‘जागतिक महासत्ता’ अशी ओळख असलेलं राष्ट्र म्हणजे अमेरिका. अमेरिका म्हणजे सोनेरी स्वप्नांची मायानगरी. इथल्या विविधतेवर, प्रतिमांवर भाळून काही लोक या देशाच्या प्रेमात पडतात, तर दुसर्या बाजूला नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी, जीवनमान उंचावण्यासाठी हजारो लोक या देशात आश्रय घेतात. असे असले, तरी इराण विरुद्धच्या संघर्षामुळे आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिलहरी, विक्षिप्त स्वभावामुळे अमेरिका सध्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मग अशा या अमेरिकेच्या समाजजीवनातही काही विरोधाभास जाणवतो का? तिथल्या निसर्गसौंदर्याचं नेमकं रहस्य काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल श्रीराम नानल यांनी ‘अमेरिकेच्या अंतरंगात’ या प्रवासवर्णनपर पुस्तकातून केली आहे. काल, दि. २४ एप्रिल रोजी सातार्याच्या शनिवार पेठ येथील ‘दीपलक्ष्मी पतसंस्था हॉल’ येथे या पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन संपन्न झाले. त्यानिमित्ताने लेखकाशी साधलेला विशेष संवाद...
‘अमेरिकेच्या अंतरंगात’ या पुस्तकामागची नेमकी प्रेरणा काय आहे? आपली अनुभूती शब्दबद्ध करावी, असं का वाटलं?
मी एक निवृत्त, सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणूस. मागची अनेक वर्षे मी बँकिंग क्षेत्रामध्ये काम केले. माझ्या आर्थिक नियोजनामुळे मी अमेरिकेला जाण्याचे धाडस केले. तेथील एकंदरीत समाजजीवन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, तिथल्या संपन्नतेचे मापदंड आणि एकूणच आनंददायी जीवनाचा अभ्यास करण्याची माझी इच्छा होती. यापूर्वी ‘अपूर्वाई’, ‘माझं लंडन’ अशी मराठीतील दर्जेदार प्रवासवर्णनं मी वाचली होती. अमेरिकेला जाऊन आल्यावर माझ्या या प्रवासाबद्दल मी लिहावं, असा आग्रह ‘आम्ही पुस्तकप्रेमी’ समूहाचे डॉ. संदीप श्रोत्री, तसेच शिरीष चिटणीस यांनी केला. अमेरिकेचा संपूर्ण प्रवास करताना मी तिथल्या अनवट ठिकाणांना भेट दिली. अमेरिका समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि अखेर माझं पहिलं पुस्तक जन्माला आलं. मला असं वाटतं, अमेरिकेने जग बघण्याची नवीन दृष्टी मला दिली.
अमेरिकेत वावरताना विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये समाजात काही वेगळेपण जाणवले का?
समाजजीवनामध्ये काही वेगळे बदल मला तरी जाणवले नाही. तिथले लोक आपले काम आणि आपली जीवनशैली सांभाळून जगतात. आपापल्या जीवनामध्ये ती माणसं खूप सहजपणे रमून जातात. त्यामुळे दृश्य स्वरूपात तरी राजकीय स्थितीचा काही वेगळा परिणाम मला जाणवला नाही. मात्र, राजकीय व्यवस्थेचा इथे जनमानसांत कमीत कमी हस्तक्षेप आहे, हे लक्षात आले.
आर्थिकदृष्ट्या अमेरिका महासत्ता; मात्र अमेरिकेच्या सांस्कृतिक वर्चस्ववादाविषयी काय सांगाल?
वास्तविक, मी आपल्या ‘वर्चस्व’ या शब्दाशी सहमत होणार नाही. आपण ‘पुढारलेपण’ हा शब्द वापरूया. सांस्कृतिकदृष्ट्या अमेरिका पुढारलेली आहे. कारण, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती एकत्रपणे सुखाने नांदतात. प्रत्येक संस्कृतीला आपापल्या परीने जगण्याचा वाव आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इथे बुद्धीला आणि कार्यक्षमतेला किंमत आहे. त्याचबरोबर इथे व्यक्तीला स्वतःची कामेही स्वतःच करावी लागतात.
अमेरिकेत आपल्याला भारतीय संस्कृतीचे दर्शन कशा प्रकारे घडले?
अमेरिकेमध्ये भारतीय संस्कृतीच्या खुणा आपल्याला जागोजागी दिसतात. उदाहरणार्थ, ‘पटेल ब्रदर्स’ची दुकानं आपल्याला येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर ‘बोस्टन मॅरेथॉन’ जी जगातली पहिली मॅरेथॉन आहे, तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात भारतीय आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर भारतीय नाटकं, चित्रपट बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे लोक जमतात. आपले सण अमेरिकेमध्ये मोठा उत्साहात साजरे होतात. मला असं वाटतं की, अमेरिकेसारख्या राष्ट्राची संपन्नता, शिस्त आणि वागण्याची पद्धत याला जर भारतीय आपुलकीचा स्पर्श झाला, तर एक समृद्ध जीवनशैली जन्माला येईल.
जगभरातील बरेच तरुण, अमेरिकेकडे ‘संधी’ म्हणून बघतात. मग तरुणांसाठी हा देश नेमका कसा आहे?
कष्ट करण्याची तयारी असणार्या मनुष्याला अमेरिकेमध्ये संधी आहे. अनेक वर्षे वित्तीय क्षेत्रामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. शिक्षणासाठी कर्ज काढणारे अनेक लोक येत असतात. त्यातील काहीजण जवळपास तीन वर्षांच्या कालावधीतच कर्ज फेडायचे. शिक्षणाबरोबरच काम करण्याची संधी इथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. भारतीयांप्रमाणेच इथे मोठ्या प्रमाणात चिनी लोक उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचंसुद्धा इथे आव्हान आहे. शिक्षण व्यवसायासाठी इथे संधी आहेत. मात्र, त्याचबरोबर हॉलीवूडसारख्या क्षेत्रातसुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत.
९/११चा दहशतवादी हल्ला ही केवळ अमेरिकेसाठीच नव्हे, परंतु जागतिक राजकारणाला कलाटणी देणारीघटना होती. त्या घटनेची छाया आजही तिथल्या समाजमनावर आहे का?
निश्चितच, तिथल्या समाजमनावर याची छाया अजूनही आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहणारे एक मेमोरियल न्यूयॉर्कमध्ये आहे. त्याचबरोबर तिथे मी एक ओकचे झाड मी पाहिले, जे जळूनसुद्धा जगले. त्यामुळे ती जागाच अशी आहे की, तुम्हाला उभं राहण्याची ताकद देते. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याकडे ज्याप्रकारे महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांच्या स्मृतिस्थळांना भेट देताना लोक आरडाओरडा करतात, गप्पा मारतात, तसं कुठल्याही प्रकार तिथे होत नव्हतं. त्यामुळे त्या त्या जागेचे जे गांभीर्य आहे, ते राखलं पाहिजे, असं मला वाटतं. आपणसुद्धा तितक्याच गांभीर्याने ऐतिहासिक स्थळं जपली पाहिजेत. न्यूयॉर्कमध्ये ‘स्टॉक एक्सचेंज’च्या समोर ‘फिअरलेस गर्ल’चा पुतळा आहे. त्याबद्दल बोलताना एकदा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक म्हणाले की, तो पुतळा बघण्यासाठी लोकांची लागलेली रांग हीच तिची खरी शक्ती आहे.
युद्धकाळातील अमेरिका कशी असते? या युद्धाचे अमेरिकेच्या जनमानसावर काय परिणाम झाले आणि होतील, असे आपल्याला दिसते?
वास्तविक, या गोष्टीबद्दल भाष्य करण्याइतका मी मोठा नाही. मात्र, युद्धाचा फटका तर सगळ्यांना बसतो. महागाई वाढते, जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. त्यातून मग पुन्हा करवाढ, नोकर्यांमध्ये कपात या गोष्टी आल्या. तिथल्या सुजाण नागरिकांच्या मनामध्ये, तसेच भारतीयांच्या मनामध्ये अस्थिरता तर आहेच. मात्र, युद्ध संपावे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे संपवावे, ही आशा प्रत्येकजण व्यक्त करत आहे. ज्या वेळेला मी तिथल्या ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ला भेट दिली, तेव्हा तिथे Emma lazarus या कवयित्रीच्या काही ओळी होत्या - 'Give me your tired, your poor / You Huddled masses yearning to breathe free.! आता हे वाचताना मला संत तुकारामांची ‘जे का रांजले गांजले’ याचीच आठवण झाली. कारण, या दोन्हींची अनुभूती ही एकच आहे, असं मला वाटतं.
पुस्तक लिहिताना आपसूकच प्रकाशकांबरोबर आपलं एक नातं तयार होत जातं. हे आपलं पहिलंच पुस्तक. तेव्हा, तुमचं आणि ‘चपराक’चं नातं कसं तयार झालं?
साहित्य संमेलनामध्ये माझी आणि घनश्याम पाटील यांची भेट झाली. ‘प्रकाशन कट्ट्या’चे काम आम्ही सोबतच बघत होतो. ‘चपराक’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील लेखकांना ज्या प्रकारे उत्तेजन दिले जातं, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. वाचन संस्कृतीसाठी त्यांची असलेली तळमळ खरी आहे, असं मला वाटतं.