‘से नो टू ड्रग्ज‌’

    23-Apr-2026
Total Views |

से नो टू ड्रग्ज‌’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी, दि. 1 मेपासून 12 महिन्यांचा उपक्रम मुंबईकरांसमोर सादर करण्याचा निर्णय घेतला. उपक्रम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर त्याची अंमलबजावणी केली जाईल. याविषयासंबंधी काही दिवसांपूर्वी लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटदेखील घेतली होती. ‌‘आधी केले, मग सांगितले‌’ या उक्तीनुसार, सर्वप्रथम मुंबई येथील नागरिकांचे लोकप्रतिनिधी म्हणून उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असेच. काही दिवसांपूव मुंबईतील गोरेगाव नेस्को संकुलातील ‌‘लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट‌’मध्ये अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामुळे युवक-युवतींमधील वाढत्या व्यसनाधीनतेचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला. पंजाबमधील तरुणाई आज नशेखोरीच्या विळख्यात सापडली असून, पाकिस्तानमधून सीमामार्गे अमली पदार्थांची होत असलेले तस्करी हे मोठे कारण आहे. पाकिस्तानातून पंजाबमध्ये येणारे अमली पदार्थच पुढे देशभर पाठवले जातात.

‌‘उडता पंजाब‌’ हा चित्रपट व्यसनाधीनतेच्या दाहक परिणामावरच भाष्य करणारा होता. अलीकडेच 2022 पासून आतापर्यंत पंजाबमध्ये 95 हजारच्या वर अमली पदार्थांचे तस्कर आणि ‌’सप्लायर‌’ यांना अटक करण्यात आली आहे. कॅनडा आणि अमेरिकेसारख्या देशात तर ‌‘झोंबी ड्रग्ज‌’मुळे, तासन्‌‍तास विचित्र अवस्थेत एकटेच उभे असलेल्या तरुण-तरुणींचे अनेक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले आहेत. याच्या सेवनाने व्यक्तीचे शरीरावरचे नियंत्रण निघून जाते आणि मेंदू अर्धवटच जागृत असतो. मध्यंतरी चंदीगढमध्ये देखील एक युवक असाच एका ठिकाणी तासन्‌‍तास उभा असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. याचा अर्थ, कॅनडा आणि अमेरिकेतील ‌‘झोंबी ड्रग्ज‌’सारखे अमली पदार्थ, भारतात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास यासाठी जिहादी छुपा पाठिंबा देतील. मुंबईतील तरुणाईला या जिहादीपुरस्कृत नशेपासून रोखण्यासाठीच लोढा यांनी पुढाकार घेतला असून, समाजातील प्रत्येक घटकाने महिन्यातील किमान एक तास नशामुक्ती अभियानासाठी, ड्रग्जमुक्त मुंबईसाठी द्यावा. ‌‘नशामुक्त मुंबई‌’ अभियान यशस्वी होण्यासाठी, व्यापक जनसहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन लोढा यांनी केले आहे.

काँग्रेसला ‌‘काळ‌’ सोकावतोय

गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर ती स्वतःच्या नाकर्तेपणातून घालवल्यामुळे, काँग्रेसच्या नेत्यांना आता ‌‘काळ‌’ सोकावत असल्याचे प्रत्यंतर येत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यातून दिसते. त्यामुळे त्यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम चालवला आहे. महिला आरक्षणावर भाजप बुद्धिभेद करत आहे, असे वक्तव्य अलीकडेच त्यांनी केले. मुळात आपल्या सत्ता काळात संधी असूनही, काँग्रेसने महिलांना 33 टक्के आरक्षण का दिले नाही? याचे उत्तर सपकाळ देतील काय? भाजपबाबत संविधानाला न मानणारा पक्ष म्हणणाऱ्या सपकाळ यांनी, स्वतःच्या पक्षात फक्त एकाच गांधी कुटुंबाचे चालते, हे संविधानाला धरून आहे का? याचे आत्मचिंतन करावे. काँग्रेसने सीताराम केसरी यांना का आणि कशा पद्धतीने अपमानित करून पदावरून हटविले, हे देश विसरला नाही. त्यामुळे संघ आणि भाजपवर बोलताना सपकाळ यांनी काँग्रेसचा हा काळा इतिहास स्मरावा.

शहाबानो प्रकरणात संविधान संशोधन करून, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलणारा पक्ष हा काँग्रेसच होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महिलांच्या नेतृत्वाबाबत सर्वाधिक आग्रही होते. महिलांसाठी आणलेले विधेयक पाडायचे आणि स्वतःच्या सत्तेतदेखील ते लागू करायचे नाही आणि वर संविधान जिंकले म्हणायचे हेच काँग्रेसचे खरे रूप आहे, अशी टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकपदी महिला नाहीत असे वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांना याची माहिती नसेल की, महिलांसाठी कार्य करणारी संघविचाराने प्रेरित ‌‘राष्ट्र सेविका समिति‌’ नावाची एक वेगळी संघटनाच कार्यरत आहे. ही संघटना हिंदू महिलांमध्ये राष्ट्रप्रेम, आत्मसन्मान आणि हिंदुत्वाची भावना जागृत करते आणि पूर्णपणे महिलांद्वारेच चालवली जाते. तसेच संघात गेल्या 100 वर्षांत कधीही फूट पडली नाही. भाजपमध्येसुद्धा कधी फूट होऊन दुसरा पक्ष तयार झाला आहे, असे आजपर्यंत घडलेले नाही. याउलट, काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली की, स्वतःला निष्ठावान म्हणणारे काँग्रेस नेते मात्र लगेच पक्ष सोडून पुन्हा सत्तेची वाट धरतात. आजपर्यंत काँग्रेसमधून फुटून किती पक्ष तयार झाले, याची माहिती एकदा स्वतः सपकाळ यांनीच काँग्रेसच्या इतिहासातून घ्यावी म्हणजे, पुढे पुन्हा ‌‘काळ‌’ सोकावणार नाही.

- अभिनंदन परुळेकर