॥सौंदर्यलहरी भाष्य भाग 21॥

    23-Apr-2026
Total Views |

शरज्ज्योत्स्ना शुद्धां शशियुत-जटाजूट-मकुटां
वर-त्रास-त्राण-स्फटिकघुटिका-पुस्तक-कराम्‌|
सकृन्न त्वा नत्वा कथमिव सतां सन्निदधते
मधु-क्षीर-द्राक्षा-मधुरिम-धुरीणाः फणितयः॥15॥

‌‘सौंदर्यलहरी‌’मधील लोक क्रमांक 15, 16 आणि 17 हे तीन लोक श्री ललिता देवीच्या देवी शारदा अर्थात सरस्वतीच्या स्वरूपाचे विवेचन करणारे आहेत. या तीन लोकांची एकत्रित स्वरूपात साधना केल्यास वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते, कवित्व जागृत होते.

या लोकात आदि शंकराचार्य म्हणतात की, ज्या देवीचे रूप शरद ऋतूतील पूर्ण चंद्राच्या शुभ्र चांदण्याप्रमाणे अत्यंत धवल, निर्मळ आणि शीतल आहे, तिचे ध्यान केल्यानेच बुद्धीचे सर्व दोष नष्ट होतात. देवीने आपल्या मस्तकावर जटाजूट धारण केला असून, त्या जटांमध्ये भगवान शिवाप्रमाणेच बालचंद्र (चंद्रकोर) धारण केला आहे. भारतीय अध्यात्मात चंद्राला चंद्रमा मनसो जातः या न्यायाने ‌‘मनाचा कारक‌’ मानले गेले आहे. चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि कमी होतो; तसेच मानवी मनही सतत संकल्प-विकल्पांच्या लहरींमध्ये हेलकावे खात असते. देवीने हा चंद्र आपल्या मस्तकावर धारण केला आहे. याचाच अर्थ असा की, पराशक्तीने मनावर पूर्णतः विजय मिळवला आहे. जेव्हा साधक देवीच्या या रूपाचे ध्यान करतो, तेव्हा त्याला आपल्या चंचल मनाला स्थिर करण्याची आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याची प्रेरणा मिळते.

योगशास्त्रानुसार, आपल्या मस्तकाच्या मध्यभागी ‌‘सहस्रार चक्रा‌’च्या खाली एक ‌‘चंद्रमंडळ‌’ असते. या मंडळातून सतत अमृतरूपी ऊर्जेचा स्राव होत असतो, ज्याला ‌‘सोम‌’ असेही म्हणतात. सामान्यतः ही ऊर्जा खालच्या चक्रांमध्ये जाऊन खर्च होते; परंतु उच्च कोटीचे योगी आपली कुंडलिनी शक्ती जागृत करून, या अमृताचे प्राशन करतात. देवीच्या मस्तकी असलेली चंद्रकोर ही याच अमृताचे आणि अखंड आनंदाचे प्रतीक आहे. ती दर्शवते की, देवी ही शाश्वत आनंदाचे उगमस्थान आहे.

भगवान शिव हे ‌‘चंद्रशेखर‌’ आहेत. देवी ललिता किंवा पार्वती जेव्हा आपल्या मस्तकावर चंद्र धारण करते, तेव्हा ती शिव आणि शक्ती यांच्यातील अद्वैत किंवा एकरूपता दर्शवते. सृष्टीची निर्मिती आणि लय या दोन्ही प्रक्रियांमध्ये चंद्रकोर हा एक दुवा आहे. शिवाच्या मस्तकी असलेला चंद्र वैराग्य दर्शवतो, तर देवीच्या मस्तकी असलेला चंद्र हा सृजनातील कारुण्य आणि मांगल्य दर्शवतो. सूर्याचा प्रकाश प्रखर असतो, तर चंद्राचा प्रकाश शीतल असतो. आध्यात्मिक प्रवासात जेव्हा साधकाला सत्याचे दर्शन होते, तेव्हा त्याला दाहक अनुभवांऐवजी एक प्रकारची आंतरिक शांतता आणि शीतलता लाभते. ही चंद्रकोर म्हणजे त्या आत्मज्ञानाची शीतलता आहे. ती भक्ताला आश्वासन देते की, मायेच्या तप्त उन्हात पोळलेल्या जीवाला देवीच्या चरणी चंद्रासारखी शीतल छाया मिळेल. तंत्रशास्त्रात ‌‘ॐ‌’ या प्रणव मंत्राच्या वर जो अर्धचंद्र आणि बिंदू असतो, त्याचे देवीच्या चंद्रकोरीशी जवळचे नाते आहे. याला ‌‘नाद-बिंदू‌’ क्रिया म्हणतात. हा अर्धचंद्र सृष्टीच्या उत्पत्तीचे सूक्ष्म स्वरूप आहे. देवीच्या मस्तकावरील चंद्रकोर ही दर्शवते की, ती ‌‘शब्दब्रह्म‌’ स्वरूपिणी आहे आणि सर्व मंत्रांची शक्ती तिच्यातच सामावलेली आहे.

देवीच्या चार हातांचे वर्णन करताना आचार्य सांगतात की, तिने एका हातात स्फटिकाची जपमाळ धारण केली आहे, जी निरंतर एकाग्रतेचे प्रतीक आहे. दुसऱ्या हातात तिने पुस्तक धारण केले आहे, जे जगातील सर्व विद्या आणि परा-अपरा ज्ञानाचे भांडार आहे. तिचे उर्वरित दोन हात वर आणि ‌‘अभय‌’मुद्रेत आहेत. याचा अर्थ असा की, ती आपल्या भक्तांच्या मनातील भीती दूर करून त्यांना अभय देते आणि त्यांच्या इच्छित कामना पूर्ण करण्याचे वरदान देते. अशा या तेजस्वी रूपाला ज्या साधकाने आयुष्यात एकदाही पूर्ण श्रद्धेने आणि अनन्य भावाने नमस्कार केला आहे, त्याच्या वाणीत एक विलक्षण चमत्कार घडतो. त्या साधकाच्या मुखातून उमटणारे शब्द इतके रसाळ आणि गोड होतात की, त्यांच्यापुढे मध, दूध आणि द्राक्षे यांचे नैसर्गिक माधुर्यही फिके पडते. थोडक्यात, देवीच्या एका साध्या नमस्काराने मनुष्याला वाक्‌‍सिद्धी प्राप्त होते.

आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला, तर हा लोक ‌‘कुंडलिनी योग‌’ आणि ‌‘श्रीविद्या‌’ उपासनेतील अत्यंत गूढ रहस्य उलगडून दाखवतो. देवीचा शुभ्र किंवा धवल वर्ण हा शुद्ध सत्त्व गुणाचे प्रतीक आहे. जेव्हा एखादा साधक साधना करतो, तेव्हा त्याचे चित्त प्रारंभी रज आणि तम गुणांनी मलीन असते. देवीचे हे धवल रूप त्याच्या अंतःकरणातील अज्ञानाचा अंधकार दूर करून, तिथे ज्ञानाचा प्रकाश पसरवते. देवीच्या मस्तकावरील ‌‘शशियुत-जटाजूट‌’ म्हणजे सहस्रार चक्रातील त्या स्थितीचे वर्णन आहे, जिथे चंद्रमंडळातून अमृताचा स्राव होतो आणि साधक ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो.

देवीच्या हातातील ‌‘स्फटिकमाळ‌’ हे क्रियेचे (साधनेचे) आणि पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक आहे. आध्यात्मिक मार्गावर केवळ पुस्तक वाचून ज्ञान मिळत नाही, तर त्यासाठी नामाचा किंवा मंत्राचा जप (माळ) करणेही तितकेच आवश्यक आहे. हे दोन्ही हातात असणे, म्हणजे ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय होय. तसेच, वर आणि ‌‘अभय‌’ मुद्रा हे दर्शवतात की, जोपर्यंत साधक संसाराच्या भयापासून मुक्त होत नाही, तोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होऊच शकत नाही.

या लोकातील सर्वांत गुह्य भाग म्हणजे ‌‘फणितयः‌’ (वाणी.) तंत्रशास्त्रानुसार वाणीचे चार स्तर असतात परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. सामान्य माणूस वैखरी वाणीत बोलतो, पण जो या वाग्देवतेची उपासना करतो, त्याची वाणी थेट ‌‘परा‌’ स्तरावरून येते. जेव्हा वाणी मधु-क्षीर-द्राक्षा यांहून मधुर होते, तेव्हा याचा अर्थ असा की साधकाचे ‌‘विशुद्ध चक्र‌’ (जे कंठस्थानी असते) पूर्णतः जागृत झाले आहे. अशा व्यक्तीचे बोलणे केवळ शब्द नसून, ते मंत्रासारखे प्रभावी ठरतात. ‌‘सकृन्न त्वा नत्वा‌’ यातील ‌‘सकृत्‌‍‌’ शब्दाचा अर्थ असा आहे की, जर एखाद्याने अहंकाराचा त्याग करून पूर्ण शरणागतीने एकदाच जरी त्या आदिशक्तीला स्मरले, तरी तिची कृपा त्या साधकाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून साहित्याच्या, काव्याच्या आणि ब्रह्मज्ञानाच्या अत्युच्च शिखरावर बसवते. हे माधुर्य केवळ जिभेचे नसून ते आत्म्याचे असते, जे ऐकणाऱ्याला शांती आणि आनंद प्रदान करते.

सौंदर्यलहरीतील 15व्या लोकाचा मंत्रशास्त्रानुसार विनियोग हा अत्यंत प्रभावी मानला जातो. तंत्रशास्त्र आणि श्रीविद्येच्या परंपरेत या लोकाचा उपयोग केवळ स्तुती म्हणूनच नव्हे, तर वाक्‌‍सिद्धी आणि बुद्धीचा विकास करण्यासाठी एका विशिष्ट विधीद्वारे केला जातो. या लोकाचा विनियोग प्रामुख्याने कवित्व आणि पांडित्य प्राप्त करण्यासाठी केला जातो. जो मनुष्य जन्मतः मूक आहे, ज्याची बुद्धी जड झाली आहे किंवा ज्याला शास्त्रांचे आणि साहित्याचे सखोल ज्ञान संपादन करायचे आहे, त्याच्यासाठी हा लोक एका सिद्ध मंत्राप्रमाणे कार्य करतो. याला ‌‘वाग्वादिनी मंत्र‌’ किंवा ‌‘सरस्वती मंत्रा‌’चे फळ देणारा लोक मानले जाते.

या लोकाचा मंत्र म्हणून वापर केल्यावर, साधकाच्या व्यक्तित्वात विलक्षण बदल दिसून येतात. त्याच्या वाणीत एक प्रकारचा अधिकार आणि ओज निर्माण होते. जो कोणी या मंत्राची साधना करतो, त्याला क्लिष्ट विषयांचे आकलन सहज होऊ लागते. विशेषतः विद्याथ, शिक्षक, वक्ते आणि साहित्यिक यांच्यासाठी हा विनियोग वरदान ठरतो. मंत्राच्या प्रभावाने साधकाची मध्यमा वाणी जागृत होऊन त्याला स्फुरण चढू लागते, ज्याला आपण प्रतिभा म्हणतो.

आध्यात्मिक परिभाषेत सांगायचे तर, हा विनियोग साधकाच्या ‌‘विशुद्ध चक्रा‌’ची शुद्धी करतो. जेव्हा हे चक्र शुद्ध होते, तेव्हा साधक जे काही बोलतो, ते सत्य होऊ लागते (वाक्‌‍सिद्धी.) आदि शंकराचार्यांनी हा लोक अशा पद्धतीने गुंफला आहे की, त्याचे उच्चारण करताना निर्माण होणारी ध्वनिलहरी सरळ आपल्या मस्तकातील ज्ञानतंतूंवर परिणाम करते आणि बुद्धीची प्रखरता वाढवते. हा विनियोग करताना केवळ मंत्राचा उच्चार महत्त्वाचा नसून, त्यातील देवीच्या शीतल आणि शुभ्र रूपाशी एकरूप होणे (तन्मयता) हे यशाचे खरे गमक आहे.
(क्रमश:)

- सुजीत भोगले
9370043901