राजकारणात ‘वाघ’ असल्याचा दावा करणे सोपे असते; पण त्यासाठी लागणारा दरारा, संघर्ष आणि सातत्यपूर्ण नेतृत्व सिद्ध करावे लागते, अन्यथा उरते ती कोल्हेकुई. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाभोवती निर्माण झालेली प्रतिमा आणि वास्तव यातील दरी आज अधिक ठळकपणे समोर येत आहे.
राजकारणात प्रतिमा उभारणे आणि ती टिकवणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शिवसेनेची ‘वाघ’ ही आक्रमक ओळख निर्माण झाली, ती बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात. ती त्यांच्या आक्रमक शैलीतून, स्पष्टवक्तेपणातून आणि निर्णयक्षमतेतून घडली. मात्र, त्याच प्रतीकांचा वारसा पुढे नेताना उद्धव ठाकरेंना तो दरारा टिकवता आला का? हाच प्रश्न आज उपस्थित करण्याची गरज तीव्र झाली आहे. निमित्त आहे ते पश्चिम बंगाल निवडणुकांचे. बंगालबद्दल ठाकरे यांनी, स्वतःला फार चिंता असल्याचे मत अलीकडेच व्यक्त केले. असे असेल, तर ते स्वतः तिकडे ममतादीदी यांच्या प्रचारार्थ का गेले नाहीत? मुळात ममता यांनी उद्धव यांना बोलावले आहे का? हाच पहिला प्रश्न आणि दुसरा म्हणजे समजा बोलावले असते, तर उद्धव यांना तिकडे कुणी तरी विचारते का? हा दुसरा प्रश्न. महाराष्ट्राबाहेर उद्धव ठाकरेंचे अस्तित्व जवळपास नाहीच. जे ठाकरे मुंबई ‘मनपा’च्या लोभापायी महाराष्ट्रात प्रचाराला जाणे टाळतात, त्यांच्याबद्दल काय बोलावे.
याउलट, देवेंद्र फडणवीस यांचे उदाहरण. महाराष्ट्रात ‘देवाभाऊ’ म्हणून लोकप्रिय असण्याबरोबरच ते इतर राज्यांतही भाजपचे ‘स्टार प्रचारक’ म्हणून, प्रचाराला बोलावले जातात. ही ओळख त्यांना त्यांच्या पदामुळे नव्हे, तर कामगिरीमुळे मिळाली आहे. त्यामुळे फडणवीस बंगालमध्ये गेले, तर ठाकरेंना त्याचा त्रास का व्हावा? हा प्रश्न उपस्थित होतो. देवाभाऊंनी, ठाकरेंनी जी सत्ता पाठीत खंजीर खुपसून मिळवली होती, ती उलथून टाकत भाजपचे सरकार स्थापन करून दाखवले. ‘मुंबईत तुम्हाला पाहू’ असे आव्हान दिल्यानंतर, मुंबई ‘मनपा’ही ठाकरेंकडून जिंकून घेतली, त्याचेच शल्य ठाकरेंनी बोलून दाखवले असावे.
ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची तुलना करणेच मुळात विसंगत आहे. ममता बॅनर्जी यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता. त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, काँग्रेसपासून वेगळे होत स्वतःचा पक्ष उभा केला आणि डाव्यांच्या गडाला धक्का देत सत्ता मिळवली. सलग 15 वर्षे त्यांनी सत्ता टिकवली आणि पक्षावर एकहाती नियंत्रणही ठेवले. त्यांच्या भूमिकांवर मतभेद असू शकतात; पण त्यांच्या लढाऊ वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही. याउलट, उद्धव ठाकरे यांना राजकीय वारसा आयताच लाभला. पण, त्या वारशाला साजेसा संघर्ष आणि नेतृत्वगुण त्यांनी कितपत दाखवले? राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांनी मुंबईपलीकडे जाऊन प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्नही केला नाही. स्वतःला ‘वाघ’ म्हणवणाऱ्यांची अशी मर्यादा का? हा प्रश्न अत्यंत स्वाभाविक ठरतो.
2019 मधील सत्तांतर हा या नेतृत्वाच्या भूमिकेचा निर्णायक टप्पा होता. स्वतःची मुख्यमंत्रिपदाची लालसा पूर्ण करण्यासाठी युती तोडण्याचे पाप करत, शरद पवारांसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय याच उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. “ज्या दिवशी काँग्रेसबरोबर जावे लागेल, अशी वेळ येईल, तेव्हा मी माझे दुकान बंद करीन,” असेही बाळासाहेबांनी वारंवार बोलून दाखवले. त्याच बाळासाहेबांचा हा सुपुत्र सोनिया-राहुल यांना मुजरा घालत, मविआच्या माध्यमातून जनादेशाचा अव्हेर करत मुख्यमंत्री झाला. वाघ कधीही मागून वार करत नाही; तो समोरासमोर लढतो. मात्र, उद्धव यांनी पाठीत खंजीर खुपसून आपण ‘कागदी वाघ’ असल्याचेच दाखवून दिले.
याच निर्णयाचा परिणाम पुढे पक्षफुटीत दिसला. मजबूत नेतृत्वाखाली पक्ष एकसंध राहतो. पण, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना दुभंगली. ‘ऑपरेशन टायगर’सारख्या चर्चांनंतर खासदारांची बैठक घेणे, त्यानंतर भावनिक आवाहन करणे, ‘माझे नेतृत्व नको असेल तर सांगा’ ही भूमिका ठाम नेतृत्वाची नव्हे; तर असुरक्षिततेची जाणीव करून देते. खासदारांनीही उद्धव ठाकरे यांच्यासमोर उघडपणे नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या समोर आल्या. यावरून नेतृत्वावरील पकड किती सैल झाली आहे, हेही स्पष्ट होते.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा कार्यकाळही याच संदर्भात तपासला जातो. सरकारवर ठाम नियंत्रण नसल्याची टीका सातत्याने झाली. मंत्रालयात केवळ दोनदा लावलेली उपस्थिती त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्न उभे करणारी ठरली. अधिकारी आणि इतर नेते वरचढ ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले. वाघाचा जो दरारा असतो, तोच या काळात दिसून आला नाही. ‘शिवसेना आणि वाघ’ ही ओळख बाळासाहेब ठाकरे यांनी घडवली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि ठाम भूमिकांमुळे, हा दरारा निर्माण झाला होता. परंतु, उद्धव ठाकरेंच्या काळात तो दरारा कमी होत गेला. त्यामुळे ‘वाघ’ हे नावापुरतेच उरले, असे म्हटले तर फारसे चुकीचे ठरणार नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जी काँग्रेसने भूमिका मांडली, तीच उद्धव मांडतात. यावरून त्यांचे बोलवते धनी कोण, हे महाराष्ट्राला पुरते समजले आहे. निवडणुकांच्या वेळी मराठी माणसाचे स्मरण करणाऱ्या ठाकरे यांना, मराठी माणूस चांगलेच ओळखून आहे. महाराष्ट्रातील मतदार अधिक जागरूक आहे. तो भावनिक आवाहनांवर म्हणूनच विश्वास ठेवत नाही. भाषा, प्रदेश यांच्या अस्मितेवरून मराठी माणसाला पेटवायचे म्हणूनच आता चालत नाही. तथापि, ठाकरे यांनी पुन्हा तसा प्रयत्न चालवला आहे, तो हाणून पाडलाच पाहिजे. ठाकरेंची उक्ती आणि कृती यात जमीन-आसमानाचा फरक आहे. म्हणूनच, मराठी माणूस आता याला बळी पडणार नाही. त्याला ठोस नेतृत्व आणि कामगिरी हवी आहे. त्यामुळे ‘वाघ’ ही उपाधी टिकवण्यासाठी, वाघासारखे वागणे आवश्यक आहे. अन्यथा, त्या नावामागे उरते ती केवळ कोल्हेकुई. उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही हेच दिसून येते. प्रतिमेचा गाजावाजा आणि वास्तवातील मर्यादा यातील अंतर वाढत चालले आहे. नेतृत्वाची खरी कसोटी संघर्ष, सातत्य आणि विश्वासार्हता या तीन घटकांवर ठरते. या तिन्ही बाबतीत जे नेतृत्व उभे राहते, तेच खरे वाघ ठरतात. उरलेले केवळ वाघाची कातडी पांघरून कोल्हेकुई करणारेच असतात. त्यामुळेच आजची परिस्थिती पाहता, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व म्हणजे ‘वाघिणीमागचे कोल्हे’ या उपमेलाच अधिक जवळचे वाटते.