांगणावरील युद्ध संपले आणि नंतर शीतयुद्ध (कोल्ड वॉर) सुरू झाले. हे शीतयुद्ध ‘आयडॉलॉजिकल वॉर’ म्हणजे ‘सैद्धांतिक युद्ध’ होते. तेव्हा अमेरिकेचे धोरण होते की, जगात रशियन कम्युनिझमचा प्रचार होऊ द्यायचा नाही. अन्य देशांत कम्युनिस्ट राजवटी होऊ द्यायच्या नाहीत. त्या झाल्या, तर उठाव करून त्या उलथावून पाडायच्या किंवा सैन्य पाठवून त्या राजवटी संपवून टाकायच्या. २५ वर्षांहून अधिक काळ चाललेले व्हिएतनाम युद्ध हे कम्युनिझमचा प्रचार रोखण्यासाठी झालेले युद्ध आहे.
 
या शीतयुद्धांत ज्या देशांना भूसामरिक महत्त्व प्राप्त झाले, त्यात इराण हा एक देश. इराणमध्ये कम्युनिस्ट राजवट येऊ नये, म्हणून अमेरिकेने इराणमध्ये हस्तक्षेप सुरू केले. लोकशाहीने निवडून आलेले मोहम्मद मोसादेघ यांचे शासन उलथून पाडले आणि त्याच्या जागी मोहम्मद रझा शहा पहलवी या राजाला आणून बसविले. तेव्हा अमेरिका आणि इराण यांचे मधुर संबंध होते. ‘मध्य-पूर्वेचे रक्षण करणारा पोलीस’ म्हणजे इराण, अशी इराणची प्रतिमा अमेरिकेने तयार केली. इराणला प्रचंड शस्त्रे देऊन शस्त्रसज्ज केले. एक अणुभट्टी देऊन अणू तंत्रज्ञानही शिकविले. इराणच्या राजवटीत बदल झाला; परंतु इराणची जनता अमेरिकेची शत्रू झाली. इराणची काही शक्तिस्थाने आहेत. त्यातील पहिले शक्तिस्थान इराणची प्राचीन संस्कृती आणि सांस्कृतिक मूल्य. दुसरे शक्तिस्थान - इराणचा शिया इस्लाम. इराणने इस्लाम धर्म स्वीकारला; परंतु आपली राष्ट्रीय ओळख अरबी इस्लाममध्ये विलीन केली नाही. त्यांची नावे अरबी नसतात. होसेनी, खोमेनी, नासेरी, नवबी, सुलेमानी ही खास इराणी नावे आहेत. परमेश्वराला ते ‘अल्ला’ म्हणत नाहीत, ‘खुदा’ म्हणतात. त्यांचा पोशाखही अरबी नसतो, तो खास इराणी पोशाख असतो. ही स्वतंत्र ओळख इराणी जनतेला शक्ती देते.
 
मोहम्मद रझा शहा पहलवी याच्या जुलमी शासनाला लोक कंटाळले, त्यांनी आंदोलने सुरू केली. त्यांना दाबून टाकणे पहलवीला शक्य झाले नाही. १९८९ साली त्याला देश सोडावा लागला आणि १४ वर्षे विजनवासात असलेले अयातुल्ला खोमेनी इराणमध्ये परत आले. इराणमध्ये इस्लमिक क्रांती झाली. या क्रांतीचे आधार तीन होते. १) पहलवी घराण्याचा कट्टर विरोध २) कट्टर अमेरिका विरोध ३) कट्टर शिया इस्लाम भक्ती. अमेरिकेचा आताचा संघर्ष हा या इराणी मानसिकेविरुद्धचा संघर्ष आहे. अमेरिकेला असे वाटले की, राष्ट्रप्रमुख खोमेनी आणि त्यांचे सहकारी सेनापती यांना ठार केले की, राजवट बदलेल. त्यांना हवी असलेली राजवट येईल. मोहम्मद रझा पहलवीचा मुलगा अजून जिवंत आहे, तोही गुडघ्याला बाशिंग बांधून बसला आहे. अमेरिकेचे हे सर्व अंदाज पूर्णपणे फसलेले आहेत. अमेरिकेचा हा संघर्ष इराणी राजवटीविरुद्धचा संघर्ष नसून, तो इराणी जीवनशैली आणि इराणी धर्माविरुद्धचा संघर्ष आहे.
 
शीतयुद्ध संपल्यानंतर अमेरिकेने आपले लक्ष्य आणि शक्ती मध्य-पूर्वेतील मुस्लीम देशांवर केंद्रित केली आहे. त्याला शब्दप्रयोग केला ‘ग्रेटर मिडल ईस्ट.’ त्याचे कारण असे की, या देशांत प्रचंड तेलसाठे आहेत. अमेरिकेची तेलाची भूक ही बकासुरी भूक आहे. अमेरिकेत दरडोई तेलाचा वापर ९०८ गॅलन (१ गॅलन म्हणजे ३.७८४ लीटर) त्या तुलनेत भारतातील तेलाचा दरडोई वापर हा एकूण ६० गॅलन आहे. आपल्या देशातील जनतेचे जीवनमान कायम ठेवण्यासाठी तेलाचा पुरवठा आपल्याला मुबलक व्हावा, ही अमेरिकेची गरज. व्हेनेझुएलामध्ये तेलाचे प्रचंड साठे आहेत. म्हणून त्या देशावर अमेरिकेने नुकतेच आक्रमण केले आणि राष्ट्राध्यक्षाला पकडून आणले. इराणकडे जगातील समृद्ध तेलसाठा आहे. त्याच्या राष्ट्रप्रमुखाला ठार केले.
 
अमेरिकेने आतापर्यंत मध्य-पूर्वेतील देशांवर वेगवेगळ्या कारणांनी सैनिकी हल्ले केले आहेत. प्रथम इराक, त्यानंतर लिबिया याअर्थाने मध्य-पूर्वेचा भाग नसलेला अफगाणिस्तान. या देशांवर प्रत्यक्ष सैन्य कारवाया झालेल्या आहेत. याच्या जोडीला बहारीन, कुवेत, युएई, जॉर्डन अशा अनेक देशांत अमेरिकेचे सैनिक तळ उभे आहेत. ज्या देशांवर अमेरिकेने लष्करी कारवाया केल्या तिथल्या राजवटी उलथून पाडल्या, त्या देशात अमेरिकेला हवी असलेली लोकशाही राजवट अमेरिकेला उभी करता आलेली नाही.
अमेरिकेची लोकशाही राजवट ही ‘प्रोटेस्टंट ख्रिश्चन’ धर्मतत्त्वातून जन्माला आलेली लोकशाही राजवट आहे. मार्टिन ल्युथरपासून त्याचा इतिहास सुरू होतो. अमेरिकेत वसाहतीसाठी आलेले ख्रिश्चन बहुसंख्येने प्रोटेस्टंट आणि प्युरिटन पंथाचे होते. जीवनाची सुरक्षा, मुक्तता आणि स्वतःचे सुख स्वतःच्या मार्गाने शोधण्याचा अधिकार ही त्यांची जीवनमूल्ये होती. ही अमेरिकेची आजही जीवनमूल्ये आहेत. ही प्रोटेस्टंट पंथीय लोकशाही अमेरिका कोणत्याही इस्लामी देशावर लादू शकत नाही. जिथे जिथे त्यांनी प्रयत्न केले, ते १०० टक्के फसलेले आहेत.
 
इराणमध्ये तसा प्रयत्न अमेरिकेने केला, त्याची प्रतिक्रिया म्हणून इस्लामिक क्रांती झाली. अफगाणिस्तानात तो प्रयत्न केला, त्याची प्रतिक्रिया तालिबानी राजवटीत झाली. इराकमध्ये अमेरिकेने तसा प्रयत्न केला, त्याची प्रतिक्रिया अल-बकदादीच्या खिलाफत संघटनेत झाली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जी भाषा वापरतात, त्यामध्ये ‘क्रुसेड’ असा शब्दप्रयोग येतो. आयझेनहॉवर यांनी ‘ग्रेट क्रुसेड’ असा शब्दप्रयोग केला. जॉर्ज बुश यांनी इराकवर हल्ला करताना ‘क्रुसेड’ असा शब्दप्रयोग केला. युरोपातील ख्रिश्चन देशांनी जेरुसलेमवर ताबा मिळविण्यासाठी ११व्या आणि १३व्या शतकात जी युद्धे केली, त्याला ‘क्रुसेड’ म्हणजे ‘धर्मयुद्ध’ असे म्हटले गेले. अमेरिकन राज्यकर्त्यांची भाषा सेक्युलॅरिझमची असते; परंतु मुस्लीम देशांशी युद्ध करताना त्यांना ‘क्रुसेड’ची आठवण येते. ‘क्रुसेड’ला इस्लामी प्रतिशब्द आहे ‘जिहाद!’
 
अमेरिकेचे इराणविरुद्धचे युद्ध हे ‘क्रुसेड विरुद्ध जिहाद’ असे युद्ध आहे. असे युद्ध भूमी जिंकण्यासाठी, राज्यतंत्र बदलण्यासाठी केवळ केले जात नाही, तर लोकांची जीवनमूल्ये बदलण्यासाठी केली जातात. गेल्या ७० वर्षांचा अमेरिकेचा अशा प्रकारचा इतिहास हा पूर्णपणे अपयशाचा इतिहास आहे. या अपयशातून ते काही शिकत नाहीत आणि पुन्हा त्याच त्याच चुका करून प्राप्त झालेल्या प्रचंड सैन्यशक्तीचा वापर करून जगावर प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. शीतयुद्धाचे ‘वैचारिक युद्ध’ अमेरिकेने जिंकले; कारण राज्यकर्ते ‘कम्युनिस्ट’ होते, पण जनता ‘कम्युनिस्ट’ झालेली नव्हती. ‘जिहाद विरुद्ध क्रुसेड’चे युद्ध अमेरिका सहजासहजी जिंकू शकत नाही. कारण, हे युद्ध निव्वळ सैनिकी युद्ध नसून, जनतेला मानसिकदृष्ट्या जिंकण्याचे युद्ध आहे. मानसिक युद्ध जिंकण्याची कला अमेरिकेकडे नाही. हेदेखील एक ऐतिहासिक सत्य!
 
- रमेश पतंगे