Digital System : बेस्ट तिकिटासाठी आणखी एक डिजिटल प्रणाली!
मोबाईल क्यूआरद्वारे मिळणार तिकीट
22-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Digital System) प्रवाशांना अधिक सुलभ, जलद आणि कॅशलेस सुविधा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीटिंगमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ या प्लॅटफॉर्मवरील विविध अॅप्समधून मोबाईल क्यूआर कोडद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या प्रणालीमुळे प्रवासी आणि वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद कमी होणार असून, संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल.
गेल्या काही वर्षांत बेस्टने स्मार्टकार्ड, मोबाईल अॅप्स आणि डिजिटल पेमेंट्सचा वापर वाढवत तिकीट प्रणालीचे आधुनिकीकरण केले आहे. त्याचा परिणाम म्हणून महसूल संकलनातही डिजिटल माध्यमांचा मोठा वाटा वाढला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो, बेस्ट आणि रेल्वे यांसारख्या सार्वजनिक वाहतूक प्रणालींना एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा दिलेला भर लक्षात घेता, हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.(Digital System)
‘ओएनडीसी’ हा केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयांतर्गत ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड’चा उपक्रम असून, ‘डिजिटल इंडिया’ अभियानाचा एक भाग आहे. सध्या देशातील २६ शहरांमध्ये ही प्रणाली कार्यरत असून ८ मेट्रो सेवा आणि अनेक वाहतूक संस्था या नेटवर्कशी जोडल्या गेल्या आहेत.
गुगल पे, फोन पे, पेटीएम, उबेर, रॅपिडो आणि व्हाट्सअप यांसह सुमारे २८ ग्राहक अॅप्स ओएनडीसी प्लॅटफॉर्मवर तिकीटिंगसाठी उपलब्ध आहेत.(Digital System)
बेस्ट उपक्रम पूर्णपणे ओएनडीसी नेटवर्कशी जोडला गेल्यानंतर सध्या १५-१६ टक्क्यांवर असलेला डिजिटल तिकीट वापर २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तिकीट खरेदी प्रक्रिया अधिक सोपी
व्हॉट्सअॅप, रेडबससारख्या अॅप्सवरून थेट तिकीट खरेदी करता येणार असल्याने प्रवाशांना स्वतंत्र अॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. यामुळे तिकीट खरेदी अधिक सोपी, एकसंध आणि अडथळारहित होईल.
एकाच व्यवहारातून संपूर्ण प्रवास
ओएनडीसी नेटवर्कमुळे बेस्ट, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. त्यामुळे ‘फर्स्ट माईल’ ते ‘लास्ट माईल’ प्रवास एकाच व्यवहारातून पूर्ण करणे शक्य होणार आहे.(Digital System)