मुंबई : (ABVP Mumbai University issue) अभाविपने मुंबई विद्यापीठातील प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित करत कुलगुरूंनी तात्काळ सत्यस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी ठाम मागणी केली आहे. अभाविपचे मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी यांनी यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बीकॉम परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण हे केवळ एक-दोन महाविद्यालयांपुरते मर्यादित नसून अनेक महाविद्यालयांमध्ये पसरल्याचे समोर येत आहे. या गंभीर प्रकाराबाबत वारंवार विचारणा करूनही विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप अभाविपने केला आहे. तसेच, संघटनेने केलेल्या मागण्यांवर ठरलेल्या वेळेत उत्तर न दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कुलगुरूंनी तात्काळ पुढे येत संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.(ABVP Mumbai University issue)
अभाविपने विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजावर टीका करताना म्हटले की, प्रशासनाची ‘कासवगती’ आणि प्रकरण दडपण्याची वृत्ती यामुळे या गंभीर विषयाचे गांभीर्यच कमी लेखले जात आहे. टी.वाय. बीकॉम च्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार परीक्षा विभागाकडून होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.(ABVP Mumbai University issue)
याशिवाय, या प्रकरणात आवाज उठवू नये म्हणून धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. विद्यार्थी परिषद कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालक परीक्षा भवनात आपल्या अडचणी मांडण्यासाठी गेल्यानंतर त्यांना उत्तर देण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त बोलावून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.(ABVP Mumbai University issue)
या पार्श्वभूमीवर अभाविपने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत:
* प्रश्नपत्रिका खरोखर फुटली आहे की नाही, हे जाहीर करण्यास एवढा विलंब का?
* विद्यापीठ प्रशासन कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का?
* प्रशासनावर बाह्य दबाव आहे का?
* ज्या विद्यार्थ्यांचे स्टेटमेंट घेतले, त्याबाबत विद्यापीठाची भूमिका काय?
* उच्चस्तरीय अधिकारी यात सहभागी असल्यामुळे कारवाई टाळली जात आहे का?
* पेपर फुटल्यास संबंधित विषयाची पुनर्परीक्षा घेतली जाणार का?(ABVP Mumbai University issue)