झुबिक्विटी : प्राणी आणि मानवी आरोग्याचा संगम

Total Views |


जसजशी मानवी प्रगतीची क्षितिजे वेगाने विस्तारत गेली, तसतसा माणूस निसर्गापासूनही दुरावला. मात्र, जागतिक तापमान वाढ, हवामान बदलांच्या चटक्यांनंतर आता मानवालाही निसर्गाचे महत्त्व पुन्हा पटू लागले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात माणसाला अभूतपूर्व शांतता लाभतेच. पण, त्याशिवाय हा निसर्ग, या निसर्गातील प्राणीजीवनही कळत-नकळत आरोग्याचे धडे देत असते. असेच एक प्राणी व मानवी आरोग्याचा एकत्रित अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ‌‘झुबिक्विटी.‌’ त्याविषयी...

"आपण प्राण्यांना स्वतःच्या बरोबरीचे मानायला तयार नसलो, तरी आपणही एक प्राणीच आहोत," डार्विनचे हे विधान आजच्या काळात अधिक महत्त्वाचे ठरते. मानवी आजारांच्या संशोधनासाठी आपण उंदरांचा वापर करतो, पण ‌‘झुबिक्विटी‌’ ही संकल्पना प्राणी चाचणीच्या पलीकडे जाणारी आहे. जंगलात, महासागरात किंवा आपल्या घरात राहणारे प्राणीही आपल्यासारखेच आजारी पडतात. निसर्गातील ही ‌‘स्वच्छता मोहीम‌’ आपल्याला शिकवते की, समाजातील संसर्ग रोखण्यासाठी ‌‘देखरेख‌’ आणि ‌‘प्रतिबंध‌’ किती आवश्यक आहेत.

आजच्या धकाधकीच्या युगात आपण आरोग्यासाठी महागड्या जिम, डाएट प्लॅन्स आणि आधुनिक औषधांवर अवलंबून आहोत. पण, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या आरोग्याची सर्वांत मोठी गुरुकिल्ली जंगलात, आकाशात आणि अगदी आपल्या घरातील पाळीव प्राण्यांमध्ये दडलेली आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र आता एका नवीन वळणावर आले आहे, ज्याला ‌‘झुबिक्विटी‌’ (Zoobiquity) म्हटले जाते; म्हणजेच प्राणी आणि मानवी आरोग्याचा एकत्रित अभ्यास.

‌‘निसर्गाचे छुपे डॉक्टर‌’ प्राण्यांचे स्व-उपचार

प्राणी केवळ अन्नासाठीच नव्हे, तर गरजेनुसार सभोवतालच्या वनस्पतींचा वापर औषध म्हणूनही करतात. संशोधनातून समोर आलेली ही काही विस्मयकारक उदाहरणे :

1. सापाने चावा घेतल्यास काही सरडे विशिष्ट मुळांचे सेवन करून विषाचा प्रभाव निष्प्रभ करतात.

2. इथिओपियातील ‌‘बेबून‌’ या घातक जंतांशी लढण्यासाठी ठरावीक पाने नैसर्गिक जंतूनाशक म्हणून खातात, तर मादागास्करमधील लेमूर आणि चिम्पांझी झाडांच्या सालींचा आधार घेतात.

3. केनियातील गर्भवती हत्तिणी बाळंतपणाच्या कळा सुलभ होण्यासाठी विशिष्ट पाने खातात, तर ब्राझीलमधील ‌‘वूली स्पायडर मंकी‌’ आपल्या प्रजननाची क्षमता नियंत्रित करण्यासाठी विशिष्ट वनस्पतींचा आहारात समावेश करतात.

4. मकाऊ पोपट पचनासाठी माती (Clay) खातात, तर फळमाश्या आपल्या अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी ती नैसर्गिक ‌‘इथेनॉल‌’ असलेल्या जागी घालतात.

निसर्गातील या घडामोडी आपल्याला शिकवतात की, आरोग्य ही केवळ हॉस्पिटलमध्ये मिळणारी गोष्ट नाही, तर ती आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाशी देखील नैसर्गिकरित्या जोडलेली आहे. प्राण्यांकडे कोणतीही पदवी नसतानाही त्यांना आपल्या शरीराची गरज ओळखता येते. आपण मानवांनीदेखील आपल्या शरीराच्या नैसर्गिक संकेतांकडे (Natural Signals) लक्ष द्यायला हवे.

सामूहिक आरोग्य ः ‌‘पोळ्याचे शहाणपण‌’

अति-सामाजिक प्रजातींमध्ये आरोग्य व्यवस्थापन हे केवळ वैयक्तिक लक्षण नसून, ते संपूर्ण समुदायाने जोपासलेले एक कर्तव्य असते, ज्याला आपण ‌‘पोळ्याचे शहाणपण‌’ (Wisdom of the Hive) म्हणू शकतो. या सामूहिक लढ्याचा पहिला महत्त्वाचा स्तंभ म्हणजे ‌‘ॲलोग्रूमिंग‌’, जो केवळ बाह्य स्वच्छतेसाठी नसून, शरीरातील ‌‘ऑक्सिटोसिन‌’ वाढवून परस्पर तणाव कमी करणारा एक जिवंत ‌‘सामाजिक डिंक‌’ आहे. दुसरा स्तंभ म्हणजे निसर्गातील ‌‘विलगीकरण नियम‌’ (Quarantine Protocols); जिथे एखादी मधमाशी संसर्ग झाल्यास स्वतःला समूहापासून दूर ठेवते किंवा सुदृढ सदस्य तिला वसाहतीबाहेर नेतात, जेणेकरून संभाव्य साथ रोखली जावी, हे नैसर्गिक ‌‘सोशल डिस्टन्सिंग‌’ थक्क करणारे आहे. तिसरा आणि सर्वांत मोलाचा स्तंभ म्हणजे ‌‘सामाजिक कवच‌’ (Social Buffer); केवळ एका समूहाचा भाग असण्यानेच शरीरातील ‌‘कॉर्टिसोल‌’ची पातळी घटते आणि रोगप्रतिकार शक्ती अधिक सक्षम होते.

थोडक्यात, प्राणी आपल्या अधिवासाचे (Habitat) आरोग्य जपून स्वतःचे आरोग्य राखतात. यामध्ये स्वच्छता पथक (Sanitation Squad) महत्त्वाची भूमिका बजावते. लांडगे किंवा वाघ-सिंहासारखे शिकारी प्राणी शिकार करताना कळपातील आजारी आणि कमकुवत प्राण्यांना लक्ष्य करतात. याद्वारे ते संपूर्ण परिसंस्थेच्या आरोग्याचे व्यवस्थापन करतात. यामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रसार संपूर्ण कळपात होण्यापासून रोखला जातो आणि केवळ सुदृढ प्राणीच पुनरुत्पादनाद्वारे आपली पिढी पुढे नेतील, याची खात्री केली जाते. प्राण्यांच्या जगात सोबत असणे हे केवळ मानसिक समाधान नसून, ते शारीरिक संरक्षणाचे एक अभेद्य आणि वैज्ञानिक कवच आहे. मानव म्हणून आपण जेव्हा एकाकी पडतो, तेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. पण, जेव्हा आपण आपल्या सोसायटीमध्ये किंवा मित्रपरिवारात संवाद साधतो, तेव्हा ते केवळ गप्पा नसून ते एक प्रकारचे ‌‘ॲलोग्रूमिंग‌’ असते, जे आपल्याला हृदयविकार आणि मानसिक आघातांपासून वाचवते.

निसर्गाची स्वतःची औषधशाळा : झुफार्माकॉग्नॉसी (Zoopharmacognosy) कुत्रे किंवा मांजरींना गवत खाताना तुम्ही पाहिले असेल. हे ते भुकेसाठी नाही, तर पोटातील विकार दूर करण्यासाठी करतात. यालाच वैज्ञानिक भाषेत ‌‘झुफार्माकॉग्नॉसी‌’ म्हणतात.

चिम्पांझी : पोटातील किडे मारण्यासाठी ते विशिष्ट खरखरीत पाने अख्खी गिळतात.

हत्ती : सांधेदुखी कमी करण्यासाठी ताप येणाऱ्या झाडाची साल खातात.

अस्वले : ‌‘हायबरनेशन‌’मधून बाहेर आल्यावर सांधेदुखीसाठी विशिष्ट मुळे अंगाला घासतात.

आज आपण वापरत असलेली अनेक प्रतिजैविके (Antibiotics) आणि कर्करोगावरील औषधे ही प्राण्यांच्या या नैसर्गिक औषधशाळेतून प्रेरित झालेली आहेत.

पिंजरा तोडून बाहेर पडा ‘झूकोसिस‌’ म्हणजे प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांमध्ये एकाकीपणामुळे किंवा नैसर्गिक हालचालींवर बंदी आल्यामुळे निर्माण होणारा मानसिक आजार. आज मुंबईसारख्या शहरात आपणही काँक्रीटच्या आलिशान पिंजऱ्यात तेच जीवन जगत आहोत. प्राणी जेव्हा पिंजऱ्यात असतात, तेव्हा आपण त्याला क्रूरता म्हणतो, पण आपण जेव्हा स्वतःला डिजिटल स्क्रीन आणि चार भिंतींच्या आड कोंडून घेतो, तेव्हा त्याला आपण ‌‘प्रगती‌’ म्हणतो.

निसर्ग आपल्याला तीन गोष्टी सांगतोय :

1. हालचाल करा : शरीर हलवणे हे नैसर्गिक औषध आहे.
2. समूहात राहा : एकटेपणा हा आजारांना निमंत्रण देणारा शिकारी आहे.
3. पर्यावरण बदला : लठ्ठपणा हा केवळ इच्छशक्तीचा नाही, तर आपल्या पर्यावरणाचाही आजार आहे.

शेवटी, आपण हे विसरता कामा नये की, आपणही एक सामाजिक प्राणी आहोत. निसर्गाशी नाते तोडणे, म्हणजे आरोग्याशी नाते तोडणे होय. आपल्या आरोग्याचा मार्ग रुग्णालयाच्या दवाखान्यासोबतच निसर्गाच्या पाऊलवाटांवरूनही जातो.

प्रो. डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

प्रोफेसर डॉ शुभांगी रघुनाथ पारकर, या एमबीबीएस, एमडी, पीएचडी, ज्येष्ठ मनोचिकीत्सक आणि आंतरराष्ट्रीय संशोधक असून. केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे माजी अधिष्ठाता होत्या. जागतिक पातळीवर संशोधन लेखनासाठी त्याना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मनोविकार, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक मानसशास्त्र या विषयांवर विविध वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकात विपुल लेखन करत जनजागृती करत असतात.