न्यायाची वाट, झाडांची साथ...

    24-Apr-2026
Total Views |
Satish Kalke Advocate Journey
 
संघर्ष, प्रामाणिकपणा आणि सखोल अभ्यास यांच्या बळावर घडलेला वकिलीचा प्रवास म्हणजे, अ‍ॅड. सतीश शामराव कळके. समाजाशी आणि निसर्गाशी नाते जिवंत ठेवणार्‍या या व्यक्तिमत्त्वाविषयी...
 
कल्याणच्या साध्या, मध्यमवर्गीय वातावरणात वाढलेले अ‍ॅड. सतीश शामराव कळके यांचे बालपण कष्ट, शिस्त आणि प्रामाणिकपणाच्या संस्कारांत गेले. घरची परिस्थिती बेताची असली, तरी प्रामाणिकपणे काम करायचे, कोणालाही फसवायचे नाही, हा मूल्याधिष्ठित विचार त्यांच्या आयुष्याचा पाया ठरला. कल्याणमध्येच शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘रुईया महाविद्यालया’तून ‘बीए’ पदवी संपादन केली. या काळात मराठी विषयाचे प्राध्यापक वसंत बापट यांच्या सहवासातून भाषेची जाण, अभिव्यक्तीची समृद्धी आणि विचारांची दिशा त्यांनी आत्मसात केली.
 
त्यांचा सुरुवातीचा कल सैन्यदलाकडे होता. पाच ते सहा वर्षे ‘एनसीसी’मध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी शिस्त, आत्मविश्वास आणि देशसेवेची भावना अंगीकारली. तथापि, नौदलाच्या निवडप्रक्रियेत चष्मा असल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आणि त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. त्या वळणावर त्यांनी वकिलीचा मार्ग निवडला. केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर समाजाशी बांधिलकी जपण्याचा मार्ग म्हणून!
 
‘एलएलबी’चे शिक्षण त्यांनी ‘न्यू लॉ महाविद्यालया’तून पूर्ण केले. वकिली क्षेत्रातील पहिली पायरी त्यांनी ठाण्यातील प्रसिद्ध वकील दत्तात्रय बोरवणकर यांच्यासोबत काम करत चढली. न्यायालयीन कामकाजाची शिस्त, प्रकरणांची हाताळणी आणि व्यावहारिक अनुभव यांची भक्कम पायाभरणी या टप्प्यावर झाली. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ अधिवक्ते उदय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत वकिलीचे अधिक सखोल धडे आत्मसात केले.
 
पुढे फिरदोस कराचीवाला यांच्यासोबत काम करत असताना त्यांनी ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’मधून ‘एलएलएम’ पूर्ण केले. या काळात कायद्याच्या सखोल अभ्यासासोबतच न्यायव्यवस्थेची व्यापक समज त्यांनी विकसित केली.
यानंतरचा टप्पा त्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा ठरला, तो सर एम. के. जोशी यांच्यासोबत काम करण्याचा. जोशी सरांनी त्यांना केवळ कायदा शिकवला नाही, तर भाषा, मांडणी आणि ड्राफ्टिंगचे महत्त्वही समजावून दिले. ‘प्रथम पिढीतील वकील’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणे, हे मोठे आव्हान होते; मात्र त्यांच्या मार्गदर्शनामुळे अ‍ॅड. कळके यांनी ‘क्रिमिनल कायद्या’त भक्कम पाया रचला.
 
या प्रवासातील एक प्रसंग त्यांच्या आयुष्याचा मार्गदर्शक ठरला. एक गंभीर आणि चर्चेतील गुन्हेगारी प्रकरण त्यांच्या समोर आले होते. आरोपी मोठ्या प्रमाणात मानधन देण्यास तयार होता. त्यावेळी जोशी सरांनी त्यांना विचारले, "आपण ही केस घ्यावी का?” नवख्या अवस्थेत हा प्रश्न त्यांच्या दृष्टीने अनपेक्षित होता. त्यांनी "शिकण्याची संधी मिळेल,” असे नम्रपणे उत्तर दिले. मात्र, जोशी सरांनी दिलेला प्रतिसाद त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला, "आपल्या बुद्धीचा उपयोग घातक कृत्याच्या समर्थनासाठी करणे योग्य नाही!” या विचाराने त्यांच्या वकिलीची दिशा निश्चित केली आणि त्यानंतर त्यांनी कधीही नैतिकतेशी तडजोड केली नाही.
 
गेल्या ४२ वर्षांच्या कारकिर्दीत अ‍ॅड. कळके यांनी सुमारे ४०० हून अधिक प्रकरणे हाताळली आहेत. प्रत्येक खटल्यातून त्यांनी अनुभव, संयम आणि न्यायव्यवस्थेतील सूक्ष्मता आत्मसात केली. उच्च न्यायालयापर्यंत अपील करून निकाल आपल्या बाजूने लागण्याचे समाधान त्यांनी अनेकदा अनुभवले आहे. या प्रवासात संयम, अभ्यास आणि तर्कशुद्ध मांडणी यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
 
त्यांच्या मते, वकिली म्हणजे केवळ कायद्याचे ज्ञान नव्हे, तर भावनांचे सुयोग्य नियोजन आहे. न्यायालयात कितीही तयारी करून गेलो, तरी परिस्थिती कधीही बदलू शकते. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवत विवेकाने आणि शांतपणे मांडणी करणे अत्यावश्यक आहे. चित्रपटातील न्यायालयीन नाट्य आणि प्रत्यक्ष न्यायालय यांमध्ये मोठा फरक असल्याचे ते आवर्जून सांगतात.
 
परंतु, अ‍ॅड. कळके यांचे व्यक्तिमत्त्व केवळ वकिलीपुरते मर्यादित नाही, तर त्यांच्या आयुष्याचा एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील भाग म्हणजे वृक्षप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची बांधिलकी. आजवर त्यांनी ४५० हून अधिक झाडे लावली आहेत. ही केवळ संख्या नसून त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे.
 
प्रत्येक झाडाकडे ते एक सजीव अस्तित्व म्हणून पाहतात. झाडे लावणे, त्यांची निगा राखणे, त्यांना पाणी देणे आणि त्यांच्या वाढीची काळजी घेणे, हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग. दररोज सकाळी या झाडांमध्ये वेळ घालवणे त्यांना मानसिक समाधान आणि शांतता प्रदान करते.
 
त्यांच्या मते, झाडे लावणे म्हणजे केवळ पर्यावरण संवर्धन नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी जबाबदारी पार पाडणे आहे. शहरातील वाढत्या काँक्रिटीकरणाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्र टिकवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. स्वतःच्या कष्टातून आणि साधनांतून त्यांनी ही हरित साधना जपली आहे. वकिलीच्या तणावपूर्ण कामानंतर झाडांमध्ये रमणे, हे त्यांच्या आयुष्याचे संतुलन राखणारे साधन ठरले आहे. निसर्गाशी असलेले हे नाते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक समृद्ध करते.
 
अत्यंत साधेपणाने, प्रामाणिकपणे आणि मूल्यांशी बांधिलकी ठेवत उभा राहिलेला त्यांचा प्रवास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. खरी श्रीमंती ही सच्चेपणा आणि मेहनतीच्या जोरावर गाठता येते, हे त्यांनी आपल्या आयुष्याने सिद्ध केले आहे.
अ‍ॅड. सतीश कळके यांचा प्रवास हा केवळ यशस्वी वकिलाचा नाही, तर मूल्य, माणुसकी आणि पर्यावरणप्रेम जपणार्‍या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!
 
सागर देवरे
९९६७०२०३६४