झेप सुवर्णकन्येची...

    22-Apr-2026
Total Views |

‘रोप मल्लखांब‌’ या क्रीडाप्रकारात क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीचा श्रीगणेशा करून, ‌‘ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक‌’ क्रीडाप्रकारात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या ऋतुजा दत्तात्रय जगदाळे यांच्याविषयी...

मानवी आयुष्यात खेळाचे स्थान अत्यंत बहुआयामी. खेळ केवळ विरंगुळ्याचे साधन नसून, ते व्यक्तिमत्त्व विकासाचेही प्रभावी माध्यम ठरते. नियमित खेळामुळे शरीर सुदृढ राहतेच. शिवाय, कार्यक्षमता वाढते आणि आजारांपासून संरक्षणही मिळते. त्याचबरोबर खेळ मानसिक आरोग्यही सुधारतात; ताणतणाव कमी करतात, एकाग्रता वाढवतात आणि आत्मविश्वास दृढ करतात. संघभावना, शिस्त, संयम आणि नेतृत्वगुण यांचा विकासही खेळांतूनच घडतो. आधुनिक युगातील ताणतणावपूर्ण जीवनशैलीत खेळ मनाला आनंद, उत्साह आणि नवचैतन्य देतात. त्यामुळे आजकाल अनेक नवतरुण खेळाकडे करिअरची संधी म्हणून पाहू लागले असून, क्रीडा क्षेत्रातून अनेक खेळाडूंचे आयुष्य घडतानाही दिसत आहे. अशीच एक खेळाडू म्हणजे ऋतुजा दत्तात्रय जगदाळे!

ऋतुजा यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाठार या गावी त्यांच्या आजोळी झाला. त्यावेळी ऋतुजा यांचे कुटुंब त्यांच्या कराडजवळच्या राजाचे कुर्ले या गावी असल्याने, तिसरीपर्यंतचे ऋतुजा यांचे शिक्षणही त्या गावातच झाले. मात्र, नंतर ऋतुजा यांच्या वडिलांना ‌‘बेस्ट‌’मध्ये चालकपदावर रुजू होण्याची संधी चालून आल्याने, त्यांनी मुंबईमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

वडिलांचा हाच निर्णय ऋतुजा यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारा ठरला. मुंबईला आल्यावर ऋतुजा यांचे कुटुंब आरसीएफ कॉलनी, चेंबूर येथे स्थायिक झाले. आई, वडील आणि एक भाऊ असे ऋतुजा यांचे चौकोनी कुटुंब. चेंबूर येथे आल्यानंतर ऋतुजा यांनी लोकमान्य शिक्षण संस्थेच्या जवाहर विद्याभवन शाळेमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर चौथीपासूनच्या शिक्षणाचा त्यांचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास नुसता शिक्षणाचाच नव्हता, तर खेळाच्या क्षेत्रात पडलेले हे ऋतुजा यांचे पहिले पाऊल ठरले.

ऋतुजा यांच्या शाळेमध्ये उन्हाळी आणि हिवाळी खेळाची शिबिरे नित्यनेमाने होत होती. साहजिकच, ऋतुजा यांना या शिबिरांमध्ये प्रवेश घेण्याची ओढ लागली. घरच्यांनीही ऋतुजा यांची ओढ पाहून, एका वषच्या हिवाळी शिबिरांमध्ये त्यांना पाठवले. या शिबिरांमध्ये शेवटच्या दिवशी त्यांना प्रात्यक्षिके सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर प्रत्येकास काही बक्षिसेही देण्यात आली. यात ऋतुजा यांना रोप मल्लखांब प्रकारामध्ये बक्षीस मिळाले. त्यानंतर ऋतुजा यांना अधिकच प्रेरणा मिळाली. त्यानंतर ऋतुजा यांनी रोप मल्लखांबचे काहीकाळ प्रशिक्षण घेतले. मात्र, त्यानंतर एका संधीने त्यांच्यासाठी ‌‘ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक‌’चे दरवाजे उघडले.

ऋतुजा ज्या संस्थेत शिकत होत्या, त्या संस्थेच्या तीन शाळा असून, त्यापैकी नाराणयराव आचार्य विद्यानिकेतनमध्ये ‌‘ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक‌’चे धडे गिरवले जात असत. एकदा याच खेळाची स्पर्धा भरली असताना काही नवीन तरुण खेळाडूंचा शोध घेण्यात आला. त्यावेळी ‌‘रोप मल्लखांब‌’ खेळाच्या नियमित सरावामुळे आवश्यक ती सर्वप्रकारची शारीरिक क्षमता अंगी असल्याने राहुल ससाणे सरांनी ऋतुजा यांची निवड या स्पर्धांसाठी केली. त्यानंतर ऋतुजा यांचा सराव नियमित रीतीने सुरू केला. सरावामध्ये मिळणारा आनंद लक्षात घेता, ऋतुजा यांचे मनही या नव्या प्रकारच्या खेळामध्ये रमू लागले. या खेळाडूंना सरावासाठी उत्तम प्रकारचे वातावरण आणि साहित्य नारायणराव आचार्य विद्यालयानेदेखील दिले. दोन-अडीच वर्षे या खेळाचा नियमित सराव केल्यानंतर सातवीत असतानाच, ऋतुजा यांनी पहिल्यांदाच शालेय स्पर्धांमध्ये भाग घेतला. याच स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे ऋतुजा यांची कोलकाता येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली. या राष्ट्रीय स्पर्धेमध्येच ऋतुजा यांनी चमकदार कामगिरी करत ‌‘रौप्यपदका‌’ला गवसणी घातली.

यानंतर ऋतुजा यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. फेडरेशन, तसेच शालेय पातळीवरील जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कायमच चमकदार कामगिरी केली. ऋतुजा आतापर्यंत सहा शालेय पातळीवरील राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. यातील तीन स्पर्धांमध्ये त्यांनी ‌‘सुवर्णपदक‌’ मिळवले असून, तीन स्पर्धांमध्ये त्यांनी ‌‘रौप्यपदक‌’ कमावले आहे. अशीच भरीव कामगिरी त्यांनी फेडरेशनच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही केली आहे. 2018 नंतर ऋतुजा यांची निवड वरिष्ठ गटातील स्पर्धांमध्ये झाली. मात्र, त्यानंतरही सुवर्णकामगिरी ऋतुजा यांनी सोडली नाही. 2019 मध्ये ऋतुजा यांनी उझबेकिस्तान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्येदेखील भारताचे प्रतिनिधित्व केले असून, त्यावेळी भारतीय संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी ऋतुजा यांची निवड झाली होती. मात्र, ‌‘कोविड‌’ महामारीमुळे या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. ऋतुजा यांनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले असून, त्यामध्येही त्यांना ‌‘सुवर्णपदक‌’ मिळाले आहे. सर्व स्तरावरील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा मिळून आज ऋतुजा यांनी जवळपास 27 ते 30 ‌‘सुवर्ण‌’ आणि ‌‘रौप्य‌’ पदकांची कमाई केली आहे. यात ‌‘सुवर्णपदकां‌’चा वाटा मोठा आहे. खेळात मिळावलेल्या या यशामुळे आयकर विभागात त्यांना नोकरीची संधीदेखील मिळाली. ऋतुजा त्यांच्या या यशाचे श्रेय राहुल ससाणे सर, सुनील रणपिसे सर आणि योगेश पवार सर यांना देतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ही उत्तुंग झेप घेता आल्याचे त्या नमूद करतात. आपल्या देशात आज अनेक खेळ असे आहेत, ज्यांना अपेक्षित प्रसिद्धी मिळत नाही. ती मिळाल्यास देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास अशक्य नसल्याचे मतही ऋतुजा मांडतात. सध्या ऋतुजा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि त्यानंतरच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ‌‘सुवर्ण‌’ कामगिरी करण्याचे लक्ष्य बाळगून आहेत. भविष्यातील सुवर्णझेप घेण्यासाठी ऋतुजा जगदाळे यांना दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून हार्दिक शुभेच्छा!

- कौस्तुभ वीरकर