मातीची सौंदर्यसृष्टी

    25-Apr-2026   
Total Views |
 Art Exhibition
 
प्रभादेवीमधील ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’च्या कलादालनात ‘Mrinda-five voices in clay’ या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सिरॅमिक आर्ट’च्या माध्यमातून आपला भोवताल उजाळणार्‍या वस्तूंची निर्मिती केली जाऊ शकते, हे सिद्ध करणार्‍या पाच महिला कलाकारांच्या कलाकृतींचे हे प्रदर्शन. दि. २३ ते दि. २८ एप्रिल या कालावधीमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ या कालावधीमध्ये हे प्रदर्शन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. शालन डेरे, वनमाला जैन, रेणुका आदिक, रश्मी वैद्य आणि यामिनी झाल यांनी मातीतून केवळ वस्तूंची निर्मिती केली नसून, मातीमध्ये लपलेल्या सजीव सृष्टीची जाणीव प्रेक्षकांना करून दिली आहे. या अभिनव प्रयोगाचा मागोवा घेणारा हा विशेष लेख...

फिरत्या चाकावरती देसी,
मातीला आकार,
विठ्ठला तू वेडा कुंभार
 
जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचे ऋणानुबंध मातीशी जोडलेले असतात. मातीच्या जीवसत्त्वाशिवाय जीवसृष्टीचा विचारच अकल्पनीय. काळ्या मातीत राबणारा शेतकरी, मशागत करून सोनं पिकवतो. आपल्या संस्कृतीमध्ये या मातीला, भूमीला म्हणूनच ‘माता’ म्हटले गेले. हिंदुस्थान ही आपली मातृभूमी आहे, असा विचार घेऊन जगणारा हा समाज, संवेदनशीलतेने ओतप्रोत भरलेला आहे. जीवनाच्या अखेरच्या घटका मोजल्यानंतरसुद्धा, माणूस अखेर पंचतत्त्वांमध्ये विलीन होतो आणि भूतलावरील मातीवर पुन्हा एकदा नवीन थर चढतो. याच मातीला ‘मृदा’ असंसुद्धा म्हटलं जातं. हा संस्कृत शब्द ‘मृद्’ या धातूपासून तयार झालेला. या धातूचा मूळ अर्थ दळणे, कुस्करणे किंवा चूर्ण करणे असा होतो. माती आपल्या जीवनाचा अनन्यसाधारण भाग आहेच. मात्र, त्याचबरोबर हीच माती दृश्य कलेतील सृष्टीसौंदर्य कशा रितीने फुलवू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे, याच मातीतून तयार होणार्‍या विविधरूपी कलाकृती.
 
’Mrinda-five voices in clay’ या प्रदर्शनातील कलाकृती या केवळ मातीतून तयार झालेल्या नसून, मातीशी तसेच सबंध सृष्टीशी नातं सांगणार्‍या कलाकृती आहेत. कुंभाराने घडवलेल्या मडयांवर, रंगीत नक्षीकाम करणे, इतकाच विचार ’Potteryware’च्या बाबतीत केला जातो. वास्तविक, आजच्या तारखेला मात्र या कलाकृतींची व्याप्ती वाढल्याचे आपल्याला बघायला मिळते. बहुतांश ठिकाणी ‘सिरॅमिक’ची भांडी म्हणून आपल्याला काही कप-बशा किंवा गोलाकार भांड्यांवर केलेल्या कामाची आठवण होते. मात्र, या पलीकडे जाऊन, ‘सिरॅमिक’मधल्या कलाकृतींचे विभिन्न प्रकार या प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांसमोर आले आहेत.
 
आपला सबंध भोवताल उजाळणारी दीपमाळ या प्रदर्शनात, अगदी सुरुवातीलाच आपल्याला बघायला मिळते. माणसाचं जीवन प्रकाशमान झालं की, त्यात विविध रंग भरता येतात, म्हणूनच की काय, या दीपमाळेतील पणत्यांच्या जागेवरील रंगीबेरंगी नक्षीकाम उठावदार दिसते. शालन डेरे मागच्या दोन दशकांहून अधिक काळ मातीतून नव्या कलाकृती निर्माण करतात. कच्च्या मातीला आकार देण्यापासून ते तयार झालेल्या कलाकृतीला तकाकी आणेपर्यंत, प्रत्येक भांड्यासोबत, वस्तूसोबत त्यांचा स्वतंत्र प्रवास झालेला असतो. या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी मातीतून तयार केलेल्या मानवाकृती खर्‍या अर्थाने मनाला भावणार्‍या आहेत. माणसांचे चेहरे बोलके असतात. त्यांच्या मनातला आशय त्यांच्या चेहर्‍यावर प्रकट होतो आणि नेमकं हेच साधलं आहे, डेरे यांच्या या मातीच्या बाहुल्यांनी. दुसर्‍या बाजूला काही माणसांची शिल्पं चित्रांच्या स्वरूपात आपल्यासमोर प्रकट होतात. एका चौकटीमध्ये बंदिस्त असलेला समुद्र ही कलाकृतीसुद्धा अत्यंत बोलकी!
 
मातीची भांडी, दगडाची भांडी या सगळ्यांना तापवण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. एखादी कलाकृती घडवायची म्हटल्यावर आधी भूमीच्या अंतरंगातून आपल्याला हवी तशी कसदार माती निवडणे. चाकावर ओल्या मातीचा गोळा ठेवून हाताच्या साहाय्याने आकार देणे, साच्यांचा वापर करून किंवा हाताने वळवून वस्तूंची निर्मिती करणे, वाळवणे, कोरीव काम करणे या सगळ्या प्रक्रियेतून, भट्टीमधून तावून सुलाखून एक कलाकृती तयार होते. या निर्मिती प्रक्रियेच्या वेळीसुद्धा भट्टीच्या तापमानाचा अचूक अंदाज येणे आवश्यक असते. आताच्या घडीला विद्युतवाहिनीवर चालणार्‍या भट्ट्यांमुळे तापमान स्थिर राहते व हव्या त्या पद्धतीने भांडं तयार होत जाते. मात्र, अशातसुद्धा काम करणार्‍यांना रंगसंगतीचा अचूक विचार करावा लागतो. एका बाजूला मातीच्या भांड्यांमधून निसर्गाचा वेध घेणार्‍या कलाकृती तयार होत आहेत, तर दुसर्‍या बाजूला मानवाचं जीवन व्यापून टाकणार्‍या संवेदनांचा स्पर्शसुद्धा या कलाकृतींना आहे. ‘अंडरग्लेझ’ही मातीची भांडी सजवण्याची एक पद्धत आहे, ज्यामध्ये पृष्ठभागावर पारदर्शक ‘सिरॅमिक ग्लेझ’ लावून भट्टीत भाजण्यापूर्वी रंगीत सजावट केली जाते. या सजावटीनंतर तयार झालेल्या भांड्यांनी, वस्तूंमध्ये नावीन्याची झालर आहे. कलाकृतींमध्ये असलेले हेच नावीन्य प्रत्येक कलारसिकाला अंतर्मुख करणारे असेच.
 
अस्थिर वर्तमान, गतिमान झालेल्या भोवतालामुळे बदललेली जीवनशैली ही एका बाजूला माणसांना भविष्याची चिंता सतावत आहे, तर दुसर्‍या बाजूला भूतकाळात रमण्याकडे माणसांचा कल वाढत आहे. अशातसुद्धा आपल्या मुळांशी जोडलं जाण्याची प्रेरणा घेऊन प्रत्येक माणूस जगत आहे. तत्कालीन साहित्य, चित्रपट आदी गोष्टींमध्ये याचे प्रतिबिंब आपल्याला जाणवते. एक कलाकार ज्या वेळेला या सृष्टीला बघतो, अनुभवतो त्यावेळेला त्याच्या ठायी असलेली ही जाणीव सातत्याने अधिक तीव्र होत जाते. तसेच, याची परिणीती म्हणून आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून हे मूलत्व शोधून, त्यानुसार अभिव्यक्त होण्याची कास हा कलाकार धरत असतो. मातीमध्ये बीज रोवल्यानंतर, त्याचं रूपांतर हळूहळू छोट्याशा रोपट्यामध्ये होते, कालांतराने याचं मोठं झाड होतं. एक छोट्याशा रोपट्याचं रूपांतर महाकाय वृक्षामध्ये करणारी माती, स्मृतिपटलावर चिरंतर राहणार्‍या कलाकृतींनासुद्धा जन्म देते, हेच या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते.
 
‘माती’तून मिळते मानसिक समाधान
 
‘मृदा’ म्हणजे माती. आम्ही सर्व कलाकार मातीशी आणि मातीमुळेच जोडले गेलो आहोत. मातीचं वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या मनात जी वस्तू आपल्याला करावीशी वाटेल, ती आपल्याला मातीतून घडवता येते. मी तर असं म्हणेन की, लोकांनी ही विद्या शिकावी, कारण यातून मानसिक समाधन मिळतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला जर क्षणभर विश्रांती घ्यायची असेल, तर त्याने मातीचे काम करावे.
 
- शालन डेरे, सिरॅमिक आर्टिस्ट
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.