मुंबईवर कसाबने केलेला हल्ला आणि पहलगाम हत्याकांड या दोन भीषण हल्ल्यांवर भारत सरकारची कशी प्रतिक्रिया उमटली, त्यावरून बदललेल्या भारताचा दरारा दिसून येतो. छोटेखानी युद्ध असलेल्या मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन ‘सेक्युलर’ सरकारने पाकिस्तानला केवळ कागदपत्रे सोपविली; तर पहलगाम हत्याकांडानंतर भारताने पाकिस्तानी हवाई दलाची ताकद नष्ट केली आणि त्याचे अण्वस्त्रांचे ‘ब्लॅकमेलिंग’ही कायमचे बंद केले. आज पहलगामच्या निर्घृण हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असताना, मागील एका वर्षात बदललेल्या या नव्या भारताचा आढावा घेणेही क्रमप्राप्त ठरावे.
काश्मीरमधील पहलगाम या प्रसिद्ध पर्यटनस्थळी निसर्गसौंदर्याचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना काही इस्लामी धर्मांध दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. त्या घटनेची आठवण आली, तरी अंगावर सर्रकन काटा येतो. या हल्ल्याने इस्लामी दहशतवादाचे क्रूर स्वरूप जगजाहीर झाले आणि ‘दहशतवादाला धर्म नसतो’ या बेगडी आणि मतलबी तत्त्वज्ञानाचेही बिंग फोडले. पृथ्वीवरील स्वर्गाचा आनंद घेणाऱ्या निरपराध पर्यटकांपैकी पुरुष पर्यटकांना काही धर्मांध दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या. यावेळी त्यांच्या शेजारी त्यांची पत्नी आणि लहान मुलेही उभी होती. त्यांच्या डोळ्यांदेखत या पुरुषांना अगदी जवळून गोळ्या घातल्या आणि त्यांच्या रक्ताने त्यांच्या पत्नी-मुलांची अंगे माखली. “जा, मोदींना जाऊन सांगा, आम्ही काय केले ते,” असा मग्रूर संदेशही त्या दहशतवाद्यांनी महिलांना सांगितला.
दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर अजमल कसाब व त्याच्या दहा साथीदारांनी केलेला हल्ला आणि गतवर्षी पहलगाममध्ये अशाच धर्मांध इस्लामी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला, या दोन हल्ल्यांवर भारताने कशी प्रतिक्रिया दिली, त्यावरून ‘नवा भारत’ कसा आणि किती बदलला आहे, ते दिसून येते. मुंबईवरील हल्ल्यात सुमारे 185 निरपराध नागरिक मारले गेले होते. त्यात फक्त भारतीय नागरिक नव्हते, तर अन्य देशांचेही काही नागरिक होते. तसेच तो हल्ला मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी करण्यात आला होता. पाकिस्तानने भारताविरोधात पुकारलेले ते मिनी युद्धच होते. तब्बल तीन दिवस भारत या हल्ल्याशी झुंजत होता. इतका भीषण हल्ला होऊनही आणि त्यातील पाकिस्तानच्या संपूर्ण सहभागाचे सज्जड पुरावे मिळूनही भारत सरकारकडून पाकिस्तानच्या विरोधात कसलीही दंडात्मक कारवाई करण्यात आली नव्हती. भारताचे तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम हे पाकिस्तानला पुराव्यांची कागदपत्रे पाठविण्याचे काम करीत होते आणि पाकिस्तान ती कागदपत्रे कचऱ्याच्या टोपलीत टाकीत होता. हा होता एका ‘सेक्युलर’ सरकारचा प्रतिकार!
उलट, गतवर्षी पहलगाममधील हल्ल्याचे स्वरूप कळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला प्रतिशोधासाठी संपूर्ण सूट दिली. पहलगाम हत्याकांडात 25 भारतीय महिलांचे सिंदूर पुसले गेले होते. त्याचा बदला म्हणून भारताच्या प्रतिकाराला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे समर्पक नाव देण्यात आले. आजघडीला ‘ऑपरेशन सिंदूर’ हा जगात परवलीचा शब्द बनला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत या लष्करी महासत्तेचा उदय झालेला जगाने पाहिला. पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर; पण सरहद्दीच्या अनेक किलोमीटर खोलवर स्थित दहशतवादी अड्ड्यांवर जबरदस्त क्षेपणास्त्रे डागली गेली आणि दि. 6 मेच्या उत्तररात्री पाकिस्तानात जणू सूर्य प्रकटला. यापूव, भारताने केलेल्या दोन्ही ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागितले जात होते. पण, गतवष पाकिस्तानी नागरिकच या हल्ल्यांचे व्हिडिओ काढून ते जगापुढे सादर करीत होते. पाकिस्तानची ‘रडार’ यंत्रणाच भारताने नष्ट केल्याने पाकिस्तानी हवाई दल आंधळे झाले.
पाकिस्तान कदाचित प्रतिहल्ला करील, ही शक्यता लक्षात घेऊन त्यावर कोणता प्रतिसाद द्यायचा, त्याचीही आखणी आधीच करून ठेवण्यात आली होती. पाकिस्तानने भारतावर एकाच वेळी शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला चढविला. पण, भारताकडील अचूक आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्रांमुळे एकही ड्रोन किंवा क्षेपणास्त्र भारतीय भूमीवर पडले नाही. त्यावरून भारताची लष्करी ताकद आणि सज्जता किती उच्चकोटीची आहे, त्याचे दर्शन घडले. पाकिस्तानच्या मूर्ख साहसाला दिलेला हा होता एका अस्सल ‘राष्ट्रवादी’ सरकारचा प्रहार!
‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानचा आणखी एक भ्रमाचा भोपळा फोडला. “आपण अण्वस्त्रसज्ज देश असून, भारताविरोधात त्याचा वापर करण्यास मागे-पुढे पाहणार नाही,” अशी दर्पोक्ती दीडदमडीच्या पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनी अनेकदा केली. पण, ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानचे हे आण्विक ‘ब्लॅकमेलिंग’ कायमचे संपुष्टात आणले. पंजाब प्रांतातील सरगोदा हवाई तळाजवळ किराणा हिल्स या टेकड्या आहेत. त्या टेकड्यांमध्ये भुयारे खणून तेथे पाकिस्तानने आपली अण्वस्त्रे दडवून ठेवली आहेत. ही गोष्ट गोपनीय आहे, अशी पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाची समजूत होती. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने या टेकडीवर एका विशिष्ट ठिकाणी डागलेल्या क्षेपणास्त्राने पाकिस्तानची झोप उडविली. याठिकाणी केलेल्या हल्ल्याने भारताने पाकिस्तानला अचूक संदेश दिला. परिणामी, पाकिस्तानने आपले मायबाप असलेल्या अमेरिकेकडे धाव घेत युद्ध थांबविण्यासाठी भारतावर दबाव टाकण्याची याचिका केली. पण, भारताने अन्य कोणत्याही राष्ट्राचा हस्तक्षेप अमान्य केला. तेव्हा पाकिस्तानी लष्कराच्या ‘डीजीएमओ’ यांना भारताच्या लष्करी नेतृत्वाकडे युद्धबंदीची भीक मागावी लागली. आपले लष्करी ईप्सित साध्य झाले असल्याने भारताने ही विनंती मान्य केली.
या हल्ल्यानंतर देशातील विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर या नेत्यांना सामान्य भारतीयांच्या जीवाचे काहीही मोल वाटत नसून, त्यांना आपले संकुचित राजकारण आणि आपल्या विशिष्ट मतपेढीच्या भावनांचे मोल अधिक वाटते, ही लज्जास्पद वस्तुस्थितीही उघड झाली. अशा अनेक नेत्यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केल्याच्या वस्तुस्थितीलाच नाकारले. जिच्या पतीची हत्या झाली आहे, अशी महिला जर सांगत होती की, तिच्या पतीला त्याचा धर्म विचारला आणि त्याने ‘हिंदू’ असे सांगितल्यावर तत्काळ त्याला गोळी घालण्यात आली, तरी हे संकुचित नेते त्यांनाच खोटे पाडत होते. ते पाहून अनेकांना त्यांचा संताप आला, तर अनेकांनी त्यांची कीव केली. आज यांपैकी सगळेच नेते सुरक्षित आहेत आणि ते आपले मतलबी राजकारणही पूर्वीप्रमाणेच खेळत आहेत, ही हिंदूंच्या सहिष्णुतेची परिसीमा आहे! या विरोधी नेत्यांचा सामान्य हिंदू भारतीयांच्या भावनांशी आणि जीवनाशी कसलाही संबंध राहिलेला नाही, हेच यावरून दिसून येते.
भारताने पाकिस्तानला जन्माची अद्दल घडविली असली, तरी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हेही तितकेच सत्य. त्यामुळे भविष्यात पाकिस्तान भारताची कुरापत काढणारच नाही, याची कसलीही हमी देता येत नाही. पण, त्याची पुढली आगळीक त्याच्या अस्तित्वावरच घाला घालू शकते, हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे!