मुंबई : (Motilalnagar Redevelopment) मोतीलाल नगर क्रमांक १, २ आणि ३ च्या पुनर्विकासाबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांनी केलेले सादरीकरण प्रभावी व नागरिकांच्या हिताचे असल्याचे मत स्थानिक रहिवासी संस्थांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून केलेल्या सादरीकरणातून पुनर्विकास प्रक्रियेबाबत सकारात्मकता आणि विश्वास निर्माण झाल्याचे मतही या स्थानिक रहिवासी संघटनांनी व्यक्त केले.
मोतीलाल नगर जनकल्याणकारी समिती, रहिवासी विकास संघ आणि पुनर्विकास समन्वय समिती या तीन संस्थांनी मंगळवार, दि.२१ एप्रिल रोजी संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या संस्था १९९० पासून परिसरातील नागरिकांच्या हितासाठी कार्यरत आहेत. पुनर्विकास प्रक्रियेत प्रशासनासोबत पारदर्शकपणे सहकार्य करत प्रकल्प पुढे नेण्याचा त्यांचा निर्धार असल्याचेही या रहिवासी संघटनांनी स्पष्ट केले.(Motilalnagar Redevelopment)
याबाबत बोलताना संघटनांनी स्प्ष्ट केले की, मोतीलालनगरबाबत गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. ओनरशिपवरील व्याजदर १२ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला. सोसायटी स्थापनेसाठी न्यायालयाची मान्यता मिळाली, अनधिकृत बांधकामांबाबत दिलासा देणारे आदेश मिळाले तसेच पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्यात आली. भाडेवाढीबाबतही सुधारित निर्णय घेतला गेला आहे.(Motilalnagar Redevelopment)
दरम्यान, राज्य सरकार व म्हाडाच्या माध्यमातून रहिवाशांच्या घरांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून १६०० बिल्टअपऐवजी १८०० कार्पेट क्षेत्र देण्याच्या निर्णयचेही मोतिलालनगर मधील सर्वाधिक रहिवासी सभासद असणाऱ्या या संस्थांनी स्वागत केले. मात्र, सादरीकरणादरम्यान काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक गोंधळ घालून चर्चेत अडथळा आणल्याचा आरोपही संस्थांनी केला आहे. असा गोंधळ घालत मागील काही दिवसांपासून मोतिलालनगर पुनर्विकासात अवाजवी मागण्या करत आणि म्हाडा उपाध्यक्ष तथा मुख्य अधिकारी संजीव जैस्वाल यांच्याबाबत करण्यात येणारे वर्तन समाजहिताच्या प्रक्रियेला धक्का देणारे असून जबाबदारीने व शिस्तीत सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पुनर्विकास प्रक्रिया तातडीने आणि गतीने पूर्ण व्हावी यासाठी पुन्हा एकदा लवकरच पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.