Smart Meter : स्मार्ट मीटर लावून महावितरणच्या ग्राहकांनी घेतली तब्बल ११ कोटीची सवलत
22-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Smart Meter) महावितरणच्या वतीने बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमुळे राज्यातील ग्राहकांना आता वीज वापरावर संपूर्ण नियंत्रण व ‘टाईम ऑफ डे’ सवलतीचा थेट फायदा मिळत आहे. विशेष म्हणजे सकाळी ९ वाजे पासून ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान वीज वापर करणाऱ्या घरगुती टीओडी मीटर धारकांना ८० पैसे प्रति युनिट सवलत मिळत आहे. महावितरणच्या भांडुप परिमंडलात जुलै २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत ३८ लाख ५९ हजार ९२६ वीज देयकांवर वीज ग्राहकांनी या विशिष्ट वेळेत वीजवापर करून रु. १० कोटी ९९ लाख २७ हजाराची सवलत घेतली आहे.(Smart Meter)
टीओडी मीटरमुळे (Smart Meter) ग्राहकांना अचूक बिलिंग मिळते व रियल टाईम मध्ये वीज वापराबाबत माहिती मिळते. ज्यामुळे ग्राहक वीजवापर करण्याचे चोख नियोजन करून वीजबिलात बचत करू शकतात. दिवसंदिवस स्मार्ट मीटर वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत चालली असून जुलै २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत ३८ लाख ५९ हजार ९२६ वीज देयकांवर वीज ग्राहकांनी तब्बल रु.११ कोटीची सवलत घेतली आहे. यामध्ये, पेण मंडळातील १२,४५,९५० वीज देयकांवर रु. १ कोटी ९० लाख ५७ हजाराची सवलत वीज ग्राहकांनी ‘टाईम ऑफ डे’ च्या माध्यमातून घेतली आहे. ठाणे मंडळातील १२,४९,०१५ वीज देयकांवर रु. ४ कोटी ४५ लाख ४८ हजाराची सवलत वीज ग्राहकांनी घेतली आहे. त्याचप्रमाणे, वाशी मंडळातील १३,६४,३६१ वीज देयकांवर रु. ४ कोटी ६३ लाख २२ हजाराची सवलत वीज ग्राहकांनी घेतली आहे.(Smart Meter)
महावितरण भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता मा. श्री. संजय पाटील यांनी ग्राहकांना स्मार्ट मीटर बाबत पसरलेल्या गैरसमजावर लक्ष न देता स्मार्ट मीटरचे फायदे जाणून घेऊन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले व म्हणाले, “स्मार्ट मीटरच्या मोबाईल ॲपद्वारे ग्राहकांना घरबसल्या दर तासाचा वीज वापर पाहता येते. व्होल्टेज कमी-जास्त झाल्यास किंवा मीटरमध्ये छेडछाड झाल्यास तात्काळ अलर्ट येतो. त्यामुळे उपकरणांचे नुकसान टळते. तसेच, मानवी रीडिंग बंद झाल्यामुळे ‘जास्त रीडिंग’ किंवा ‘अंदाजे बिल’ या तक्रारी खूप प्रमाणाने कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले.(Smart Meter)