मुंबई : (BMC Photo Pass) वास्तव्याचा सबळ पुरावा म्हणून, मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येणारा 'फोटोपास' (रहिवाशांना देण्यात येणारे वास्तव्याचे ओळखपत्र) सादर करूनही पात्रता सर्वेक्षणात 'अनिर्णित' श्रेणीत टाकण्यात आलेल्या बहुतांशी धारावीकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.
पालिकेच्या फोटोपासवरील (BMC Photo Pass) तारखेच्या तांत्रिक अडचणीमुळे संभ्रम निर्माण झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी कबूल केले असून, यावर तोडगा काढण्यासाठी आता पाऊल उचलण्यात येणार आहे. पालिकेच्या वतीने सदनिकांचे सर्वेक्षण १ जानेवारी २००० पूर्वी करण्यात आले असले, तरीही बहुतांशी धारावीकरांनी केलेल्या अर्जानुसार वितरीत करण्यात आलेल्या फोटोपासवर यानंतरची तारखी टाकण्यात आली आहे. यामुळेच संभ्रमाचे वातावरण तयार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.(BMC Photo Pass)
"पालिकेच्या वतीने धारावीमध्ये २००० पूर्वी सर्वेक्षण प्रक्रिया राबविण्यात आली होती आणि रहिवाशांना सर्वेक्षण पावत्या देण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतेक रहिवाशांनी आपापल्या सोयीनुसार, कालांतराने या पावत्यांचे रूपांतर फोटोपासमध्ये केले. यामुळेच तारखेबाबत गोंधळ निर्माण झाला आहे" अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी या संभ्रमाचे स्पष्टीकरण दिले.(BMC Photo Pass)
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात पालिकेच्या वतीने धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (डीआरपी) एक पत्र प्राप्त झाले असून यामध्ये अंतिम मुदतीनंतर म्हणजेच सन २००० नंतर, पालिकेच्या वतीने वितरित करण्यात आलेले फोटोपासदेखील ग्राह्य धरता येतील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
स्थानिक रहिवाशांकडील फोटोपासवर 'कट ऑफ डेट' नंतरच्या तारखा असल्याने, डीआरपीकडून अशा प्रकरणांची काळजीपूर्वक दखल घेतली जात आहे. यातील प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र पडताळणी करून हे दस्तावेज फेरतपासणीसाठी पालिकेच्या संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात येत आहेत. जेणेकरून सदर सर्वेक्षण नेमके केव्हा झाले, याची संपूर्ण माहिती शासनाला प्राप्त होऊ शकेल. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर अर्जदार पात्रतेच्या 'अनिर्णित' श्रेणीतच राहील. केवळ तांत्रिक बाबींमुळे पुनर्विकासासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ही पडताळणी प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(BMC Photo Pass)