Nandgaon Inscription : नांदगाव येथे सापडला चौदाव्या शतकातील राजा हंबीरराव यांचा शिलालेख

इतिहास अभ्यासक अनिकेत पाटील यांनी केला मजकूराचा उलगडा

    25-Apr-2026
Total Views |

shilalek

मुंबई : (Nandgaon Inscription) चौदाव्या शतकातील राजा हंबीरराव यांचा दुर्मिळ शिलालेख नांदगाव, ता. मुरुड, जिल्हा रायगड येथे सापडला असून या ऐतिहासिक शिलालेखाचा उलगडा करण्यात नुकतंच इतिहास अभ्यासक अनिकेत पाटील यांना यश आले आहे. नांदगाव येथील भवानी पाखाडी इथले रहिवाशी असणाऱ्या जनार्दन चोरघे यांच्या नारळ-सुपारीच्या वाडीत हा ऐतिहासिक शिलालेख काही वर्षांपूर्वी सापडला होता. हा शिलालेख चौदाव्या शतकातील राजा हंबीरराव यांच्या कारकिर्दीत बनविण्यात आला आहे तथा आजमितीस राजा हंबीररावांचे किमान ४ शिलालेख (देवनार - BARC मुंबई, रानवड - उरण, भिमेश्वर मंदिर नागाव , वाघ्रण ता.अलिबाग इ.) उपलब्ध असुन नांदगावचा हा शिलालेख हा हंबीररावाच्या संदर्भातील पाचवा शिलालेख असल्याची माहिती अनिकेत पाटील यांनी दिली.
 
चोरघे कुटुंबीयांच्या वाडीला जलसिंचन करण्यासाठी तेथे विहीर उपलब्ध आहे. इ.स. २००० च्या सुमारास विहिरीतील गाळ काढून विहीर स्वच्छ करीत असताना एक मोठी शिळा स्वच्छता करणाऱ्यांना सापडली. ही शिळा विहिरीतून बाहेर काढून विहिरी लगतच ठेवण्यात आली. कित्येक वर्ष दुर्लक्षित असलेल्या या शिळेवरील बरीच अक्षरे व ओळी मानवी हस्तक्षेपामुळे (जसे या शिळेचा वापर काही काळ धुणी धुण्यासाठी केला जात होता) नष्ट झालेली आहेत. शिळेची लांबी व रुंदी अनुक्रमे ५६ इंच व २३ इंच असुन सदर शिळा सुस्थितीत आहे.शिळेवर लिहिलेला लेख हा देवनागरी लिपीतील असून त्यात काही प्रमाणात फारसी भाषेतील शब्दांचा देखील वापर केलेला आहे. लेखाच्या पहिल्या ओळीत हिजरी सन ७६९ नमूद केले असुन त्यापुढे शके १२८९ , पळवंग संवत्सर नमूद केले आहे. म्हणजेच हा शिलालेख इसवी सन १३६७ - ६८ मध्ये कोरण्यात आला आहे. एकंदरीत चौदाव्या शतकात वापरल्या जाणाऱ्या मराठी भाषेवर मुसलमानी भाषेचा प्रभाव होता असे जाणवते.

शिलालेखातील महत्त्वाची बाब म्हणजे लेखात नांदिगौ म्हणजे नांदगाव , मरुड म्हणजे मुरुड व चेउळ म्हणजे चौल या गावांचा उल्लेख आलेला आहे. शिलालेखात ठाणेकोंकण येथे राज्य करीत असणाऱ्या हंबीरराव या राजाचा उल्लेख “ श्रीमत्य प्रौढिप्रताप चक्रवर्ती महाराजाधिराज ” असा आढळतो. तसेच राजा हंबीररावाचा प्रमुख प्रधान ‘ सिहीप्रो ’ याचा उल्लेख सर्वव्यापारी म्हणून करण्यात आला आहे.सिहीप्रो याने समंध नांदिगौ म्हणजेच नांदगाव आगरपैकी एक वाडी फळ भोगासहित घेऊन दान केली किंवा वाटून टाकली. त्यावाडीची किंमत ४०० द्राम एवढी होती. ही किंमत अदा करून हे दान राम जोशी, कृष्ण जोशी, कुम जोशी या तिघांमध्ये समान वाटून दिले व त्यांच्याबालगोपाळांनी म्हणजेच मुलाबाळांची ते वाटून घेतले. अशा आशयाचा शिलालेख कोरण्यात आला आहे. अशी माहिती इतिहास अभ्यासक अनिकेत अशोक पाटील यांनी दिली.सदर शिलालेखाचे वाचन श्री.अनिकेत पाटील यांनी केले असून Journal of Research and Development या संशोधनपर मासिकात प्रकाशित केले आहे. तसेच या ऐतिहासिक महत्वपूर्ण शिलालेखाचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.