बेंगळुरू : (India high speed train) "हाय-स्पीड रेल म्हणजे केवळ वेग नाही, तर भारताच्या प्रगतीचा नवा चेहरा आहे,” असे सांगत केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवार, दि.२५ एप्रिल रोजी बेंगळुरूमधील बीईएमएलच्या टिप्पसंद्रा कॅम्पसमध्ये ‘आदित्य’ या अत्याधुनिक उच्चगती रेल्वे निर्मिती संकुलाचे उद्घाटन करत देशाच्या वाहतूक क्षेत्रात नवे पर्व सुरू झाल्याची घोषणा केली.
‘आदित्य’ संकुलात सध्या 'बी-२८' प्रकारच्या आधुनिक हायस्पीड कोचची निर्मिती होणार असून, यामुळे भारतातील रेल्वे उत्पादन क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. उच्चगती रेल्वेमुळे शहरांमधील अंतर जवळजवळ नाहीसे होईल, असे सांगताना वैष्णव यांनी चेन्नई-बेंगळुरू प्रवास फक्त ७३ मिनिटांत होणार असल्याचे उदाहरण दिले. “ही दोन शहरे आता वेगळी राहणार नाहीत, तर एकाच मोठ्या आर्थिक केंद्राचा भाग बनतील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. (India high speed train)
मुंबई-बेंगळुरू मार्गासाठीही आनंदाची बातमी देताना त्यांनी दोन नव्या रेल्वे सेवांची घोषणा केली. हुबळीमार्गे एलएचबी कोचसह मुंबईसाठी नवीन मेल-एक्सप्रेस सुरू होणार असून, लवकरच वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसही धावणार आहे. यामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. याशिवाय मंगळुरू-बेंगळुरू वंदे भारत सेवा लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हसन-मंगळुरू मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, कठीण घाट विभागात सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक ऑटोमेटेड इमर्जन्सी ब्रेकिंग प्रणाली बसवण्यात आली आहे. (India high speed train)
भेटीच्या शेवटी मंत्री वैष्णव यांनी अभियंत्यांचे कौतुक करत, “भारत आता फक्त रेल्वे वापरणारा देश नाही, तर जगाला दिशा देणारा देश बनत आहे,” असा विश्वास व्यक्त केला. पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि जनजागृती यांचा समतोल राखत विकसित भारताच्या दिशेने सरकार वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. (India high speed train)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.