राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केवळ एक संघटनात्मक प्रयोग नसून, भारतीय संस्कृतीच्या अखंड परंपरेतून उगम पावलेली एक जिवंत आणि गतिशील विचारप्रणाली आहे. व्यक्तिनिर्माणातून समाजनिर्माण आणि समाजातून राष्ट्रनिर्माण हाच त्याचा मूलाधार राहिला आहे. समरसता, शिस्त आणि कर्तव्यभाव या मूल्यांच्या आधारे संघाने काळाच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध करत एक प्रभावी सामाजिक शक्ती म्हणून आज स्थान निर्माण केले आहे. संघाच्या कार्यपद्धतीचा आणि प्रवासाचा घेतलेला मागोवा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ एक संघटना नाही, तर ती एक जिवंत, सतत प्रवाहित होणारी विचारधारा आहे. 1925 मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी रोवलेले हे बीज, आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. या वटवृक्षाच्या छायेत लाखो स्वयंसेवक घडले, समाजाचे विविध घटक एकत्र आले आणि राष्ट्रनिर्माणाची एक सशक्त परंपरा उभी राहिली. जवळपास शतकभराच्या या प्रवासात संघाने अनेक वादळे, टीका, गैरसमज आणि आरोप यांचा सामना केला. पण, संघ आपल्या मूलभूत ध्येय-धोरणांपासून कधीही विचलित झाला नाही. संघाचे कार्य हे नेहमीच प्रसिद्धीपेक्षा कृतीवर आधारित राहिले आहे आणि हाच त्याच्या शक्तीचा खरा स्रोत आहे.
संघाच्या कार्यपद्धतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिनिर्माण! संघ व्यक्तीला केवळ शारीरिक किंवा बौद्धिकदृष्ट्या सक्षम करत नाही, तर त्याला मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची प्रेरणा देतो. शाखेत होणाऱ्या दैनंदिन क्रियाकलापांमधून शिस्त, संघटनशक्ती, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठा यांचा विकास होतो. ही प्रक्रिया साधी वाटली, तरी तिचा परिणाम अत्यंत व्यापक आणि दीर्घकालीन असतो. कारण एक व्यक्ती सर्वार्थाने सक्षम झाली की, त्या व्यक्तीद्वारे कुटुंब, समाज आणि राष्ट्रही सक्षम होते.
1934 मध्ये महात्मा गांधी यांनी संघाच्या शाखेला दिलेल्या भेटीत, एक अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शाखेत त्यांना कोणताही भेदभाव जाणवला नाही. सर्वजण एकत्र बसून, कोणत्याही जात-पात, उच्च-नीच भावनेशिवाय समतेचा अनुभव घेत होते. त्याकाळात अस्पृश्यतेचा प्रश्न अत्यंत तीव्र असाच होता. समाजात खोलवर रुजलेल्या या विकृतीच्या पार्श्वभूमीवर, संघाच्या शाखेत दिसणारी समरसता ही केवळ एक विचार नव्हती, तर ती एक जिवंत वास्तव होती. या समरसतेच्या भावनेमुळेच, संघाने समाजाला एकत्र आणण्याचे कार्य सातत्याने केले आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात संघकार्याचा विस्तार अधिक वेगाने झाला. देशासमोरील विविध संकटकाळात स्वयंसेवकांनी पुढे येऊन सेवाकार्य केले. 1962च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी स्वयंसेवकांनी सीमावत भागात, तसेच शहरांमध्ये मदतकार्य उभारले. रक्तदान शिबिरे, शिस्तबद्ध वाहतूक नियंत्रण, सैनिकांच्या कुटुंबांना मदत अशा अनेक क्षेत्रांमध्ये, त्यांनी योगदान दिले. या सेवाभावाची दखल घेऊन 1963च्या प्रजासत्ताक दिन संचलनात, संघाच्या स्वयंसेवकांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली. हा केवळ सन्मानच नव्हता, तर संघाच्या राष्ट्रनिष्ठेची अधिकृत पातळीवर घेतली गेलेली दखल होती.
1954 मध्ये दादरा-नगर हवेली मुक्ती आंदोलनातही स्वयंसेवकांनी बजावलेली भूमिका, अत्यंत महत्त्वाची ठरली. परकीय सत्तेविरुद्ध लढताना त्यांनी संघटित-शक्तीचे यथार्थ दर्शन घडवले. या आंदोलनातून केवळ दादरा-नगर हवेलीची भौगोलिक मुक्तीच झाली नाही, तर स्वाभिमान आणि राष्ट्रभावनेची जाणीव अधिक दृढ झाली. या सर्व घटनांमधून संकटाच्या काळात पुढे येणे, समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणे आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राथमिकता देणे हा संघाचा स्वभाव स्पष्ट होतो.
मात्र, संघावर वेळोवेळी विविध प्रकारचे आरोप झाले. कधी त्याला राजकीय चौकटीत बसवण्याचा प्रयत्न झाला, तर कधी त्याच्या उद्देशांबद्दल गैरसमज पसरवले गेले. परंतु, संघाने या सर्वांना कधीही आक्रमक प्रतिक्रिया दिली नाही. त्याऐवजी संघाने आपल्या कार्यातूनच उत्तर दिले. वादात न अडकता, कार्यातून आपली ओळख निर्माण करणे हीच संघाची एक मोठी ताकद आहे. समाजाच्या विविध स्तरांमध्ये निःशब्दपणे कार्यरत राहून, संघाने आपले स्थान दृढ केले आहे.
शिक्षण, सेवा आणि संस्कार या त्रिसूत्रीवर आधारित संघकार्य, समाजाला जोडण्याचे काम करत आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात विविध शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्था आज कार्यरत आहेत. सेवा क्षेत्रात आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामीण विकास आणि वंचित घटकांसाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत. या सर्व संस्थांमध्ये संस्कारांच्या माध्यमातूनच व्यक्तीमध्ये मूल्यांची जोपासना केली जाते. या सर्व प्रयत्नांमधून समाजात एक सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्नही केला जात आहे.
आजच्या काळात समाजासमोर अनेक नवीन आव्हाने उभी आहेत. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या युगात माहितीचा प्रचंड ओघ आहे. पण, त्याचबरोबर दिशाभूल होण्याचाही धोका वाढला आहे. सामाजिक माध्यमांमुळे संवाद वाढला असला, तरी त्याच वेळी तणाव, विभाजन आणि मतभेदही वाढले आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक समरसता, राष्ट्रीय ओळख आणि सांस्कृतिक मूल्ये टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. संघाचे कार्य यादृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरते. कारण, संघ व्यक्तीला स्थैर्य, दिशा आणि मूल्याधिष्ठित विचारदेतो.
संघाचा विस्तार आज केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. जगभरातील भारतीय समाजात संघप्रेरित कार्य दिसून येते. विविध देशांमध्ये शाखा, सेवा प्रकल्प आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून, भारतीय संस्कृतीचा प्रसार होत आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचे कार्य संघ करत आहे. ही केवळ संघटनेची वाढ नाही, तर भारतीय विचारांच्या जागतिक स्वीकाराचीही साक्ष आहे.
संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलण्याची गरज आहे. संघाला केवळ राजकीय चष्म्यातून पाहणे, हे त्याच्या कार्याचा घेतलेला अपूर्ण आढावा ठरतो. संघ राष्ट्रभक्तीची, समरसतेची आणि कर्तव्यनिष्ठेची एक शाश्वत चेतना आहे. ही चेतनाच व्यक्तीला प्रेरणा देते, समाजाला एकत्र आणते आणि राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेला गती देते. आजच्या पिढीसमोर एक मोठे आव्हान आहे, ते म्हणजे ओळख टिकवण्याचे. जागतिकीकरणाच्या या युगात स्थानिकतेचा आणि सांस्कृतिक मूल्यांचा प्रश्न अधिकच महत्त्वाचा झाला आहे. संघ या पिढीला आपल्या मुळांशी जोडण्याचे कार्य करत आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधत, नवीन पिढीला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.
संघ समजून घ्यायचा असेल, तर तो केवळ टीका किंवा समर्थनाच्या चौकटीत न बसवता, प्रत्यक्ष कार्यातून पाहावा लागेल. कारण, संघ हा शब्दांमध्ये मावणारा विषय नसून; तर ती अनुभवण्याची, जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची एक प्रक्रिया आहे. संघाच्या कार्याचा प्रभाव समजून घेण्यासाठी त्याच्या स्वयंसेवकांशी संवाद साधावा लागतो, त्यांच्या कार्यात सहभागी व्हावे लागते आणि समाजात घडणाऱ्या बदलांकडे लक्ष द्यावे लागते.
संघाच्या कार्यपद्धतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारा घटक म्हणजे ‘संवाद’. संघाचा संवाद हा केवळ माहिती देण्यापुरता मर्यादित नाही, तर तो मनाला स्पर्श करणारा, विश्वास निर्माण करणारा आणि समाजाला जोडणारा असाच आहे. शाखेपासून ते समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारी ही संवाद व्यवस्थाच संघाच्या यशाचे एक प्रमुख कारण आहे.
संघात संवाद हा वरून खाली असा एकतर्फी नसून, तो द्विमाग आहे. स्वयंसेवक एकमेकांशी सतत संवाद साधतात, अनुभवांची देवाणघेवाण करतात आणि समाजातील गरजा समजून घेतात. यामुळे संघाचे कार्य हे केवळ नियोजनापुरते राहत नाही, तर ते वास्तव परिस्थितीशी जोडलेले राहते. प्रत्येक स्वयंसेवक हा संघाचा ‘संवादवाहक’ बनतो आणि आपल्या परिसरात, कुटुंबात व समाजात सकारात्मक विचार पोहोचवतो.
संघाचा संवाद हा भाषणांपुरता किंवा प्रचारापुरता मर्यादित नाही, तर तो कृतीतून दिसतो. सेवा प्रकल्प, आपत्तीच्या वेळी केलेले मदतकार्य, शिक्षणाच्या माध्यमातून दिलेले संस्कार या सर्वांमधूनच संघाचा संदेश समाजापर्यंत पोहोचतो. त्यामुळे संघाचा संवाद हा शब्दांपेक्षा अनुभवांमधूनच अधिक प्रभावीपणे पोहोचतो. आजच्या ‘डिजिटल’ युगातही संघाने संवादाच्या पारंपरिक पद्धतींचे महत्त्व कायम ठेवले आहे. प्रत्यक्ष भेटी, घर-घर संपर्क, शाखा, लहान गटांतील चर्चा या माध्यमांतून संवाद अधिक विश्वासार्ह आणि परिणामकारक बनतो. कारण, प्रत्यक्ष संवादातून निर्माण होणारा विश्वास कोणत्याही माध्यमातून सहज निर्माण होत नाही.
संघ समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ग्रामीण भागातील दुर्गम वस्ती असो किंवा शहरी झोपडपट्टी, स्वयंसेवक त्या-त्या ठिकाणी जाऊन लोकांशी जोडले जातात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यानुसार कार्य उभे करतात. त्यामुळे संघाचा संवाद हा केवळ विचार पोहोचवणारा नसून, तो समस्या सोडवणारा आणि आशा निर्माण करणारा ठरतो. संघाच्या या संवाद पद्धतीमुळेच संघ ही केवळ एक संघटना न राहता, समाजाच्या प्रत्येक घटकांत पोहोचलेली एक सशक्त चळवळ बनली आहे. घराघरांत पोहोचणारा, मनामनांत रुजणारा आणि कृतीतून व्यक्त होणारा हा संवादच संघाला अधिक व्यापक आणि प्रभावी बनवतो.
संवाद ही संघाची केवळ ताकद नाही, तर तोच त्याच्या विस्ताराचा आणि समाजाशी असलेल्या नात्याचा खरा पाया आहे. संघ हा केवळ एक संघटनात्मक ढाचा नाही; तो राष्ट्राच्या चेतनेतील एक जिवंत विचार आहे; जो काळानुसार बदलत असला तरीही, आपल्या मूलभूत मूल्यांशी कधीही तडजोड करत नाही.
- अभिषेक त्रिपाठी
(लेखक भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ता आहेत.)