सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला काळा बिबट्या
22-Apr-2026
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधून प्रथमच काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे (melanistic leopard). चांदोली राष्ट्रीय उद्यानामधून ही नोंद करण्यात आली असून २० एप्रिल रोजी त्याचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपले गेले (melanistic leopard). काळ्या बिबट्याला म्हणजेच मेलेनिस्टिक बिबट्याला रुढ अर्थाने ब्लॅक पॅंथर, असे म्हटले जाते. (melanistic leopard)
५ जानेवारी २०१० मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याला मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे १,१६५.५७ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेले आहे. याठिकाणी दुर्मिळ आणि संकटग्रस्त सस्तन प्राण्यांचा आढळ आहे. परंतु, प्रकल्पामधून यापूर्वी काळ्या रंगाच्या बिबट्याची म्हणजेच मेलेनिस्टिक बिबट्याची नोंद झाली नव्हती. मात्र, बुधवार दि. २२ एप्रिल रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानात कॅमेरा ट्रॅप तपाासण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांना काळ्या बिबट्याचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेले मिळाले. २० आणि २१ एप्रिल रोजी तीन वेगवेगळी छायाचित्र ही वेगवेगळ्या बीटमध्ये टिपली गेली. त्यामुळे काळ्या बिबट्याची व्याघ्र प्रकल्पामधून पहिल्यांदाच नोंद झाली.
ब्लॅकपॅंथर हा बिबट्या असून शरीराचे रंग ठरवणारे 'मेलानीन' रंगद्रव्य वाढल्यामुळे बिबट्याच्या शरीरावरील काळेठिपके (राॅझेट पॅटर्न) पूर्णतः शरीरभर काळे किंवा अधिक काळे होतात. उलटपक्षी'मेलानीन' कमी झाल्यामुळे 'ल्युकिझम' (Leucism) म्हणजेच पांढरा बिबट्या ही दिसू शकतो. जरी काळा रंग जास्त प्रमाणात असला तरी ठिपके बऱ्याच वेळेला दिसतात. ही एक अनुवांशिक अवस्था आहे. हा कोणत्याही प्रकारचा रोग नाही. 'ब्लॅक पँथर' या नावाचा विचार केला तर ती एक संयुक्तिक संकल्पना म्हणता येईल. यात भारत आणि आफ्रिकेत मिळणारा काळा बिबट्या, साऊथ अमेरिकेतले काळे जग्वार यांचा समावेश होतो. याचे लॅटिन भाषेतील कुळ 'पॅंथेरा' असल्यामुळे ही व्याख्या रूढ झाली असावी. मात्र, प्रत्यक्षात ही वेगळी प्रजाती नसून काळया रंगाचे प्रमाण जास्त असणारा बिबट्या किंवा जग्वार हाच 'ब्लॅक पँथर' नावाने ओळखला जातो. भारतात फक्त बिबट्याच आढळत असल्याने आपल्याकडचा काळया रंगाचा बिबट्या म्हणजेच 'ब्लॅक पँथर' होय.