सेवा परमो धर्मः

    22-Apr-2026
Total Views |

डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या संग्राह्य पुस्तकाचे लोकार्पण नुकतेच पनवेल येथे संपन्न झाले. यावेळी प्रमुख वक्ते सुहासराव हिरेमठ होते. यानिमित्ताने डॉ. प्रभाकर पटवर्धन यांच्या सेवाकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...

‘सेवा परमो धर्मः‌’ हा वाक्प्रचार आपल्या संपूर्ण जीवनाचा ध्येयमार्ग ठरवून आयुष्य समर्पित करणारे कर्मयोगी व्यक्तिमत्त्व म्हणजे रायगड जिल्ह्यातील नामांकित शल्यविशारद कै. प्रभाकरपंत कृष्णाजी पटवर्धन होय. काही पिढ्यांपूव त्यांचे मूळ पुरुष चिपळूणहून मेढा येथे आले होते. त्यांना औषधी वनस्पतींचा अभ्यास होता. तसेच, त्यांच्याकडे औषधी वनस्पतींचा मोठा संग्रहही होता. त्याचा उपयोग रुग्णांवर करून ते त्यांना दोषमुक्त करीत. पैसे नाहीत, म्हणून त्यांनी उपचार नाकारले, असं कधीच झालं नाही. त्यांचा हाच गुण डॉ. प्रभाकरपंतांमध्ये उतरला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. प्रसंगी स्वतःचं रक्त देऊनही डॉक्टरांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आणि त्यांचे प्राण वाचविले, अशी असंख्य उदाहरणे आहेत.

1951 मध्ये पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून ‌‘एमएमबीएस‌’ आणि ‌‘एमएस‌’ (जनरल सर्जरी) केलं. त्यांना कोणावरही झालेला अन्याय सहन होत नसे. मात्र, यासंदर्भात केवळ बोलणं न करता, ते त्यावर योग्य उपाय शोधून संबंधिताला न्याय मिळवून देत. लहानपणापासून संघाच्या संपर्कात असल्यामुळेच देशभक्तीची उत्कट भावना त्यांच्यात जोपासली गेली होती. पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच, ‌‘गोवामुक्ती आंदोलना‌’ने जोर धरला होता. त्याअंतर्गत दि. 15 ऑगस्ट 1954 रोजी अहिंसक मार्गाने सामूहिक सत्याग्रह करण्यात आला. मात्र, पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी आंदोलकांना मारहाण करून अटक केली. पुढे आंदोलन केलं. त्यावेळी सुरक्षादलांनी लाठीमार व गोळीबार केला. त्यात अनेकजण मृत्युमुखी पडले, तर शेकडो आंदोलक जखमी झाले. या जखमी आंदोलकांची सेवा करण्यासाठी प्रभाकरपंतांनी महाविद्यालयातील 20-25 जणांना सोबत घेऊन गोव्याची सीमा गाठली आणि जखमींवर उपचार केले.

दि. 20 जानेवारी 1962 रोजी त्यांचा विवाह वावोशी येथील विजया टिळक यांसोबत झाला आणि विजयाताई नीला बनून पटवर्धन कुटुंबात सामील झाल्या. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर पैशांच्या मागे न लागता, ग्रामीण भागांत कार्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गावातील पीडितांची, रुग्णांची, आदिवासींची वैद्यकीय सुविधांअभावी होणारी अडचण थांबवावी, या उद्देशाने 1964-65 मध्ये पनवेलमध्ये
स्वतःचं शल्यक्रिया सुविधा उपलब्ध असलेलं रुग्णालय सुरू केलं. आपल्या गावाजवळच राहून, गोरगरिबांची सेवा करून मिळतील तितकेच पैसे कमवायचे, असा त्यांनी निश्चय केला होता. त्यामुळे, व्यवसाय सुरू करताना या क्षेत्रालाच त्यांनी आपली कर्मभूमी मानली. एक डॉक्टर म्हणून अंथरुणाला खिळलेले रुग्ण, अपंग, जनजाती बांधव यांच्यासाठी ते सदैव तत्पर असत. नेहमी उपलब्ध असणारे आणि ‌‘पैशासाठी अडवणूक न करणारे डॉक्टर‌’ म्हणून त्यांची ख्याती होती. पनवेलच्या नगरपालिका रुग्णालयात पैशांची अपेक्षा न ठेवता, त्यांनी अक्षरशः शेकडो शस्त्रक्रिया केल्या आणि ‌‘आजारी गोरगरिबांची शक्य तितकी सेवा कर, तो सेवाभाव मनात ठेव‌’ या कुशाभाऊंच्या संदेशाचं जीवनभर पालन केलं.

पनवेलमध्ये रुग्णालय सुरू केल्यानंतर त्यांनी जनसंघाच्या कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली. तेव्हा जिल्ह्यावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. जनसंघाचा विचार जिल्ह्यात रुजविण्यासाठी त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आली आणि महाड, पेण, कर्जत, रोहा अशा तालुक्यांत त्यांनी प्रवास सुरू केला. ते स्वतः अनेक आंदोलनांत सहभागी झाले होते. रासायनिक शेतीचे प्रश्न, चीनचे आक्रमण, शेजारी राष्ट्रांनी बळकावलेला भूप्रदेश अशा अनेक आंदोलनांत डॉक्टर आघाडीवर असत. कच्छच्या सत्याग्रहात ते सहभागी झाले होते. पनवेलमध्ये व्यवसाय सुरू केल्यानंतर संघ सांगेल ती जबाबदारी त्यांनी पार पाडली. सुरुवातीला जनसंघ, मग भाजप आणि शेवटी संघाची जिल्हा संघचालक ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली. विविध बैठका, संघटनात्मक कार्यक्रम, विविध संस्थांसोबत समन्वय साधून उपक्रम राबविण्यात डॉक्टर कार्यरत राहिले. त्यामुळेच, सर्व संस्था-संघटना त्यांच्याकडे ‌‘जिल्ह्याचे पालक‌’ या नात्यानेच पाहात असत. त्यांना पैशाच्या माध्यमातून येणारा चंगळवाद मान्य नसे. परंतु, स्वयंसेवकांची आर्थिक गरज भागविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पतसंस्था उभारण्याचा त्यांचा आग्रह असे. तशा अनेक पतसंस्था जिल्ह्यात सुरू झाल्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिल्या, त्या डॉक्टरांनी घेतलेल्या पुढाकारमुळेच.

जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी आरोग्य सेवा सुरू करण्याच्या विचारातून देहरंग गावामध्ये दर रविवारी पनवेलमधून डॉक्टरांचे पथक जाऊ लागले. अनेक सामाजिक योजना त्यांनी अमलात आणल्या आणि यशस्वीपणे राबविल्या. 1966 मध्ये ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून सुरू झालेल्या ‌‘युसूफ मेहेरअली सेंटर‌’च्या कामातही डॉक्टर सहभागी होत असत. भविष्यात एखादा भूखंड घेऊन तेथे परिपूर्ण प्रकल्प उभारावा, ज्यामध्ये मुलांसाठी वसतिगृह, फिरतं आरोग्यकेंद्र, शैक्षणिक उपक्रम, तरुणांसाठी रोजगाराची साधने उपलब्ध करण्याचे त्यांच्या मनात होते. मात्र, दि. 24 फेब्रुवारी 1997 रोजी त्यांचं अकस्मात दुःखद निधन झालं. एका कार्यमग्न, समाजसमर्पित आयुष्याची अखेर झाली. डॉक्टरांचं असं अचानक निधन झाल्यावर काय करायचं, अशी समस्या नीलाताईंसमोर होती.

दरम्यान, प. पू. डॉ. हेडगेवार जन्म शताब्दीनिमित्त देशभरात संघाच्या प्रयत्नातून सेवाकार्ये उभी राहावी, असा विचार प. पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी मांडला होता. या पार्श्वभूमीवर, डोंबिवलीतील प्रदीप पराडकर, प्रकाश बापट, उदय साठे, डॉ. नितीन व डॉ. संगीता दांडेकर, शैलेश दिवेकर, गिरीश दीक्षित या कार्यकर्त्यांच्या मनात स्थानिक पातळीवर काही सेवा उपक्रम करावा, असा विचार सुरू होता आणि यासंदर्भात भैयाजी जोशी यांचेसोबत प्राथमिक चर्चाही झाली होती. त्यानंतर काही काळातच डॉ. पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले.

डॉक्टरांची विश्वासार्हता आणि नावलौकिक असल्याने रुग्णालय चालविण्याचे किंवा विकण्याचे मोठमोठ्या रकमांचे अनेक प्रस्ताव नीलाताईंकडे आले. परंतु, आयुष्यभर समाजभान जपलेल्या डॉक्टरांचा वारसा योग्य पद्धतीने पुढे सुरू राहावा, या उद्देशाने त्यांनी संघाचे तत्कालीन प्रांत संघचालक डॉ. अशोक कुकडे यांच्याशी चर्चा केली. डॉ. कुकडे यांनी यानिमित्ताने डोंबिवलीतील कार्यकर्त्यांनी जनकल्याण समितीतर्फे हे रुग्णालय चालविण्यास घ्यावे, अशी सूचना केली. त्यानुसार नीलाताईंनी सर्व चल-अचल संपत्ती रा. स्व. संघ जनकल्याण समितीकडे सुपूर्द केली. सुरुवातीच्या काळात वर उल्लेख केलेले डोंबिवलीतील कार्यकर्ते आणि पनवेलमधील सर्वश्री दादा जोशी, आप्पा मुजुमदार, रमेश एरंडे आणि दिलीप पाटील (तत्कालीन पनवेल तालुका कार्यवाह) यांनी कार्याला सुरुवात केली आणि अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न करून रुग्णालयाच्या मनुष्यबळ, वित्त व लेखा, डॉक्टर्स व ऑपरेशन्सचे नियोजन, नवनवीन सुविधा आणि सर्वसाधारण व्यवस्थापन यांबाबत शिस्त राखून पुढील प्रगतीचा पाया मजबूत केला. त्याकाळी डोंबिवलीचे ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक अनिल जोशी यांचाही सल्ला व सहकार्य मिळत असे. 1965 ते 2025 या 60 वर्षांच्या प्रवासामध्ये हजारो आंतररुग्ण आणि बाह्यरुग्णांनी पटवर्धन रुग्णालयाच्या सुविधांचा लाभ घेतला आहे. अनेक वैद्यकीय सेवा-सुविधा उपक्रम येथे सुरू आहेत. इमारतीचा विस्तार-नूतनीकरण झाले. कर्मचारी-डॉक्टर्स यांच्या संख्येत वाढ झाली. कमीत कमी नफा ठेवून औषधालय सुरू केल्याने रुग्णांची सोय झाली आहे. इन्शुरन्स सुविधा सुरू झाली. शिवाय, शस्त्रक्रियाही मोठ्या प्रमाणात वाढल्या. स्वाभाविकच, आर्थिक उलाढालही लाखांवरून कोटींमध्ये पोहोचली. सेवा-संस्कार-संघटन या माध्यमातून कार्य सुरू आहे. सेवाभाव आणि नैतिकता आहेच; पण व्यवहारीपणा ठेवल्याने आर्थिक शिस्तीत सर्व कारभार सुरू आहे. दरम्यानच्या काळात नीलाताईंचंही दुःखद निधन झालं. कै. डॉ. प्रभाकरपंत आणि कै. नीलाताई त्यांचा सेवाव्रताचा वारसा जनकल्याण समितीच्या माध्यमातून सुरू असल्याचे पाहून समाधानी आणि तृप्त असतील, हे निश्चित. या उभयतांच्या सेवाव्रताची आणि दातृत्वाची ही कहाणी अनेकांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आहे.

- प्रकाश बापट