‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ आणि आता ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर हिंदूंना त्यांच्या सण-उत्सव-परंपरांवरुन मुद्दाम खिजवण्याचा अलाघ्य प्रकार केरळम्मध्ये नुकताच उघडकीस आला. त्यामुळे हिंदू सण-उत्सवांना अपमानित करणाऱ्या अशा धर्मांधांना चांगलाच धडा शिकवून, जन्माची अद्दल घडवायला हवी.
केरळम्मध्ये गेल्या बुधवारी तेथील हिंदू समाजाने आपले नववर्ष मोठ्या उत्साहाने साजरे केले. केरळम्मधील या नववर्ष दिनास ‘विषू’ या नावाने ओळखले जाते. आपल्याकडील गुढीपाडव्याप्रमाणे केरळम्मध्ये ‘विषू’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने नातेवाईक एकत्र येतात. पूजा केली जाते. विविध प्रकारचे भरपूर पदार्थ केले जातात. ‘सद्या’ नावाने हे पदार्थ ओळखले जातात. जोडीला स्वादिष्ट असे ‘पायसम’ असतेच. पण, हिंदू समाजाच्या या सणाला गालबोट लावण्याचा, या सणाचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न त्या राज्यातील काही मुस्लिमांकडून करण्यात आला.
‘विषू’निमित्त केले जाणारे सर्व पदार्थ शाकाहारी असतात. अगदी मांसाहार करणाऱ्या घरांमध्येही या दिवशी सर्व पदार्थ शाकाहारी असतात. पण, या सणाचे निमित्त साधून काही उपाहारगृहांनी हिंदू समाजाच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न केला. ‘अरेबियन मजलिस’ आणि ‘रायदान रेस्टॉरंट’ अशी त्यांची नावे आहेत. या रेस्टॉरंटनी जी पोस्टर्स प्रसिद्ध केली, त्यामधील एकामध्ये एक नीलवणय हात चिकन बिर्याणी उचलत असल्याचे दाखविले आहे, तर दुसरे पोस्टर केसांमध्ये मोरपीस खोवलेला बाळकृष्ण बिर्याणी पाहून आनंदित झाल्याचे दाखविण्यात आले आहे. केरळम् राज्यात असा संताप आणणारा प्रकार घडला नव्हता. पण, या ‘विषू’च्या वेळी तो घडला. त्याची तीव्र प्रतिक्रिया हिंदू समाजात उमटली. याप्रकरणी मल्लपुरम् जिल्ह्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहितेच्या ‘कलम 192’अंतर्गत हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मल्लपुरम जिल्ह्यात पोलिसांनी हे ताजे गुन्हे दाखल करण्याआधी अलाप्पुझामधील अनेक हॉटेल्समधून हिंदू समाजाच्या भावना दुखविणारी अशी चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. ‘विषू’चे निमित्त साधून मांसाहारी पदार्थ आणि त्यांच्यासमवेत धार्मिक प्रतिमा दाखविण्यात आल्या होत्या. मल्लपुरम जिल्ह्यातील कोट्टाक्कल येथे ‘विषू’च्या शुभेच्छा देणाऱ्या चित्रांमध्ये भगवान कृष्णासमोर ‘चिकन मंती’ठेवण्यात आल्याचे दाखविले होते. समाजमाध्यमांवर हे चित्र व्हायरल झाले होते. ‘अरेबियन मजलिस रेस्टॉरंट’ आणि ‘रायदान रेस्टॉरंट’च्या समाजमाध्यमांवर ही चित्रे प्रकाशित झाली होती. या दोन्ही रेस्टॉरंटच्या केरळम् राज्यात आणि आखाती देशांमध्ये शाखा आहेत. ‘विषू’ सणास सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. असे असताना अशी चित्रे प्रसिद्ध करून हिंदू समाजाच्या भावना दुखविण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. समाजमाध्यमांवरून ही चित्रे नंतर हटविण्यात आली. चेरथला येथील ‘मेहर मंडी ॲण्ड ग्रील्स’ या रेस्टॉरंटने गोपालकृष्ण मांसाहारी बिर्याणीच्या डिश शेजारी दाखविण्यात आला होता. ‘मोहम्मद शमीर ॲण्ड असोसिएट’कडे या रेस्टॉरंटची मालकी आहे. याप्रकरणी अर्शद नावाच्या भागीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध हिंदू संघटनांनी अशा सर्व जाहिरातींचा निषेध केला आहे. ‘यामामा शावाय हॉटेल’नेही अशीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातींच्या संदर्भात विविध ठिकाणी ज्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, ते सर्व मुस्लीम आहेत हे सांगायला नको! तर, एर्नाकुलम जिल्ह्यात एका पोस्टरमध्ये ‘विषू’चे जे धातूचे पात्र असते, त्यामध्ये चपला ठेवल्याचे दाखविण्यात आले! अशा जाहिरातींमध्ये ठळकपणे ‘हॅपी विषू’ असे छापण्यात आले होते. याचा अर्थ उघड आहे, हिंदू समाजाची बदनामी करणे हाच एकमात्र हेतू त्यामागे आहे; अन्य कोणताही नाही.
हिंदू समाजास भडकविण्याचे धंदे करणाऱ्या अशा लोकांविरुद्ध खरे म्हणजे सर्व हिंदू समाज खवळून उठायला हवा. काही प्रतिक्रिया उमटल्या. पण, हिंदूंच्या सणांचा, देव-देवतांचा अवमान करणाऱ्या नतद्रष्ट लोकांना अद्दल घडविण्यासाठी अजूनही सुस्त असलेला हिंदू समाज कधी जागा होणार, हाच खरा प्रश्न!
तृणमूलच्या गुंडांच्या मतदारांना धमक्या!
प. बंगालमध्ये सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. त्या राज्यात सत्तेवर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून मतदारांना धमकविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. बंगालमध्ये ममतादीदींच्या पक्षास भाजपने जबरदस्त आव्हान उभे केले आहे. तृणमूल काँग्रेसकडून सत्ता ताब्यात घ्यायचीच, या निर्धाराने तेथील भाजप कार्यकर्ते काम करीत आहेत. या सर्वांमुळे तृणमूल काँग्रेसने गुंडगिरी सुरू केलेली दिसते. ‘आमच्याच पक्षाला मत द्या, नाहीतर याद राखा,’ अशी दादागिरीची भाषा ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे गुंड करू लागल्याच्या बातम्या आहेत. ‘तुम्ही कोणाला मत देत आहात, त्यावर आमचे लक्ष असेल,’ अशी भाषा हे गुंड वापरू लागले आहेत. तशा आशयाची एक ध्वनिचित्रफीत व्हायरल झाली आहे. “मतदानाला सकाळी लवकर बाहेर पडा, कोणाला मत द्यायचे ते तुम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणाला मत देत आहात, ते आम्ही पाहणार आहोत. तुम्ही कोणते बटन दाबता याकडे आमचे लक्ष असेल,” असे या गुंडांकडून सांगितले जात आहे. ‘निकालानंतर आम्ही पाहून घेऊ,’ अशा धमक्या हे गुंड देत आहेत. असाच प्रकार मुर्शिदाबाद जिल्ह्यात अलीकडे घडला. त्या जिल्ह्यातील बहरामपूर विधानसभा क्षेत्रात तृणमूलचे कथित गुंड मतदारांना भारतीय जनता पक्षास मते देऊ नका, असे धमकावत होते. त्याची चित्रफीतही व्हायरल झाली होती. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारच्या प्रशासनाखाली त्या राज्यात निवडणुका होत आहेत. निवडणुका मुक्त आणि कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ न देता पार पडण्याचे मोठे आव्हान निवडणूक आयोगापुढे आहे. ममता बॅनर्जी यांच्या गुंडांचा बंदोबस्त करण्यामध्ये निवडणूक आयोग किती यशस्वी होतो, ते पुढील महिन्यातच दिसून येणार आहे!
आता बिंदी, सिंदूर, तिलक हे लक्ष्य!
नाशिकमधील ‘टीसीएस’ या प्रसिद्ध उद्योगसमूहातील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच, अन्य काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असेच उद्योग सुरू असल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे. ‘लेन्सकार्ट’ या कंपनीने आपल्या कर्मचारीवर्गासाठी ‘ड्रेस कोड’ जारी केला. पण, तो जारी करताना धार्मिक भेदभाव केला. आता पूव भारत सरकारची आणि आता टाटा समूहाची मालकी असलेल्या ‘एअर इंडिया’ या कंपनीतही विमानातील कर्मचारीवर्गावर बिंदी, सिंदूर किंवा तिलक लावण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. या कंपनीच्या वेशभूषा धोरणाची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर सुरू आहे. या गोष्टीची चर्चा सुरू होताच, अनेकांनी अशा धोरणांमुळे हिंदू समाजावर अन्याय होत असल्याकडे लक्ष वेधण्यास प्रारंभ केला. समाजमाध्यमांवर याची चर्चा सुरू झाली. एक भारतीय कंपनी आपल्याच कर्मचाऱ्यांवर धार्मिक ओळख दर्शवू नका, अशा अटी कशा काय लादू शकते, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. पण, ‘एअर इंडिया’ने मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. “आमच्या हवाई महिला कर्मचाऱ्यांना बिंदी लावण्याची अनुमती आहे,” असा खुलासा कंपनीने केला आहे. “जी माहिती सध्या समाजमाध्यमांवर प्रदर्शित केली जात आहे, ती कालबाह्य असून ती सध्या अस्तित्वात नाही,” असे ‘एअर इंडिया’ने म्हटले आहे.
‘लेन्सकार्ट’ या कंपनीतील असेच प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका शेफाली वैद्य यांनी उजेडात आणले. तसेच हिंदूंच्या सणादरम्यान दागिने, साड्या यांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. पण, त्यामध्ये महिलांच्या कपाळावर कुंकू दाखविले जात नव्हते. त्याविरुद्ध शेफाली वैद्य यांनी आवाज उठविला होता. त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम अशा जाहिरातींवर झाला. ‘लेन्सकार्ट’ कंपनीत महिला कर्मचारीवर्गास ‘हिजाब’ला परवानगी देण्यात आली. मात्र, हिंदू कर्मचारीवर्गास बिंदी, तिलक लावण्यास प्रतिबंध करण्यात आल्याकडे शेफाली वैद्य यांनी लक्ष वेधले. सदर कंपनीचे धोरण हे पूर्णपणे हिंदूविरोधी असून, या कंपनीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. हा सर्व वाद उफाळून आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष बन्सल यांनी आता जे व्हायरल होत आहे, ते सर्व कालबाह्य असल्याचे किंवा त्यातून चुकीचे अर्थ काढले गेल्याचे म्हटले आहे. आमची कंपनी कसलाही धार्मिक भेदभाव करीत नसल्याचे बन्सल यांनी स्पष्ट केले आहे. पण, शेफाली वैद्य यांनी बन्सल यांचा दावा पूर्णपणे खोडून काढला असून, तुम्ही खोटे बोलत आहात, असा आरोप त्यांच्यावर केला आहे. बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाच्या भावनांची कदर न करता, अशा कंपन्या प्रचंड नफा कमवीत आहेत. पण, हिंदू समाज जागृत झाला; तर अशा घटनांना नक्कीच पायबंद बसू शकतो, हे याआधी दिसून आले आहे आणि यापुढेही दिसून येईल.
9869020732