अद्वैत तत्त्वज्ञानाचे प्रणेते, अवघ्या 32 वर्षांच्या आयुष्यात प्रस्थानत्रयींवर परिपूर्ण भाष्य करणारे, शेकडो भक्तिसूत्रांचे आणि स्तोत्रांचे रचनाकार, अनेक प्रकरण ग्रंथ आणि देशाच्या चार दिशांना मठस्थापना करून, लोकसंग्रहाचे अलौकिक कार्य करणाऱ्या श्रीमद् आद्य शंकराचार्य यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारकार्याचे केलेले हे चिंतन...
'यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत| अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥' ‘भगवद्गीते’तील हा सुप्रसिद्ध लोक म्हणजे काळाच्या कुठल्याही टप्प्यावर ‘जेव्हा कधी धर्माला ग्लानी येईल, तेव्हा-तेव्हा धर्म-संस्थापनेच्या कार्यासाठी मी अवतार घेईल’, हे भगवान श्रीकृष्णाचे वचन होय. परमेश्वराचा हा अवतार अनेक प्रकारचा आणि विविध हेतूंसाठी प्रकट होतो आणि समाजातील दुष्टप्रवृत्ती, तसेच दुष्टविचार यांचे निवारण करण्यासाठी या अवताराचे प्रयोजन होत असते. भगवान श्रीकृष्णाच्या या वचनाचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे हिंदू धर्माला आलेली वैचारिक ग्लानी, सनातन वैदिक धर्माचा पडलेला विसर आणि वाममार्गी पंथाच्या उपासकांचे वैचारिक उत्थान करण्यासाठी आद्य श्री शंकराचार्यांचे झालेले अवतारकार्य होय. प्रस्थानत्रयीचे भाष्यकार, केवल अद्वैतवादाचे प्रवर्तक, युगकर्ते वेदांती आणि लोकसंग्राहक यती अशी श्रीमद् आद्य शंकराचार्य यांची ओळख. अनेक मतमतांतरांच्या विलेषणानंतर इसवी सन पूर्व 48 हा शतकभराचा काळ आद्य शंकराचार्यांचे पर्व म्हणून निश्चित करता येतो.
केरळम् येथील पेरियार नदीच्या काठावरील कालटी नावाच्या ‘अग्रहार’ प्रकारच्या ग्रामामध्ये आचार्यांचा जन्म झाला. ज्या गावातील सर्व ब्राह्मणवृंद हे ‘घनपाठी’ आणि ‘दशग्रंथी’ अशा स्वरूपाचे विद्वान असतात, असे गाव राजाकडून या ब्रह्मवृदांना भेट स्वरूपात देण्यात येते, त्या गावाला ‘अग्रहार’ असे म्हणतात. तर, या कालटी नावाच्या गावात नंबुद्री ब्राह्मणकुळात पिता शिवगुरू आणि माता आर्यांबा यांच्या पोटी आचार्यांचा जन्म झाला. आचार्यांचे आजोबा विद्याधिराज हेदेखील फार मोठे पंडित होते. त्यांचे पिता शिवगुरू आणि आर्यांबा हे मोठे तपस्वी शिवभक्त. पोटी पुत्र नाही म्हणून त्यांनी चंद्रमौलीश्वर शंकराची आराधना केली आणि अल्पायुषी असला तरी विद्वान पुत्र व्हावा, अशी प्रार्थना केली. तेव्हा तुला अल्पायुषी; परंतु तरीही प्रकांड पंडित असा पुत्र प्राप्त होईल, असा वर भगवान शंकराने शिवगुरूंना दिला आणि त्यानुसार वैशाख शुद्ध पंचमीच्या मुहूर्तावर आचार्यांचा जन्म झाला.
अत्यंत प्रतिभावान असलेले आचार्य लहानपणापासूनच अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते आणि वयाच्या केवळ आठव्या वर्षी त्यांनी ‘वेदादी’ ग्रंथांचे सखोल अध्ययन केले होते. थोडक्यात सांगायचे तर, ‘अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्व शास्त्रविद शोडशे कृतवान भाष्यं द्वात्रींशे मुनिरभ्यगात’ असे आचार्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करता येईल. वयाच्या केवळ आठव्या वष चारही वेदांचे सांगोपांग अध्ययन, वयाच्या 12व्या वर्षापर्यंत सर्व शास्त्रांचे अध्ययन, 16व्या वष ‘ब्रह्मसूत्र भाष्या’ची निर्मिती आणि 32व्या वर्षी त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली. केवळ 32 वर्षांच्या आयुष्यात प्रस्थानत्रयींवर परिपूर्ण भाष्य, शेकडो भक्तिसूत्रांची आणि स्तोत्रांची रचना, अनेक प्रकरण ग्रंथ आणि देशाच्या चार दिशांना केलेली मठस्थापना, तसेच लोकसंग्रहाचे कार्य केवळ अलौकिक असेच म्हणावे लागेल. पित्याच्या मृत्यूनंतर माता आर्यांबेने आचार्यांचे मोठ्या कष्टाने पालनपोषण केले. परंतु, जन्मतःच संन्यासी वृत्तीच्या आचार्यांना लौकिक जगातून निवृत्ती मिळवण्यासाठी संन्यास धारण करण्याची ओढ लागली होती. आचार्यांनी मातेकडून मोठ्या कष्टाने संन्यास धारण करण्याची परवानगी मिळवली आणि श्री गौडपादाचार्यांचे शिष्य गोविंद भगवतपाद यांच्याकडे जाऊन संन्यास दीक्षा घेतली आणि त्यांचे लोकोत्तर कार्य सुरू केले. मुळात आद्य शंकराचार्यांची परंपरा ही फार थोर आहे. या परंपरेत पिता-पुत्र परंपरा आणि शिष्यपरंपरा यांचा संगम झालेला आढळतो. आचार्यांनी उद्घोष केलेली ‘केवलाद्वैतपरंपरा’ ही भगवान विष्णूपासून सुरू होते. भगवान विष्णू, त्यांचे पुत्र ब्रह्मदेव, त्यानंतर वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास आणि शुकाचार्यांपर्यंत ही पिता-पुत्र परंपरा दिसून येते आणि त्यानंतर शुकाचार्यांकडून आचार्य गौडपाद, गोविंद भगवतपाद यांनी या परंपरेची दीक्षा मिळवली आणि त्यानंतर आद्य शंकराचार्यांनी ही परंपरा त्यांचे शिष्य पद्मपाद, हस्तामलक, तोटकाचार्य आणि सुरेश्वराचार्य यांच्यापर्यंत पुढे प्रसृत केली. याच शिष्यांमार्फत आचार्यांनी उत्तरेत ज्योतिर्मठ, दक्षिणेत शृंगेरी शारदापीठ, पूर्वेला पुरी येथे गोवर्धन मठ आणि पश्चिमेस द्वारका येथे शारदापीठाची स्थापना केली. याशिवाय, ‘कांची कामकोटी’ या अतिरिक्त पीठाची स्थापना केली. ‘अद्वैत’ तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याची बाराशे वर्षांची ‘अक्षुण्ण’ परंपरा आजही पाहावयास मिळते. या मठांचे कार्य अव्याहतपणे चालू राहावे म्हणून आचार्यांनी ‘मठाम्नाय’ नावाचा सूत्र ग्रंथ लिहून त्यात मठाची दैनंदिन कार्ये, मठाधिपतीची नियुक्ती इत्यादी प्रक्रिया सविस्तरपणे सांगितल्या आहेत. आद्य शंकराचार्यांचे एकूणच व्यक्तित्व म्हणजे तर्ककठोर तत्त्वज्ञ आणि भक्तिरसपूर्ण काव्य घडवणारा कवी यांचा मनोज्ञ संगम होय.
तत्त्वज्ञानाच्या प्रांतात ‘ऋग्वेदा’पासून ते ‘अथर्ववेदा’तील ब्रह्मपर सूक्त ते ‘उपनिषदे’ यांच्यातील ब्रह्मतत्त्वाचे प्रतिपादन, ‘उपनिषद’ वाक्यातील विरोधाभास दूर करून त्यांच्यात तर्कदृष्टीने समन्वय घडवणे, तसेच सांख्य, योग, न्याय- वैशिषिक, पूर्व मीमांसा या आस्तिक आणि बौद्ध, जैन, लोकायत या नास्तिक दर्शनाचे खंडन करून ‘अद्वैत’ तत्त्वज्ञानाची भक्कम पायावर मांडणी करणे, यातून त्यांचे कार्य अधोरेखित होते आणि हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. ‘वेदां’नी सांगितलेला सनातन धर्म हाच मूळ धर्म असून, ‘वेदोऽखिलो धर्ममूलम्’ हे तत्त्व आचार्यांनी शिरोधार्य मानले.
प्राचीन काळी सम्राट अशोकाचा राजाश्रय मिळाल्याने बौद्ध धर्माचा विप्लव आणि अफाट वेगाने विस्तार होत असताना, भारतीय समाजात वैचारिक दुही निर्माण झाली होती. तसेच यज्ञातील हिंसा, अनेक देवतावाद यातून बौद्ध, जैन या चळवळी पुढे येऊ लागल्या होत्या. समाजाचे हे विघटन थांबवून सलोखा निर्माण करण्याचे कार्य आचार्यांनी केले. त्यासाठी ‘शैव’, ‘वैष्णव’, ‘शाक्त’, ‘सौर’, ‘गाणपत्य’ आणि ‘कौमार्य’ या सहा हिंदू-पंथीयांना एकत्रित करण्याचे लोकसंग्राहक कार्य आचार्यांनी पार पाडले. आदित्य, अंबिका, विष्णू, गणनाथ आणि महेश्वर या पाच लोकप्रिय देवतांची एकत्र पूजा करण्याचा समन्वयी ‘पंचायतन पूजा’ हा प्रकार त्यांनी रूढ केला व त्यातून हिंदू धर्मातील पंथोपंथात निर्माण झालेली दुही कायमची मिटवली. आज प्रसिद्ध असणारी व घराघरांत दिसून येणारी ‘पंचायतन पूजा’ ही केवळ आद्य शंकराचार्यांमुळे रूढ झाली. ‘केवलाद्वैत’ विचाराच्या मांडणीसाठी ‘खंडनमंडन’ शैलीचा आदर्श आचार्यांनी घालून दिला.
मुळात आद्य शंकराचार्य हे ज्ञानमाग होते. निर्गुण ब्रह्माच्या उपासनेसाठी ज्ञानमार्ग हाच योग्य मार्ग होय, याबद्दल त्यांच्या मनात किंचितही शंका नव्हती. परंतु, निर्गुणाच्या उपासनेसाठी सामान्य साधकाला सगुण भक्ती उपयोगी पडते, हे जाणून त्यांनी त्यांच्या स्तोत्रांकरवी भक्तिमार्गाचा उपदेश केला.
आचार्यांनी शेकडो भक्तिसूत्रे व स्तोत्रे रचली. त्यात ‘शिव मानसपूजा’, ‘कनकधारा स्तोत्र’ इत्यादी स्तोत्रे प्रसिद्ध आहेत. या लोकसंग्राहक कार्यातून आचार्यांनी बौद्ध, जैन इत्यादी नास्तिक दर्शनाचा परामर्श घेतला व बुद्धाच्या ‘शून्यवादा’वर टीका करून वेदांचे शब्दप्रामाण्य पुन्हा अधोरेखित केले. वेदांवरची जनतेतील निष्ठा कायम राहण्यासाठी त्यांनी वेदांचा अर्थ लावला. तसेच ‘उपनिषदे’, ‘श्रीमद्भगवद्गीता’ व भगवान व्यासांनी रचलेली ‘ब्रह्मसूत्रे’ या प्रस्थानत्रयींवर भाष्य केले. वैदिक परंपरेनुसार, या तिन्हींवर स्वतंत्र बुद्धीने टीका लिहिणाऱ्या विद्वानास ‘आचार्य’ ही पदवी मिळत असे.
आद्य शंकराचार्यांनी ‘ब्रह्म’ हे आनंदमय नसून, ते साक्षात ‘आनंद’ आहे व त्या आनंदाची प्राप्ती हाच मोक्ष होय, हा विचार रुजवला. बुद्धाने सांगितल्याप्रमाणे केवळ दुःखमुक्ती नव्हे, तर निखळ ब्रह्मानंदाची प्राप्ती हेच मानवी जीवनाचे ध्येय असायला हवे, हा विचार आचार्यांनी सर्वदूर पोहोचवला. या विचारांची मांडणी करण्यासाठी आचार्यांनी ‘एकेश्वरवादा’चा पुरस्कार केला. तसेच कर्म संन्यासपूर्वक ज्ञाननिष्ठा या मार्गाची शिकवण दिली. म्हणूनच, आद्य शंकराचार्य हे मानवजातीच्या महान कल्याणकर्त्यांपैकी एक होते, असे म्हणावे लागेल. त्यांच्या विलक्षण प्रतिभेचे अनेक आयाम सांगता येतील. अत्यंत गहन तात्त्विक सत्य सहज समजतील अशा भाषेत मांडण्याची बौद्धिक प्रतिभा, केवळ विद्वत्तेच्या पलीकडे जाऊन अंतिम सत्याला मूर्त स्वरूप देणारी आध्यात्मिक अनुभूती, कठोर तांत्रिक ग्रंथांपासून ते हृदयस्पर्श भक्तिमय स्तोत्रांपर्यंत सहजपणे वावरणारी काव्यप्रतिभा, ज्ञान जतन करण्यासाठी आणि ते प्रसारित करण्यासाठी चार स्थळी संस्थांची स्थापना करणारी संघटनात्मक दूरदृष्टी आणि मूळ वैदिक परंपरेचा आदर राखून धार्मिक प्रथा-परंपरांमध्ये सुधारणा घडवणारे करुणाशील नेतृत्व म्हणजे आद्य शंकराचार्य होत. त्यांची प्रतिभा आणि करुणा केवळ बौद्धिक क्षेत्रापुरती मर्यादित नव्हती, तर ती व्यावहारिक मानवी दुःखांनाही स्पर्श करणारी होती. संस्था उभारणीच्या दृष्टीने राष्ट्रीय एकात्मता आणि आंतरप्रादेशिक सुसूत्रता आणि त्यातील समन्वय साध्य करण्याच्या हेतूने देशाच्या चार टोकांवरील मठस्थापना ही त्यांच्या दूरदृष्टीचीच देणगी होय. त्यांच्या व्यापक तत्त्वज्ञानाने विविध धार्मिक दृष्टिकोनांना एका सुसंग चौकटीत एकत्र आणून, भारताच्या धार्मिक परिदृश्यात आमूलाग्र बदल घडवले. भारताचे प्राचीन ज्ञान जतन करून पुढील पिढ्यांसाठी सुलभ आणि समर्पक बनवले. बाराशे वर्षांपासून या मठांचे कार्य अविरतपणे चालू आहे. राजकीय उलथापालथी, सामाजिक बदल-स्थित्यंतरे आणि काळाच्या ओघात सनातन मूल्यरक्षण करण्याची ‘अक्षुण्ण’ परंपरा आजही या मठांमधून अबाधित आहे.
सनातन वैदिक धर्माचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी आचार्यांनी अथक परिश्रम घेतले. आचार्य नसते, तर आज संपूर्ण भारतीय उपखंड हा नास्तिक मतांनी गिळंकृत केला असता. परंतु, वैदिक सनातन धर्मावरील प्रगाढ निष्ठा आणि लोकसंग्राहक वृत्ती यांच्या बळावर आचार्यांनी वैदिक धर्मावरील हे संकट दूर करून धर्मावरील ग्लानी दूर करण्याचे लोकोत्तर कार्य केले. म्हणूनच, ‘श्रुति स्मृति पुराणां आलयं करुणालयं| नमामि भगवत्पादम शंकरं लोक शंकरम्’ हे वचन सार्थ ठरते. आचार्यांच्या चरित्राचा विचार करताना भगवान श्रीकृष्ण, श्री संत ज्ञानेश्वर आणि संतश्रेष्ठ रामदास यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ‘चिदानंद रूपः शिवोऽहम् शिवोऽहम्’ असा जागर करून वैदिक धर्माची पताका अप्रतिहत राहावी, यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या आचार्यांना कोटी कोटी नमन!
- अपर्णा कुलकर्णी
[email protected]