जिद्द, चिकाटी आणि स्वतःवरचा अढळ विश्वास आणि मेहनतीच्या जोरावर नादब्रह्माची भक्ती करत, रसिकसेवा करणाऱ्या सदानंद मुळीक यांच्याविषयी...
मुंबईतील प्रभादेवीसारख्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या परिसरात जन्मलेले सदानंद वासुदेव मुळीक हे नाव आज जरी एक प्रसिद्ध कलावंत म्हणून ओळखले जात असले, तरी त्यांच्या आयुष्याची वाटचाल मात्र संघर्ष, जबाबदाऱ्या आणि कलेच्या ओढीने विणलेली आहे. प्रभादेवीतच जन्म झालेल्या सदानंद यांचे बालपण साधे; पण समाधानाचे होते. पालिकेच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेत असताना, घरात आई-वडील आणि पाच भावंडांचा मोठा परिवार होता. वडील गिरणी कामगार असल्यामुळे, सुरुवातीला घरची परिस्थिती स्थिर होती. मात्र, 1982च्या गिरणी कामगार संपानंतर, परिस्थिती हळूहळू ढासळू लागली. 1986 मध्ये वडिलांच्या निधनाने तर कुटुंबावर मोठाच आघात झाला. त्यामुळे वयाच्या अवघ्या 16-17व्या वषच सदानंद यांच्या खांद्यावर, घराची जबाबदारी येऊन पडली.
चरितार्थासाठी अर्थार्जन करणे तर भाग होते. त्यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या परंतु, त्या फारकाळ टिकल्या नाहीत. त्यातच त्यांच्या मनाचा ओढा सतत कलेकडे होता. त्यामुळे उपजीविकेचा संघर्ष आणि कलेची ओढ यामध्ये त्यांचा प्रवास सतत सुरुच राहिला.
सदानंद यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती, विशेषतः नाट्यसंगीताची. मात्र, त्यांचा कल अधिक सुगमसंगीताकडे होता. त्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा म्हणजे, त्यांच्या चाळीलगत असलेल्या संगीतरत्न विलासबुवा पाटील यांच्या भजनी मंडळाशी आलेला त्यांचा संपर्क. त्याकाळात ‘डबलबारी’ ही परंपरा अत्यंत लोकप्रिय होती. भजनी मंडळाच्या संचालकांचा मुलगा हा सदानंद यांचा वर्गमित्र असल्यामुळे, त्यांचा या मंडळाशी संबंध आला. इथूनच त्यांच्या कलेला खरी दिशा मिळाली. सुरुवातीला साथसंगत करतच, त्यांनी तबलावादनात प्रावीण्य मिळवले. पुढे पखवाजाचेही शिक्षण घेतले आणि अनुभवातून विविध वाद्ये वाजवण्याचे कौशल्य आत्मसात केले.
सदानंद यांची मेहनत आणि जिद्द यामुळे त्यांना, प्रभादेवीतील नामांकित सामाजिक संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात साथसंगत करण्याची संधी मिळू लागली. त्यांनी अनेक लोकनाट्यांमध्ये सहभाग घेतला, लावणीचे कार्यक्रम केले आणि खासगी कार्यक्रमांमधूनही आपली कला सादर केली. मात्र, भजन हाच त्यांच्या कलेचा आत्मा असल्यामुळे ते कधीही सुटले नाही. मुंबईत नाटके बसवून, ती गावागावांत नेण्याचे कामही त्यांनी केले. कोकणातील विविध ठिकाणी त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला. 2012 साली आईच्या निधनाने, त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठा धक्का बसला. त्यानंतर जवळपास वर्षभर त्यांना काम मिळाले नाही. मुलांचे शिक्षण सुरू असताना आर्थिक अडचणींनी डोके वर काढले. मात्र, या कठीण काळात त्यांच्या मित्रपरिवाराने आणि नातेवाईकांनी दिलेला आधार मोठा ठरला.
सदानंद यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा साधेपणा. त्यांनी कधीही मानधनासाठी हट्ट धरला नाही. स्वेच्छेने जे मिळाले, ते स्वीकारून त्यांनी आपल्या कलासाधना चालू ठेवली. ‘कोरोना’ काळात संपूर्ण कला क्षेत्र ठप्प झाले होते, तेव्हा सदानंद यांनी ‘थेटर दोस्त’ या समूहाच्या माध्यमातून पुढाकार घेतला. लोकनाट्य क्षेत्रातील सुमारे 70-80 गरजू कलाकारांना औषधे आणि धान्य वाटप करून मोलाची मदत केली.
कलेची ओढ आणि पोटाची खळगी भरण्याची गरज यामध्ये सतत झुलत राहणे, हाच सदानंद यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष. अनेकदा दिवसाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटी-मोठी कामे करताना, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या भजनांच्या सरावाला हजेरी लावावी लागे. काहीवेळा खिशात पैसे नसतानाही, केवळ कलेच्या प्रेमापोटी त्यांनी कार्यक्रम केले. रंगमंचावर मिळणारी टाळ्यांची दाद हीच त्यांच्या कष्टांची खरी कमाई. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या कलेशी तडजोड केली नाही. उलट, प्रत्येक अडचण हीच त्यांच्यासाठी नवीन शिकण्याची संधी ठरली. त्यामुळेच त्यांचा कलावंत म्हणून झालेला प्रवास केवळ कौशल्याचाच नसून जिद्द, चिकाटी आणि कलेवरील निष्ठेचा जिवंत पुरावा ठरतो.
आज सदानंद हे प्रख्यात आणि बहुआयामी ढोलकी व पखवाज वादक आहेत. त्यांनी विविध ‘लावणी’ लोककलावंतांसोबत ढोलकीवर साथसंगत केली आहे. मराठी आणि गुजराती रंगभूमी, दूरदर्शन, तसेच चित्रपट क्षेत्रातही त्यांचे काम व्यापक आहे. असे असले तरी प्रतिकूल परिस्थितीतही न खचता, कलेवरील प्रेम जपत आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना जिवंत ठेवत त्यांनी आपले आयुष्य घडवले. त्यांची कहाणी ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. की, परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द, मेहनत आणि कलेवरील निष्ठा यांच्या जोरावर माणूस आपला मार्ग नक्कीच तयार करू शकतो. सदानंद मुळीक यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने अनेक शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क 9967472572)