Maharashtra Health System : आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी निधीचे योग्य नियोजन करा-आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर
23-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Maharashtra Health System) आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी निधीचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.सन 2025-26 या आर्थिक वर्षातील राज्य निधी (State Budget) तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत प्राप्त निधी व त्याच्या नियोजनाबाबत आरोग्य भवन, येथे आढावा बैठक झाली. आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, आरोग्य सेवेची प्रभावी अंमलबजावणी हीच शासनाची प्राथमिकता आहे. याचबरोबर जिल्हास्तरावर थॅलेसेमिया रुग्णांना नियमितपणे दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करावे. (Maharashtra Health System)
बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य औषधी द्रव्ये व साहित्य खरेदी प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच सन 2024 ते 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या औषधे व यंत्रसामुग्री खरेदीचे परीक्षण करण्यात आले. चालू वर्षातील कामकाजाचे नियोजन आणि रेट कॉन्ट्रॅक्ट प्रक्रियेची अंमलबजावणी याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये पीसीओडी (PCOD) क्लिनिक सुरू करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती देण्यात आली. “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या अभियानाच्या वर्षपूर्ती निमित्त सविस्तर आढावा घेण्यात आला. थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार असून त्यामध्ये रुग्णांना नियमित रक्त संक्रमणाची आवश्यकता भासते. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लग्नपूर्व समुपदेशन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करत, सर्व वधू-वर सूचक मंडळांमार्फत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. (Maharashtra Health System)
यावेळी कार्यक्रम प्रमुखनिहाय प्रस्तावित अंदाजपत्रक, कार्यक्रम खर्च आणि अनिवार्य खर्च यांचा सविस्तर आढावा राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी घेतला.
बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह आरोग्य विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Maharashtra Health System)