‘भारतीय आयकर कायदा २०२५’ आणि सामाजिक संस्था

    22-Apr-2026
Total Views |

‘भारतीय आयकर कायदा, 1961‌’ हा महत्त्वाचा कायदा 1961 साली अस्तित्वात आला. सध्याच्या केंद्र शासनाकडून वेळोवेळी समित्या/उपसमित्या स्थापन करून, लोकांच्या सूचना मागवून, विद्यमान आयकर कायद्यामध्ये बदल केले गेले आणि असे सर्व बदल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमताने संमत होऊन, नवीन ‌‘भारतीय आयकर कायदा, 2025‌’ हा बुधवार, दि. 1 एप्रिल रोजीपासून अस्तित्वात आला आहे. त्यानिमित्ताने या नवीन आयकर कायद्यातील सार्वजनिक क्षेत्रामधील काम करणाऱ्या संस्थांसाठी काय बदल झाले आहेत, यासंबंधीचा आढावा घेणारा हा लेख...

सामाजिक संस्थांना देण्यात आलेले सामायिक नाव :

आजवर अस्तित्वात असलेल्या आयकर कायद्यामध्ये नोंदणीकृत असलेल्या सामाजिक संस्थांना, ज्यामध्ये विश्वस्त संस्था असतील, कंपनी कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या कंपन्या (संस्था) असतील, या सर्वांना ‌‘Charitable Trusts and Institutions‌’ अशा सामुदायिक नावाने संबोधले जात होते. परंतु, नवीन आयकर कायद्यामध्ये अशा सर्व संस्थाना ‌’Registered Non Profit Organizations (RNPO)‌’असे संबोधण्यात आले आहे, जेणेकरून कायद्यातील तरतुदींचे वाचन करणे, समजून घेणे, सोपे झाले आहे.

स्वतंत्र कलमांचा-उपकलमांचा अंतर्भाव :

आजवर जो ‌‘आयकर कायदा, 1961‌’ अस्तित्वात होता, त्यामध्ये सर्व तरतुदी या विविध कलमांमध्ये विखुरलेल्या होत्या, जसे ‌‘कलम 11, 12,13, कलम 10(23)‌’ व त्यातील अन्य उपतरतुदी, ‌‘115BB', ‌‘115BBC' इत्यादी. ज्यामुळे आयकर ऑडिट, आयकर परतावा, Violations, Exit Tax अशा विविध तरतुदी समजून घेताना, त्यावर निर्णय घेताना वरील कलमांचा आधार घ्यावा लागत होता, त्यामुळे ही प्रक्रिया खूपच क्लिष्ट आणि समजायला कठीण बनून गेली होती.

ही प्रक्रिया सोपी करताना नवीन आयकर कायद्यामध्ये जुन्या आयकर कायद्यामध्ये असलेल्या, सुमारे 1 हजार, 200 पेक्षा जास्त तरतुदी (Provisos) आणि 900 पेक्षा अधिक स्पष्टीकरणे (Explanationns) ही कमी करून, विविध कलमे (Sections)-उपकलमे (Subsections) यामध्ये सोप्या शब्दांत मांडली गेली आहेत.

सामाजिक संस्थांसाठी Registered Non Profit Organizations (RNPO) स्वतंत्र कलमांचा अंतर्भाव :

‌‘भारतीय आयकर कायदा 2025‌’मध्ये जुन्या कायद्यातील वरील सर्व अडचणी समजून घेऊन, RNPO साठी ‌‘कलम क्रमांक 332‌’पासून ‌‘355‌’पर्यंत स्वतंत्र कलमांचा समावेश करण्यात आला आहे.जेणेकरून RNPO साठीच्या तरतुदी समजून घेणे अधिकच सोपे झाले आहे.

‌‘80 (जी) (5)‌’ नोंदणी आणि त्यावरील सवलत याबाबत नवीन क्रमांकाच्या कलमाचा समावेश :

‌‘भारतीय आयकर कायदा 2025‌’मध्ये प्रचलित ‌‘80 (जी) (5)‌’अंतर्गत नोंदणी असलेल्या संस्थांची नोंदणी आता नवीन कायद्यानुसार ‌‘कलम 354‌’अंतर्गतची नोंदणी म्हणून समजली जाईल, तर आयकर परतावा भरताना ‌‘80 (जी)‌’अंतर्गत मिळणारी वजावट (Deduction) हे ‌‘कलम 133‌’अंतर्गतची वजावट म्हणून ओळखली जाईल. त्यामुळे आपल्याला आपल्या जुन्या सवयीदेखील आता बदलाव्या लागतील.

‌‘चॅरिटेबल पर्पज‌’च्या व्याख्येबाबत नवीन क्रमांकाच्या कलमाचा समावेश :

‌‘चॅरिटेबल पर्पज‌’ची व्याख्या जुन्या कायद्यामध्ये ‌‘कलम 2(15)‌’अंतर्गत नमूद करण्यात आली होती, जी नवीन आयकर कायद्यामध्ये नवीन ‌‘कलम क्रमांक 2(23)‌’मध्ये समावेश करण्यात आली आहे, पण त्यातील अन्य तरतुदींमध्ये बदल नाही.

तर एखादी RNPO, जी आयकर कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असेल आणि अन्य लोकहिताचे व्यावसायिक उपक्रम राबवत असेल आणि त्यातून मिळणारे उत्पन्न हे त्या RNPOला येणाऱ्या वार्षिक उत्पन्नापेक्षा 20 टक्के अधिक नसणे आवश्यक आहे. तसेच अशा प्रत्येक उपक्रमासाठी RNPOने स्वतंत्र हिशोब पुस्तके(Book of Accounts) ठेवणे आवश्यक राहील, अशा RNPO साठी नवीन ‌‘कलम 346‌’अनुसार करदायित्व (Taxability) असेल. लेखाची शब्दमर्यादा लक्षात घेऊन ‘भारतीय आयकर कायदा 2025‌’मध्ये सामाजिक संस्थांसाठी समावेश करण्यात काही महत्त्वाच्या तरतुदी थोडक्यात मांडल्या आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित संस्थांनी नवीन आयकर कायद्यामधील तरतुदी आपल्या सीएकडून समजावून घेणे आवश्यक राहील.

नवीन आयकर कायद्यामुळे सामाजिक क्षेत्रांत काम करीत असणाऱ्या संस्थांना कायदा सोपा होऊन, समजणे अधिक सोपे होणार आहे आणि कायदा सर्वसामान्य व्यक्तीलापण समजावा, तो अमलात आणण्यासपण सोपा असावा, हाच या नवीन आयकर कायद्याचा मुख्य हेतू आहे.

‘12एए/10(23)‌’ आयकर नोंदणीबाबत नवीन क्रमांकाच्या कलमाचा समावेश :

‘भारतीय आयकर कायदा 2025‌’मध्ये प्रचलित ‌‘12एए/10(23) (उ)‌’अंतर्गत नोंदणी असलेल्या संस्थाची नोंदणी आता नवीन नावाने ओळखली जाईल. त्यामुळे नवीन कायद्यानुसार ‌‘12एए/10(23)‌’अंतर्गत असलेली नोंदणी आता ‌‘कलम 332‌’अंतर्गतची नोंदणी म्हणून समजली जाईल.

गुंतवणुकीबाबत नवीन क्रमांकाच्या कलमाचा समावेश :

गुंतवणुकीबाबत पूवच्या कायद्यामध्ये ‌‘कलम क्र. 11(5)‌’ होते, तर नवीन कायद्यानुसार, नवीन ‌‘कलम क्रमांक 350‌’ आहे. RNPO करपात्रता (Taxability) : वर उल्लेख करण्यात आलेल्या ‌‘चॅरिटेबल पर्पज‌’च्या व्याख्येमध्ये जे धर्मादाय (चॅरिटेबल) उद्देशांच्या उपक्रमांबरोबरच अशा संस्था व्यावसायिक स्वरूपाचे उपक्रम करीत असतील, तर अशा संस्थांसाठी करदायित्व (Taxability)साठी नवीन ‌‘कलमे 345‌’ आणि ‌‘346‌’अंतर्भूत करण्यात आली आहेत, ज्यामध्ये समजा एखादी RNPO, जी आयकर कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असेल आणि त्यांच्या घटनेमध्ये उल्लेख असलेल्या मूळ उद्देशांना धरून असलेली एखादा व्यावसायिक स्वरूपाचा उपक्रम-प्रकल्प राबवत असेल, तर अशा संस्थांचे करदायित्व (Taxability)साठी स्वतंत्र हिशोब पुस्तके (Book of Accounts) ठेवणे आवश्यक राहील, अशा RNPOसाठी नवीन ‌‘कलम 345‌’अनुसार करदायित्व (Taxability) असेल.

कॉर्पस देणगीबाबत नवीन क्रमांकाच्या कलमाचा समावेश :

कॉर्पस देणगीसंबंधी जुन्या कायद्यामध्ये ‌‘कलम 11(1)(डी)‌’ अस्तित्वात होते, तर आता नवीन आयकर कायद्यामध्ये याच कॉर्पस देणगीबाबत नवीन ‌‘कलम क्रमांक 339‌’ असा असेल, पण त्याबाबत अन्य तरतुदी कायम आहेत.

- शैलेश निपुणगे
9930011273