National Burns Centre :ऐरोलीतील नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये स्किन डोनेशनची तीव्र कमतरता; गरज 150, प्रत्यक्ष दान फक्त 20

    24-Apr-2026
Total Views |
national burns centre
 
मुंबई : (National Burns Centre) मुंबईतील ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटर (एनबीसी) ने स्किन डोनेशनची संख्या अत्यंत कमी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संस्थेचे संचालक आणि प्लास्टिक सर्जन डॉ. सुनील केसवानी यांनी सांगितले की, दर महिन्याला सुमारे 150 स्किन डोनेशनची गरज असते; मात्र प्रत्यक्षात केवळ 20 लोकच स्किन दान करतात. म्हणजेच आवश्यकतेच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात स्किन उपलब्ध होते.
 
डॉ. केसवानी यांनी सांगितले की, या तुटवड्याचे मुख्य कारण म्हणजे जागरूकतेचा अभाव आहे. अंदाजे 10 पैकी फक्त 1 व्यक्तीला स्किन डोनेशनबाबत माहिती आहे. मुंबईतील स्किन बँका दर महिन्याला केवळ 25 टक्के गरज भागवू शकतात. त्यामुळे गंभीर भाजलेल्या रुग्णांच्या उपचारांमध्ये विलंब होतो. सुमारे 70 टक्के बर्न रुग्ण हे 15 ते 35 वयोगटातील असतात. वेळेवर स्किन ग्राफ्ट न मिळाल्यास त्यांच्या जीवाला धोका वाढतो आणि कुटुंबावर आर्थिक तसेच मानसिक ताणही वाढतो.(National Burns Centre)
 
मृत्यूनंतर 6 तासांच्या आत स्किन डोनेशन करता येते. मात्र त्यासाठी आधीच नोंदणी करणे आवश्यक असते. त्यामुळे नागरिकांनी आधीच स्किन डोनेशनची तयारी दाखवून आपल्या कुटुंबियांनाही याची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बर्न सर्व्हायव्हर विराज ठाकूर यांनी सांगितले की, “स्किन डोनेशनमुळेच माझा जीव वाचला. केमिकलमुळे मी गंभीर भाजलो होतो. एनबीसीमध्ये उपचार करून स्किन ग्राफ्टिंग करण्यात आली.” सध्या एनबीसी आणि इतर संस्थांकडून जनजागृती मोहीम राबवली जात आहे.(National Burns Centre)
 
 
महत्त्वाची बाब: स्किन डोनेशनबाबतचे गैरसमज आणि सत्य
 
गैरसमज: स्किन डोनेशन केल्याने शरीर खराब होते
सत्य: स्किन शरीराच्या वरच्या भागातून (जसे पाठ किंवा मांडी) घेतली जाते. प्रक्रिया सुरक्षित असून शरीरावर परिणाम होत नाही.
गैरसमज: स्किन डोनेशन जिवंत व्यक्तीच करू शकतो
सत्य: स्किन डोनेशन मृत्यूनंतरच केले जाते आणि तेही 6 तासांच्या आत.
गैरसमज: ही प्रक्रिया खूप अवघड आहे
सत्य: प्रक्रिया सोपी आहे. कुटुंबाची संमती आणि स्किन बँकेशी संपर्क पुरेसा असतो.
गैरसमज: वृद्ध किंवा आजारी व्यक्ती स्किन डोनेट करू शकत नाही
सत्य: वय अडथळा नाही. मात्र एचआयव्ही, हिपॅटायटिस, गंभीर संसर्ग किंवा न्यूमोनिया असलेल्या व्यक्ती स्किन डोनेट करू शकत नाहीत.
 
एकूणच, स्किन डोनेशनबाबत जागरूकता वाढवणे अत्यंत गरजेचे असून अधिकाधिक लोकांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.(National Burns Centre)