संकटग्रस्त खैरी खापरखवल्या सापाचे आढळक्षेत्र वाढले; पश्चिम घाटातील खापरखवल्यांवर महत्त्वपूर्ण संशोधन

    23-Apr-2026
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रासह पश्चिम घाटात आढळणाऱ्या दुर्लक्षित खापरखवल्या या सापांच्या अधिवास विस्तार आणि 'आययूसीएन'च्या लाल यादीतील त्यांच्या श्रेणीसंदर्भातील संशोधन समोर आले आहे (shieldtail snake). यामध्ये महाराष्ट्रातील खैरी खापरखवल्या (Khaire's shieldtail) आणि लियट खापरखवल्या (Elliot's shieldtail या दोन प्रजातींच्या अधिवास क्षेत्राचा विस्तार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे (shieldtail snake). विस्तारामुळे खैरी खापरखवल्याची लाल यादीतील श्रेणी 'संकटग्रस्त' (एंडेंजर्ड) मधून 'कमी चिंताजनक' (नियर थ्रेटेंड) करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे (shieldtail snake). मात्र, दक्षिण भारतामधील अनेक खापरखवल्यांची श्रेणीत वाढ करुन ती 'संकटग्रस्त' (एंडेंजर्ड) करण्याचे देखील संशोधनात सूचित करण्यात आले आहे. (shieldtail snake)
 
 
खापरखवल्या हा सर्वात दुर्लक्षित असलेला सापांचा गट आहे. त्यामुळे शिल्डटेल मॅपिंग प्रोजेक्ट (एसएमपी) या सिटिझन सायन्स प्रकल्पाच्या अंतर्गत संशोधकांचा एक गट त्यावर अभ्यास करत आहे. या प्रकल्पाअतंर्गत अनुज शिंदे, एच.एन.प्रवीण, कार्तिक शंकर आणि विवेक सीरीयाक या संशोधकांनी पश्चिम घाटात आढळणाऱ्या १२ खापरखवल्या प्रजातींच्या अधिवास विस्ताराचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी वन्यजीवप्रेमी नागरिकांनी इंडियन बायोडार्व्हिसिटी पोर्टल, आय-नॅचरलिस्ट, हर्प-मॅपर या संकेतस्थळावर नोंदवलेल्या खापरवल्याच्या नोंदींचे संकलन केले. या नोंदीची तुलना 'इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर' (आययूसीएन) आणि 'ग्लोबल असेस्मेंट आॅफ रेपटाईल डिस्ट्रीब्यूशन'ने (गार्ड) नमूद केलेल्या अधिवास विस्तारासोबत केली. ही तुलना करताना त्यांनी विशिष्ट प्रजातीचे संरक्षित वनक्षेत्राबाहेरील व्याप्तीचे प्रमाण, त्या भौगोलिक क्षेत्रामध्ये झालेली मानवी वसाहतीची वाढ आणि वृक्षाच्छादनाचा ऱ्हास या तीन निर्देशकांचे देखील मापन केले. या सगळ्यांचे संकलन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, बऱ्याच खापरखवल्यांच्या अधिवासाच्या विस्तारामध्ये फरक झाले असून काहींची धोक्याची पातळी देखील वाढली आहे.
 
 
'आययूसीएन'कडून प्रजातीच्या अधिवासाच्या विस्ताराचे क्षेत्र पाहून त्याच्या धोक्याची श्रेणी ठरवली जाते. यामध्ये खापरखवल्यासारखी दुर्लक्षित प्रजात असल्यास तिच्या अधिवास क्षेत्राची ठोस माहिती मिळत नाही. तसेच माहिती मिळाल्यानंतर देखील श्रेणी ही अद्यावत करण्यास उशीर होतो. खापरखवल्यांच्या आययूसीएनच्या श्रेणीबाबतही असेच काहीस झाले आहे. खैरी खापरखवल्या हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. २०१६ साली खैरी खापरखवल्या या सापाची अचूक ओळख पटवून त्यासंदर्भातील शोध निबंध प्रकाशित करण्यात आला. त्यामुळे ही प्रजात दक्षिण महाराष्ट्र (उदा. आंबोली), गोवा आणि उत्तर कर्नाटकातील सदाहरित जंगलांमध्ये आढळत असल्याचे नमूद करण्यात आले. अशा मर्यादित अधिवास विस्तारामुळे आययूसीएनने तिचे मूल्यांकन 'संकटग्रस्त' (एंडेंजर्ड) असे केले. मात्र, मधल्या काळात या प्रजातीच्या नोंदी मध्य कर्नाटकबरोबर आंबोलीच्या उत्तरकडे देखील मिळाल्या. त्यामुळे 'एसएमपी'मध्ये या प्रजातीच्या अधिवासाचा विस्तार झाल्याचे लक्षात आले. आययूसीएनच्या २०१९ च्या माहितीनुसार या प्रजातीच्या अधिवास क्षेत्राची व्याप्ती ही ३ हजार चौ.किमी क्षेत्रावर पसरलेली आहे. मात्र, 'एसएमपी'मध्ये तिची व्याप्ती ७ हजार ६८२ चौ.किमी क्षेत्रावर पसरल्याचे लक्षात आले आहे. कारण २०१९ नंतर ही प्रजात महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर कर्नाटकातील अनेक संरक्षित वनक्षेत्रात आढळली आहे. त्यामुळे या प्रजातीची श्रेणी 'संकटग्रस्त' (एंडेंजर्ड) मधून 'कमी चिंताजनक' (नियर थ्रेटेंड) करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
 
 
शील्डटेल मॅपिंग प्रोजेक्ट
ज्ञात असलेल्या ७४ शील्डटेल प्रजातींपैकी 'आययूसीएन'ने केवळ ५६ प्रजातींचे मूल्यांकन केले आहे. ज्यापैकी अनेक प्रजातींच्या श्रेणी या अपुऱ्या माहितीमुळे Data Deficient अशा आहेत. ही उणीव भरून काढण्यासाठी, आम्ही 'शील्डटेल मॅपिंग प्रोजेक्ट' अंतर्गत सिटिझन सायन्सद्वारे टिपलेली निरीक्षणे, प्रकाशित साहित्य आणि क्षेत्रीय व संग्रहालयीन नोंदी एकत्रित करून १२ प्रजातींच्या अधिवासाच्या विस्ताराची व्याप्ती निश्चित केली आहे. यामध्ये सध्या तरी महाराष्ट्रातील दोन प्रजातींचे मूल्यांकन करण्यात आले असून येत्या काळात राज्यातील अधिक प्रजातींचे मूल्याकंन करु - अनुज शिंदे, संशोधक