
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः|
इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः॥अ-2 लो-60॥
साधनेच्या मध्य व उत्तर अवस्थेमध्ये साधकाच्या पिंड अस्तित्त्वात विलक्षण शक्ती आपोआप येतात. या अवस्थेत इंद्रियांचा आवेग सांभाळणे, मोठमोठ्या साधकांनासुद्धा कठीण जाते. उत्तर साधना अवस्थेत इंद्रिये चांगल्या मनाचेसुद्धा हरण करतात. इंद्रिये म्हणजेच ‘गौ.’ या महाप्रबल साधना अवस्थेचे वर्णन उत्तर गोग्रहण कथेद्वारे वेदव्यासांनी सुरस ढंगाने केले आहे. यामध्ये दुर्योधन वृत्तीसोबत कर्ण आणि भीष्म वृत्तींनी राहणे अनिवार्य आहे. हेच कौरवांच्या विराट नगरीवर उत्तर दिशेने हल्ला करून गायींचे, अर्थात वाईट वृत्तींनी आपल्या इंद्रियांचे हरण करणे आहे. अशा विक्राळ अवस्थेमध्ये ‘बृहन्नडा’ म्हणजे स्वाथ जगाच्या व्यवहारात नपुंसक ठरलेली चांगली वृत्ती वाईट वृत्तींशी लढून, त्यांना हरविते. तसेच त्यांना उत्तम पांडव वृत्तीने संमोहित करून, त्यांच्या वस्त्ररूपी कुवृत्तींचे हरण करते. या वृत्तीयुद्धात अर्जुन प्रथमच कर्णाला हरवितो.
कर्णाचे शौर्य
अर्जुन जसा धनुर्धारी वीर, तद्वत् अर्जुनापेक्षाही कांकणभर अधिक वीर व धनुर्धारी कर्ण दाखविला आहे; परंतु अर्जुनासारखा कर्ण ब्रह्मात शरसंधान करणारा नसून, आपल्या केवळ कर्णांद्वारे ऐकलेल्या माहितीवरच तो लोकांना अर्जुनापेक्षाही अधिक ब्रह्मज्ञानी असल्याचे दाखवित असे. खरा ज्ञानी व वाचाळवीर यांच्यात शास्त्रवाद झाला, तर वाचाळवीर केवळ माहितीवरच आपली बाजू उत्तमपणे श्रोत्यांसमोर मांडतात आणि इतर वक्त्यांपेक्षा अधिक ज्ञानी असल्याचे जगाला पटवितात. वादाचा फड असे कर्ण सहज जिंकतात. म्हणून समोरासमोर उभे ठाकले असताना, कर्ण अर्जुनापेक्षा सरस ठरत असे. किंबहुना, काही वेळा अर्जुनाचे कर्णासमोर काहीच चालत नसे. खरा विद्वान कमी बोलणारा असल्यामुळे, त्यासमक्ष आपल्या वाक्पटुत्वाने बहु बोलणारा वाचाळ सभेमध्ये बाजी मारून नेतो. लोक अशा खोट्यांनाच ज्ञानी समजतात. कर्ण व अर्जुन यांतील हा ज्ञानाचा फरक, वेदव्यासांनी मोठ्या कौशल्याने दाखविला आहे.
कर्णाची दानशूरता
कर्णाच्या दानशूरपणाबद्दलही तसलीच रीत आहे. असले वाचाळ पंडित आपले कथित ज्ञान जगासमोर मांडण्यास नेहमीच उत्सुक असतात. तुम्ही त्यांना थोडेसे जरी विचारले, तरी ते त्यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मोठ्या सफाईने देऊन ते काय प्रकांड ज्ञानी आहेत, असे दाखवितात. त्यांचे कथित ज्ञानसंपदेचे औदार्य असे अविरत वाहात असते. कर्णाचे औदार्य असल्याच अहंमन्यतेच्या पसाऱ्यातील देखाव्यात आहे. समाजात असले दानशूर कर्ण नेहमीच असतात आणि त्यांच्यामागे लागून खऱ्या ज्ञानीजनांचा, म्हणजे अर्जुनाचा उपहास करणारे लोकही असतात. त्यामुळे समाजात भोंदू भगवानांची नेहमीच चलती असते. त्यांचा प्रचार, त्यांचे भंपक सिद्धांत लोकांना अधिक आकर्षित करतात. चारित्र्यशुद्ध असल्याशिवाय चित्ताच्या शक्ती कार्यान्वित होत नाहीत. भोळ्या-भाबड्या जनतेला कोण खरे व कोण खोटे याची कल्पनाच नसते.
सुरुवातीला असल्या स्वयंघोषित भगवानांचा खूप गाजावाजा चालतो; पण कालांतराने नष्ट होऊन खऱ्या ज्ञानीजनांचाच विजय होतो. ‘सत्यमेव जयते नानृतम्’ असे यासाठीच म्हटले आहे. कौरव-पांडव युद्धात, शेवटी पांडव पक्षालाच जय मिळतो आणि कर्णासह सारे कौरव विनाश पावतात.
कर्णाचे कुंडल व कवच
कर्णास जन्मतःच कानात कुंडले व सर्वांगव्यापित असे कवच दाखविले आहे. ही गोष्ट जीवशास्त्राच्या दृष्टीने पाहावी, तर असंभव वाटावी अशीच. इथेही भगवान वेदव्यास आपल्या कुशाग्र बुद्धीने महाभारत कथेत अधिक रंग खुलवत आहेत. कानांची खरी शोभा ही उत्तम ज्ञान ऐकल्याने वाढते, केवळ कुंडलांनीच नव्हे. कर्णाचे कान जन्मतःच कुंडलांनी आभूषित दाखविले आहेत. काही लोक केवळ उथळ माहिती ऐकून आपल्याला सत्य ज्ञानच झाले, अशा गैरसमजुतीत असतात. त्याचप्रमाणे, काही लोक इतके निर्लज्ज असतात की, त्यांची कठोरपणे कानउघडणी केली, तरी त्यांना काहीच वाटत नाही व ते आपले निंदनीय कर्म नेहमी चालूच ठेवतात. अशा प्रकारे अभेद्य चर्मवृत्ती बाळगणाऱ्या निर्लज्ज व्यक्तीलाच वेदव्यास जन्मतःच सर्वांगाला कवच धारण केलेला मानतात.
शरीरशास्त्र (Physiognomy) आजकाल काही लोक असे मानतात की, जन्मतः सर्वच मुले चांगली असतात. समाजातील दुर्वृत्तींचा त्यांच्यावर परिणाम होऊन ती बिघडतात; परंतु हे पूर्ण सत्य नाही. कारण वाईट कर्म करणाऱ्या नीच व्यक्तींचे नाक, कान, डोळे, हनुवटी, हात, पाय इत्यादी अवयव व इंद्रिये, जन्मतःच त्यांच्या पूर्वजन्मातील प्राप्त संस्कारानुसार असतात. मोठे झाल्यावर त्यांचे स्वभाव अधिक तीव्र होतात. खुनी लोकांचे डोळे तिरपे, कान भुवयांच्या सरळ रेषेच्या वर अथवा खाली असतात. जिव्हणी आणि नाकाची रचना त्यांच्या जन्मकाळापासूनच असते. त्यांच्या स्वभावानुसार वातावरण मिळाले, तर ते कट्टर खुनी होतात. जर चांगले वातावरण मिळाले, तर त्यांच्या वाईट स्वभावात थोडासा फरक जरूर पडतो; परंतु त्यांचा मूळ स्वभाव कायम राहतोच. अवयवांच्या मूळ रचनेद्वारे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो, ज्याचे बृहत् शास्त्र प्राचीन भारतात विद्यमान होते. आज या शास्त्राला ‘फिजियोनॉमी’ म्हणतात. परंतु, आजचे हे शास्त्र मात्र अजून बाल्यावस्थेतच आहे. प्राचीन भारतीय अवयव स्वभावशास्त्राला धरून वेदव्यास लिहितात की, कर्णाची कवचकुंडले त्याच्या जन्मापासूनच त्याला मिळाली आहेत.
कौरव सेनेचा सेनापती या नात्याने कर्ण फक्त दोन दिवस सेनापती राहिला आहे. त्यांपैकी एक दिवस संपलेला आहे, पांडव अजून मारले गेलेले नाहीत; अशा वेळी दुर्योधन कर्णाजवळ गेला आणि त्याने कर्ण कौरवांचे मीठ खाऊनसुद्धा पांडवांचा मोठा भाऊ या नात्याने पांडवांविषयी सहानुभूती ठेवत आहे, असा आरोप केला. तसेच, कर्णास पांडवांना मारण्याच्या प्रतिज्ञेचीही आठवण करून दिली. कर्णास ही गोष्ट अत्यंत हृदयविदारक वाटली. त्याच रात्री कर्णाने प्रतिज्ञा केली की, दुसरा दिवस उजाडताच, तो पांडवांना ठार मारेल. हे ऐकून दुर्योधन त्या रात्री सुखाने झोपला; कारण त्याचे शत्रू पांडव मारले जाण्याचा संभव अधिक बळावला होता. दुर्योधनास माहीत होते की, कर्ण हा तापट आहे, तसाच तो शूरही आहे. वाचकांनी आता हे लक्षात घ्यावे की, ही कर्णाची शूरता केवळ शाब्दिक ज्ञानाची आहे, प्रत्यक्ष शूरता नाही.
(क्रमशः)
- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357