भारतीय ज्ञानपरंपरा ही केवळ अध्यात्मिकच नव्हे तर तात्त्विक, सामाजिक आणि सांस्कृतिक चिंतनाची समृद्ध परंपरा आहे. वेद, उपनिषदे, पुराणे आणि विविध तत्त्वप्रणालींमधून मानवजीवनाचा अर्थ, कर्तव्य आणि मोक्ष यांचा सखोल विचार मांडला गेला आहे. या परंपरेत विविध आचार्यांनी आपापल्या विचारांनी नवचैतन्य निर्माण केले आणि समाजाला दिशा दिली. अशाच परंपरेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे रामानुजाचार्य. त्यांनी ‘विशिष्टाद्वैत’ तत्त्वज्ञान मांडत भक्ती आणि समतेचा संदेश दिला. बुधवार दि. 22 एप्रिल रोजी झालेल्या श्री रामानुजनाचार्य यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
भारतीय अध्यात्माच्या प्राचीन इतिहासात काही महान व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की ज्यांनी केवळ धर्माचाच प्रचार केला नाही, तर समाजाच्या मूलभूत रचनेतही अमूल्य परिवर्तन घडवून आणले. श्रीमद् रामानुजाचार्य हे असेच एक युगपुरुष होय. श्रीपेरंबदुर या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सोमयाजी हे विद्वान ब्राह्मण होते, तर माता कांतिमती अत्यंत धार्मिक आणि सद्गुणी होत्या. लहानपणी त्यांचे नाव इलय पेरुमळ असे होते.
लहान वयातच रामानुजाचार्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी कांचीपुरम येथे जाऊन वेदांचे अध्ययनही सुरू केले. तेथे त्यांनी यादवप्रकाश या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या आचार्यांकडून शिक्षण घेतले. रामानुजाचार्य अत्यंत बुद्धिमान आणि विचारशील विद्याथ होते. त्यांच्या गुरूंच्या वेद व्याख्यांमध्ये असलेल्या अनेक त्रुटी, त्यांना जाणवत असत. त्यांनी त्या चुका दाखवून दिल्या आणि स्वतःच्या नवीन व्याख्या मांडल्या. त्यांच्या या प्रतिभेमुळे इतर विद्याथ त्यांचे कौतुक करत; परंतु यामुळे यादवप्रकाश यांना त्यांच्याविषयी मत्सर वाटू लागला. मत्सराच्या भरात यादवप्रकाश यांनी रामानुजाचार्यांचा जीव घेण्याचाही कट रचला. त्यांनी वाराणसी यात्रेनिमित्ताने हा कट आखला. मात्र, रामानुजाचार्यांचे चुलत भाऊ गोविंद भट्ट यांनी हा कट ओळखून, त्यांना सावध केले. देवाच्या कृपेने आणि एका शिकाऱ्याच्या मदतीने रामानुजाचार्य त्या संकटातून सुटले. हीच घटना त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. त्या काळात दक्षिण भारतात विशिष्टाद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाची पायाभरणी झाली होती. श्रीवैष्णव परंपरेचे प्रमुख आचार्य यमुनाचार्य होते. त्यांच्या शिष्यांपैकी कांचीपूर्ण नावाचे एक महान भक्त, कांचीपुरम येथे सेवा करत होते. जरी ते शूद्र असले, तरी त्यांच्या भक्तीमुळे समाजात त्यांना मोठाच सन्मान होता. रामानुजाचार्यांच्या मनात त्यांच्याप्रति अत्यंत आदरयुक्त भाव होता.
एकदा रामानुजाचार्यांनी कांचीपूर्णांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले. परंतु, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नीने त्यांना भोजन दिले आणि नंतर शूद्राला सेवा दिल्यामुळे स्वतः स्नान केले. हीच गोष्ट रामानुजाचार्यांना अत्यंत खटकली. अशा अनेक घटनांमुळे त्यांनी गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यास स्वीकारला.
दरम्यान, यमुनाचार्य वृद्ध झाले होते आणि आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी रामानुजाचार्यांची निवड केली होती. परंतु, रामानुजाचार्य श्रीरंगम येथे पोहोचण्याआधीच यमुनाचार्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी, रामानुजाचार्यांनी त्यांच्या तीन इच्छांची पूर्तता करण्याची प्रतिज्ञा केली. ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहिणे, पराशर आणि नाम्माळवार यांच्या नावांचा गौरव करणे. रामानुजाचार्यांनी पुढील आयुष्यात या सर्व इच्छा पूर्ण केल्या. त्यांनी श्रीभाष्य हा ग्रंथ लिहून, ब्रह्मसूत्रांचे सखोल विवेचन केले. त्यांनी वेदांतसार, वेदांतसंग्रह आणि वेदांतदीप हे ग्रंथही लिहिले. त्यांच्या या लेखनातून वेदांचे गूढ ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचले.
रामानुजाचार्यांनी थीरूकोटीपुर येथे नांबी यांच्याकडून, ‘ॐ नमो नारायणाय’ या मंत्राची दीक्षा घेतली. गुरूंनी हा मंत्र गुप्त ठेवण्याची अट घातली होती परंतु, रामानुजाचार्यांनी सर्व समाजाच्या कल्याणासाठी मंदिराच्या गोपुरावर उभे राहून हा मंत्र सर्वांना सांगितला. त्यांच्या या कृतीमागे, मानवतेप्रति असलेली करुणा होती. त्यांनी स्पष्ट सांगितले की, जर माझ्या कृतीमुळे मला नरकात जावे लागले, तरी लाखो लोकांचे कल्याण होणार असेल तर मी ते आनंदाने स्वीकारेन. त्यांच्या या महानतेमुळे त्यांच्या गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला.
रामानुजाचार्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून भक्तीचा संदेश दिला. त्यांनी वाराणसी, काश्मीर आणि बद्रीनाथ यांसारख्या पवित्र स्थळांना भेट दिली. तिरुमला येथे त्यांनी शैव आणि वैष्णव यांच्यातील वाद शांततेने सोडवला. त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे, समाजात मोठा बदल घडून आला. त्यांनी मंदिरांचे शुद्धीकरण केले, पूजापद्धतींचे नियमन केले आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठीही प्रयत्न केले. त्यांनी 700 संन्यासी, 74 प्रमुख अधिकारी आणि हजारो शिष्यांचा समुदाय तयार केला.
चोल राजा कुलोत्तुंग यांच्या काळात त्यांना छळ सहन करावा लागला. त्यांच्या शिष्यांवर अत्याचार झाले. त्यामुळे रामानुजाचार्यांनी म्हैसुर परिसरात आश्रय घेतला. तेथे त्यांनी मेलकोट येथे मंदिर उभारले आणि समाजातील वंचित घटकांनाही मंदिरात प्रवेश दिला.
श्रीमद् रामानुजाचार्यांनी जवळपास 120 वर्षांचे आयुष्य जगले आणि त्यांनी शेवटपर्यंत धर्मप्रसाराचे कार्य केले. त्यांच्या तत्त्वज्ञानानुसार परमात्मा (नारायण), जीव (चित) आणि प्रकृती (अचित) हे तीन घटक आहेत. जीवाने पूर्ण समर्पण (शरणागती) करून ईश्वरप्राप्ती साधावी, असा त्यांनी उपदेश केला. श्रीरामानुजाचार्य हे केवळ एक तत्त्वज्ञ नव्हते, तर ते एक महान समाजसुधारक, गुरू आणि मानवतावादी होते. त्यांनी समानता, भक्ती आणि करुणेचा संदेश देऊन समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या विचारांचा प्रकाश आजही मानवतेचा मार्ग प्रज्ज्वलित करीत आहे.
- डॉ. भालचंद्र हरदास
(लेखक ‘भारतीय शिक्षण मंडळा’चे नागपूर महानगरमंत्री आहेत.)