मालाड पश्चिमेकडील मालवणी हा परिसर ‘मुस्लीमबहुल वस्ती’ म्हणून ओळखला जातो. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आणि आव्हानात्मक वातावरणातही येथे राहणारा समाज आपले अस्तित्व, संस्कृती आणि परंपरा जपत उभा आहे. अशाच परिस्थितीत ‘मुंबई पब्लिक स्कूल, मालवणी’ येथे ‘क्रांती सेवा’ (संघर्ष ट्रस्ट) यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आंबेडकरी विचारांचे पुनर्जागरण आणि समाजएकतेचा ठोस संदेश समोर आला.
मालवणीतील ‘मुंबई पब्लिक स्कूल’ येथे दि. 19 एप्रिल रोजी सायंकाळी पार पडलेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम केवळ औपचारिक जयंती सोहळा नव्हता; तो समाजाच्या जिवंतपणाचा, जागरूकतेचा आणि एकत्रित उभे राहण्याच्या इच्छाशक्तीचा प्रत्यय देणारा ठरला. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेने झाली. कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या सामाजिक न्याय वरिष्ठ प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्या योगिता साळवी उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या आंबेडकरी विचारांची आजच्या काळातील गरज अधोरेखित केली. ‘जय भीम’ व ‘जय मीम’ या घोषणा स्वार्थापोटी देणाऱ्या समुदायामुळे समाजाचे होणारे नुकसान त्यांनी मांडले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने सर्वसामान्य कुटुंबांतील महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. यावेळी शिल्पा देवरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना योगिता साळवी, ‘क्रांती संघर्ष ट्रस्ट’ आणि ‘सेवा सहयोग संस्थे’च्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे ‘क्रांती सेवा’ (संघर्ष ट्रस्ट)च्या अध्यक्षा शुभांगी जाधव, उपाध्यक्ष अमित अडसूळ आणि रूपाली गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मेहनत स्पष्ट दिसत होती. या कार्यक्रमात स्मिता कवडे यांनी सादर केलेल्या ‘मी रमाई बोलतेय,’ या एकपात्री नाटकाने माता रमाईंच्या संघर्षमय जीवनाचा वेध घेतला.कार्यक्रमाला ‘देव देश प्रतिष्ठान’चे डॉ. वैभव देवगिरीकर यांची उपस्थिती लाभली. याशिवाय ज्योती तुपे, रुपाली गावडे, रजनी दानाने, अनुष्का चव्हाण, विजय चव्हाण, रणजित सुराणी, एकनाथ गावडे, विशाल जाधव, अजय जाधव, भगवान जाधव, भीमराव जाधव यांसह अनेक नागरिकांनी सहभाग घेतला.कार्यक्रमानंतर आयोजित सहभोजनाने समाजाच्या एकत्रीकरणाचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
मालवणीसारख्या संवेदनशील परिसरात अशा प्रकारचा कार्यक्रम होणे, हे केवळ जयंती साजरी करण्यापुरते मर्यादित नाही. तो समाजाच्या जिद्दीचा, जागरूकतेचा आणि आपल्या विचारांवर ठाम राहण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे. . मालवणीतील या कार्यक्रमाने एक गोष्ट अधोरेखित केली, प्रतिकूलतेतही समाज थांबत नाही; तो विचारांच्या बळावर पुढे जात राहतो.
मालवणीसारख्या आव्हानात्मक परिसरातही आपला समाज एकत्र येऊन बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवतो, हे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. हा केवळ उत्सव नव्हता, तर आत्मभान जागवणारा क्षण होता. प्रत्येक घरात शिक्षण, संघटन आणि स्वाभिमान रुजवण्याचा आमचा प्रयत्न पुढेही सुरू राहील.
- शुभांगी जाधव, अध्यक्ष, क्रांती सेवा संघर्ष ट्रस्ट
समाजाने मोठ्या संख्येने दिलेला प्रतिसाद हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. महिलांचा पुढाकार आणि युवकांचा सहभाग पाहून विश्वास वाढतो. आंबेडकरी विचार केवळ घोषणांपुरते न राहता, तो जीवनात उतरावा, यासाठी अशा उपक्रमांद्वारे समाज अधिक एकत्र आणि सक्षम करण्याचा आमचा संकल्प आहे.
- अमित अडसूळ , उपाध्यक्ष, क्रांती सेवा संघर्ष ट्रस्ट
9967020364