Mumbai local train incident : लोकल ट्रेन मध्ये पंधरा तास बेशुद्ध अवस्थेत असलेल्या (पत्रकार) रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या यंत्रणेच्या चौकशी आणि कारवाईची मागणी

    25-Apr-2026
Total Views |

mumbai local incident
 
मुंबई : (Mumbai local train incident) तब्बल पंधरा तास एखादा रुग्ण बेशुद्धावस्थेत लोकल ट्रेनच्या डब्ब्यात पडून आहे आणि तरीही रेल्वे प्रशासन किंवा पोलिसांना याची खबरही नव्हती असे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे.या प्रकरणी रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या रेल्वे पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी,तसेच यापुढे अशा घटना घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी लेखी मागणी लोकांचे दोस्त संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेच्या महा व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे. लोकांचे दोस्त चे अध्यक्ष रवि भिलाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने .मध्य रेल्वे महा व्यवस्थापक यांचे उपसचिव उमंग दुबे यांची भेट घेऊन निवेदन दिले.तसेच रेल्वेच्या सार्वजनिक तक्रार विभागात तक्रार नोंदवली. शिष्टमंडळात रवि भिलाणे यांच्यासह ज्योती बडेकर,संजीता मालणकर,प्रकाश महिपती कांबळे, आदींचा समावेश होता. (Mumbai local train incident)
 
जेष्ठ पत्रकार संजय नागनाथ शिंदे (वय वर्षे ६०) हे मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन मध्ये १५ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत जवळपास पंधरा तास बेशुद्ध अवस्थेत होते. शिंदे हे नेहमीप्रमाणे दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी धारावी परिसरात वार्तांकन करत होते. ते दुपारी चार वाजेच्या सुमारास मध्य रेल्वेच्या सायन ( शीव ) रेल्वे स्थानकावर ट्रेन पकडण्यासाठी पोहोचले. मात्र, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. संजय शिंदे यांच्या मोबाईल ची रिंग वाजत होती. पण कोणीही फोन घेत नव्हते. त्यांची काळजी वाटल्याने त्यांच्या धारावी परिसरातील मित्रांनी संध्याकाळी उशिरा धारावी पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दिली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या पत्नी सुषमा संजय शिंदे आणि मुलगा राहुल संजय शिंदे यांनी ते रहात असलेल्या डोंबिवली येथील स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार देऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.(Mumbai local train incident)
 
 
सोळा तारखेला सकाळी सात वाजेच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी राहुल संजय शिंदे यास मोबाईल वरून कळविले की संजय शिंदे हे कल्याण रेल्वे स्थानकात आहेत.त्यानुसार कुटुंबियांनी तिकडे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील खाजगी क्लिनिक मध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केल्याचे आढळून आले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शिंदे हे सकाळी सहा साडेसहा च्या दरम्यान टिटवाळा रेल्वे स्थानकात, मुंबईकडे जाण्यासाठी यार्ड मधून आलेल्या लोकल ट्रेन मध्ये आढळून आले होते. इतर प्रवाशांनी कळविल्यावरून पोलिसांनी त्यांना कल्याण रेल्वे स्थानकात उतरवून घेतले होते. पोलिसांनी त्यांना कल्याण स्थानकातील खासगी क्लिनिक मध्ये दाखल केल्यानंतर त्यांना दोन सलाईन लावली गेली. त्याचे चार हजार रुपये बिल घेऊन त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. मात्र संजय शिंदे यांची प्रकृती अतिशय गंभीर व चिंताजनक झाली होती. ते बेशुद्धच होते. म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तिथूनच कल्याण पश्चिम येथील होली क्रॉस रुग्णालयात दाखल केले. तिथे आय सी यू मध्ये दोन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तेव्हा त्यांची प्रकृती सुधारली. रुग्णालयाचे साठ हजार रुपये बिल भरून कुटुंबीयांनी त्यांना घरी आणले.अजूनही त्यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत.त्यांना गाडीतून उतरवताना पोलिसांनी मारहाण केल्याची आणि उर्मटपणे वागवल्याची शिंदे कुटुंबीयांची तक्रार आहे.(Mumbai local train incident)
 
यानिमित्ताने लोकांचे दोस्त तर्फे महा व्यवस्थापकांना पुढील प्रश्न विचारण्यात येत आहेत.
 
१ ) एखादा प्रवासी माणूस रेल्वेतून प्रवास करत असताना बेशुद्ध होऊन पंधरा तास रेल्वेत फिरत राहून अखेर यार्ड मध्ये पोहोचला तरी रेल्वे प्रशासन आणि पोलिस यांना त्याबाबत काहीच कसे कळले नाही. लोकल ट्रेन यार्ड मध्ये जाण्या आधी तिची तपासणी का करण्यात आली नाही.
 
२ ) रेल्वेचा नियमित पास किंवा तिकीट धारक प्रवासी रेल्वे मध्ये बेशुद्ध होऊन पडला असताना त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची नाही का ?
 
३ ) गंभीर अवस्थेतील सदर प्रवाशाला योग्य त्या सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णालयात का दाखल केले गेले नाही ? हा रेल्वे पोलिसांचा बेफिकीर आणि उद्दामपणा नाही का ? रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित पोलिसांवर काय कारवाई करणार ?
 
४ ) रुग्णाच्या अंगावर काठीचे व्रण दिसून आले आहेत. पोलिसांनी सदर रुग्णाला गाडीतून उतरवताना काठीने भोसकल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांनी सदर रुग्ण बेवडा असल्याचा जावईशोध लावून त्याच्या प्रति कमालीचा उद्दामपणा आणि अरेरावी केल्याचे संजय शिंदे यांचा मोठा मुलगा अमन शिंदे याने सांगितले. तो सर्वप्रथम कल्याण स्टेशनला पोहोचला होता.
 
५ ) संजय शिंदे यांनी कोणतेही नशा पान केलेले नव्हते. ते एक प्रतिष्ठित नागरिक आणि जेष्ठ पत्रकार आहेत. लोकांचे दोस्त संघटने मार्फत अनेक सामाजिक कार्यात सक्रिय असतात.अशा व्यक्तीस पोलिसांनी केलेली मारहाण आणि उपचारांमध्ये केलेले अक्षम्य दुर्लक्ष यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे नाही का ?
 
 
जरी कोणी प्रवासी नशेत असताना त्याच्या सोबत अशा प्रकारे वागण्याचा पोलिस किंवा प्रशासनाला काय अधिकार आहे ? यापुढे कोणत्याही प्रवाशांवर अशी वेळ येऊ नये म्हणून पोलिस विभाग आणि रेल्वे प्रशासन काय खबरदारी घेणार आहे ?
 
वरील प्रकरणी रेल्वे प्रशासनाने त्वरित चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी तसेच सदर रुग्णास नुकसान भरपाई द्यावी आणि यापुढे अशा घटना घडून प्रवाशांच्या जीवाशी दगा फटका होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी संघटनेने मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.(Mumbai local train incident)