Sadhana Saptah 2026 : केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी अंतर्गत आयोजित

‘साधना सप्ताह २०२६’ मध्ये महाराष्ट्र अव्वल · मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक

    23-Apr-2026
Total Views |
sadhana saptah
 
मुंबई : (Sadhana Saptah 2026) केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावत नवा मानदंड प्रस्थापित केला असून या अध्ययन सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील या उपक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, या सर्वांच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.(Sadhana Saptah 2026)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानोपासना, क्षमताविकास आणि उत्तम सार्वजनिक सेवा देण्याच्या दृष्टीने मिशन कर्मयोगी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठबळ उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले आहेत.(Sadhana Saptah 2026)
 
महाराष्ट्रातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘आयगॉट कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मवर एकूण ४६ लाख ९४ हजार ५९७ अभ्यासक्रम पूर्ण करत ६ लाख ५९ हजार ७५९ एआय-विशिष्ट प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. हे आधुनिक सुशासन आणि क्षमता विकासाबाबत राज्याच्या दृढ वचनबद्धतेचे द्योतक, असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.(Sadhana Saptah 2026)
 
हेही वाचा :  Navnath Ban : मोर्चाच्या आक्रोशामुळे विरोधकांच्या कानठळ्या बसल्या आहेत - नवनाथ बन
 
देशभरातील सुमारे ३३ लाख ४ हजार शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ‘साधना सप्ताहा’त सहभाग घेत ‘आयगॉट कर्मयोगी’प्लॅटफॉर्मवर सुमारे चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यामध्ये राज्यातील ५ लाखांहून अधिक अधिकारी - कर्मचारी सहभागी झाले होते. या उपक्रमात महाराष्ट्राने केलेली कामगिरी ही राज्याच्या प्रशासनिक कार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना असल्याचेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी नमूद केले.(Sadhana Saptah 2026)