मुंबई : (Marathi lessons for taxi drivers) महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबर आणि ई-बाईक टॅक्सी सेवांमधील अमराठी व्यावसायिक वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आता मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्यिकांनी अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची गुरुवार, दि.२३ एप्रिल रोजी मंत्रालयातील दालनात विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीत राज्यातील अमराठी वाहनचालकांवर अनावश्यक दडपण न आणता, खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना जुजबी व्यावहारिक मराठी शिकविण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आपल्या ७२ शाखांमधून शिकवणी वर्ग सुरू करण्याची तयारी दर्शवित आहे. तसेच, मुंबई मराठी साहित्य संघाने आपल्या हजारो स्वयंसेवी शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन मराठी भाषा प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रशिक्षणासाठी चालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.(Marathi lessons for taxi drivers)
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत संपूर्ण राज्यभर रिक्षा व टॅक्सी चालकांच्या परवान्यांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान इतर नियमांसोबतच चालकांना मराठी भाषेचे व्यवहारज्ञान आहे की नाही, याचीही पडताळणी केली जाईल. या संदर्भात काही अमराठी चालकांच्या मनात निर्माण झालेली अनावश्यक भीती दूर करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Marathi lessons for taxi drivers)
"मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळाल्यामुळे या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता अमराठी वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणारा ठरावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत अमराठी वाहनचालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे", अशी माहिती साहित्यिकांनी दिली. (Marathi lessons for taxi drivers)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.