युद्धाआड सुरू असलेले ‌‘युद्ध‌’

    23-Apr-2026   
Total Views |

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी केलेल्या युद्धाच्या घोषणांचा वापर ‌‘इनसायडर ट्रेडिंग‌’साठी केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर कित्येक बड्या गुंतवणूकदारांनी, हाच डाव पुन्हा एकदा खेळला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ट्रम्प यांच्यावरील आरोप आता अधिक निश्चित होताना दिसत आहेत.

‘दिसतं तसं नसतं‌’ ही म्हण सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या भोवती सुरू असलेल्या राजकारण आणि अर्थकारणाला चपखल बसते. डोनाल्ड ट्रम्प सध्या युद्धविरामाच्या घोषणा करत सुटलेले दिसतात. त्यांच्या बाजूने अमेरिकचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स हे चर्चेसाठी पाकिस्तानच्या येरझाऱ्या घालत आहेत. तर, दुसरीकडे इराण आपल्या मागण्यांवर ठाम आहे. दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची मुदत बुधवारी संपली. त्यानंतरच होर्मुझच्या सामुद्रधुनीत गोळीबाराच्या बातम्या येऊ लागल्या. याचाच अर्थ, इराणला हे युद्ध लांबविण्यातच फायदा वाटू लागला आहे. पण, ही सगळी युद्धजन्य स्थिती, चर्चा, घोषणा आणि एकूणच या सर्व स्थितीचे आंतरराष्ट्रीय वार्तांकन सुरू असतानाच, काहीतरी काळंबेरं शिजत असल्याचा संशय अमेरिकेच्या माध्यमांना येऊ लागला आहे.

एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या दाव्यानुसार, ट्रम्प यांच्या घोषणांमुळे शेअर बाजारात प्रचंड प्रमाणात ‌‘इनसायडर ट्रेडिंग‌’ दिसू लागले आहे. काही संस्थांनी ट्रम्प यांच्या घोषणा आणि शेअर बाजारातील उलाढालींच्या वेळेची शहानिशाही करून पाहिली. यात एकप्रकारचा ‌‘पॅटर्न‌’देखील दिसून आला. ज्यावरून ‌‘इनसायडर ट्रेडिंग‌’चे प्रकरण असल्याचा दावा काही शेअर बाजारातील तज्ज्ञांनी केला आहे. ज्यात सुरुवातीपासूनच ट्रम्प यांच्या घोषणांबद्दलची गोपनीय माहिती पसरली होती, असा अरोप आहे. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांशी प्रतारणा केल्यासारखाच हा गंभीर गुन्हा आहे. काहींच्या मते, ही काही सामान्य बाब नाही, त्यामुळे ही गोष्ट गांभीर्याने घेणेच गरजेचे आहे. काही बलाढ्य गुंतवणूकदार ट्रम्प यांची पुढची चाल आधीच ओळखून, त्यानंतर पुढील डाव खेळतात.

‌‘नोबेल‌’ पुरस्कार विजेते अर्थशास्त्री पॉल क्रुगमॅन यांनी गेल्याच आठवड्यात, असाच एक आरोप केला. ट्रम्प यांच्या जवळच्या व्यक्तींना पुढच्या घोषणांची आधीच माहिती असल्याने, त्यांच्याकडूनच कच्च्या तेलाचा व्यापार केला जाण्याची भीती व्यक्त केली होती. कारण, कच्च्या तेलाचा हा व्यापार कोट्यवधी डॉलर्समध्ये होतो, ही तर शक्यता नाकारता येत नाही. तेलाच्या भावाची चढ-उतार लक्षात घेता, या संघर्षाचा फायद्यासाठी वापर झाला असेल, असेही नाकारता येत नाही. हा गुन्हा देशद्रोहासारखाच असल्याचे पॉल क्रुगमॅन म्हणाले होते.

पुढील पाच उदाहरणांद्वारे नेमके कशाप्रकारे ‌‘इनसायडर ट्रेडिंग‌’ झाले, ते समजून घेता येईल. ‌‘ब्लॉकचेन‌’ या गुंतवणूक कंपनीचे विश्लेषक संकेतस्थळ ‌‘बबलमॅप्स‌’ने केलेल्या दाव्यात हा खुलासा केला आहे. फेब्रुवारीत अचानक एकूण सहा खाती उघडण्यात आली. या सर्व खात्यांनी दि. 28 फेब्रुवारीपर्यंत, इराणवर हल्ल्याच्या बाजूने सट्टा लावला होता. ज्यावेळी ट्रम्प यांनी हल्ला झाल्याची घोषणा केली, तेव्हा या खात्यात एकूण 12 लाख डॉलर्स जमा झाले होते. यानंतर कुठलाही व्यवहार या खात्यांमध्ये झालेला नाही. आणखी एका खात्याने युद्धविरामाच्या घोषणेनंतर एक लाख, 40 हजार डॉलर्स कमाई केली.

‌‘डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर‌’ यांच्याशी संबंधित असलेल्या, ‌‘ऑनलाईन प्रेडिक्शन मार्केट‌’शी निगडित एक खाते उघडण्यात आले. ज्यामध्ये दि. 30 डिसेंबर ते दि. 2 जानेवारीदरम्यान, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या राजीनाम्याबद्दल 32 हजार, 500 डॉलर्सचा सट्टा लागला होता. दि. 3 जानेवारी रोजी मादुरोंची गच्छंती झाली, अन्‌‍ त्या खात्यात 4.36 लाख डॉलर्स जमा झाले. या प्रकारानंतर संबंधित खाते बंद करण्यात आले आणि ‌‘युजर नेम‌’ लुप्त पावले. या खात्याशी संबंधित ट्रेडरला गोपनीय माहिती पूर्वीपासूनच होती, असा संशय त्यामुळे व्यक्त केला जात आहे.

दि. 23 मार्च 2026चा दिवस. ट्रम्प यांनी ‌‘ट्रुथ‌’ या त्यांच्या समाज माध्यमांवर तेहरानच्या समस्येवर तोडगा काढणार असल्याचे म्हटले होते. या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठीच उसळी आली आणि कच्च्या तेलाचे भाव गडगडले. ट्रम्प यांच्या या ‌‘ट्विट‌’च्या 14 मिनिटे पूर्वीच, शेअर बाजारात घसरणीच्या भावात बोली लावण्यात आली होती. यावेळी कच्च्या तेलाची ‌‘शॉर्ट सेलिंग‌’ झाली होती. ज्यात किमती वाढल्या तर नफा कमावला जातो आणि भाव कमी झाला, तर स्वस्तात खरेदी केली जाते. प्रतिबॅरल 15 डॉलरची घसरण झाल्यानंतर, यात एकूण दोन कोटी 66 लाख डॉलर्सचा नफा कमावण्यात आला. 10.48 मिनिटे ते 10.50 या दोन मिनिटांत प्रचंड संख्येने व्यवहार झाले. 11.04 वाजता ट्रम्प यांची ‌‘पोस्ट‌’ आली आणि 11.05 वाजता कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या.

दि. 9 मार्च 2026 रोजी इराण युद्धाच्या नवव्या दिवशी, युद्ध संपुष्टात आल्याची घोषणा केली गेली. 7.16 मिनिटांनी ती समाजमाध्यमांवर आली. यामुळे तेलाच्या किमती 25 टक्क्यांनी घसरल्या. मात्र, या घोषणेच्या 47 मिनिटे आधीच, 6.29 मिनिटांनी भांडवली बाजारात व्यवहार सुरू झाले होते. ‌‘शॉर्ट सेलिंग‌’ करून एकूण चार हजार कॉन्ट्रॅक्टर्सनी 49 लाख डॉलर्सहून अधिकचा नफा कमावला. हा ‌‘इनसायडर ट्रेडिंग‌’चा प्रकार आहे, असाही आरोप त्यावेळी झाला.

ट्रम्प यांच्या आयातशुल्क लावण्याच्या निर्णयांमुळेही संशय बळावत आहे. सुरुवातीला टॅरिफची घोषणा मोठ्या गाजावाजात झाली. मात्र, चीन वगळता सर्वांना सवलत देण्यात आली. यानंतर शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी त्सुनामी आणली होती; ज्यात ‌‘स्टॅण्डर्ड ॲण्ड पुअर 500‌’ निर्देशांक 9.5 टक्क्यांनी उसळला. दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी उसळी मानली गेली, यात 17.59 कोटी डॉलर्सचा नफा नोंदविण्यात आला. अमेरिकेत गेल्या 93 वर्षांपासून ‌‘इनसायडर ट्रेडिंग‌’वर बंदी आहे. अशा माहितीच्या आधारे काही गुंतवणूकदार गब्बर नफा कमावतात. ज्यामुळे बाजारातील बरोबरीची स्पर्धा संपुष्टात येते. याच कारणास्तव 1933 पासून अमेरिकेत ‌‘इनसायडर ट्रेडिंग‌’वर बंदी आहे.

अर्थात, वरील नमूद केलेले सर्व आरोप असून, ते न्यायालयात सिद्ध होतीलच असे नाही. जर संपूर्ण पुरावे आणि साक्षीदारांची जुळवाजुळव व सत्यता पडताळून पूर्ण झाली, तर यात शिक्षा शक्य आहे. अन्यथा, संपूर्ण खटलाच रद्दबातल  होऊ शकतो. ट्रम्प यांच्या या दुसऱ्या कारकिर्दीत झालेल्या आरोपांच्या तुलनेत, हा आरोपही तितकासा ठोस नाही. मात्र, जगभरात युद्ध सुरू असतानाही आपली पोळी भाजून घेणारे हे सट्टेबाज, भांडवली बाजार व्यवस्था खिळखिळी करत राहतील, हे मात्र नक्की.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.