नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्यांची झोप उडल्याशिवाय राहणार नाही : देवेंद्र फडणवीस

    21-Apr-2026
Total Views |

Devendra Fadnavis (2)
 
 
मुंबई : "ज्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या नाारी शक्तीला दिशा दिली आणि नारीशक्तीची ताकद संपूर्ण भारताला दाखवून दिली अशा सर्व प्रतीकांना मी नमन करतो. या मोर्चामुळे नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्यांची झोप उडल्याशिवाय राहणार नाही. महिला अधिकार पायदळी तुडवणाऱ्यांना इशारा देण्याचे काम या मोर्चा द्वारे केले गेले आहे,” असे म्हणत त्यांनी नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. मंगळवार दि.२१ रोजी केले. नारी शक्ती वंदन मोर्चा सांगता सभेत वरळी डोम येथे ते बोलत होते.
 
“हा केवळ कायदा पडला नाही तर गेल्या दोनशे वर्षात महिलांच्या उत्थानासाठी जी चळवळ चालली त्या चळवळीस संपवण्याचे काम या लोकांनी केले आहे. ज्या महिला खासदारांनी या विधेयकाला विरोध केला त्याचे मला याबाबत खूप दुःख वाटते. शाहू, फुले आंबेडकरांचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे का असा माझा विरोधकांना प्रश्न आहे. कुठेतरी आपली दुकानदारी बंद होईल म्हणून या विधेयकाला विरोध केला गेला. सामान्य स्त्री जर देशाच्या मुख्य प्रवाह मध्ये आली तर तुम्ही जे अघोषित आरक्षण आपल्या मुलींना करून ठेवले आहे ते संपेल यामुळेच तुम्ही विरोध करत आहात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांना शक्ती देण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोध करणारे सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूच होते त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता. नेहरूंची तीच परंपरा राहुल गांधी चालवत आहेत." असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला.
 
"आज निर्धाराची सुरुवात झालेली आहे की जोपर्यंत संसदेत आणि विधानसभेत मातृशक्तीला स्थान मिळणार नाही तोवर लढत राहू. १९९६ पासून महिलांना आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू होता. पण काँग्रेसने कधी या मागणीचा विचार केला नाही की यासंदर्भातील विधेयक आणले नाही. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा हे विधेयक आणलं पण बहुमत नसल्यामुळे ते पारित होऊ शकले नाही. मनमोहन सिंग यांच्या काळात दोन तृतीयांश बहुमत असताना हे विधेयक विचारात घेतले गेले नाही. राज्यसभेने मंजूर करूनही लोकसभेत हे विधेयक येऊ दिले गेले नाही. कारण पहिल्यापासून काँग्रेसची नीती महिलांना आणि महिला आरक्षणला विरोध करण्याची होती. पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१९ मध्ये बहुमत मिळाले तेव्हा संविधान संशोधन करून भारताच्या संविधानात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.”, असेही ते म्हणाले.
 
“काही बोल एवढे लोक माझे २०२३ चे ट्विट दाखवत आहे पण त्यांना सांगू इच्छितो की झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना उठवता येत नाही. डिलिमिटेशन केलं नाही तर संविधान संशोधन लागू होत नाही.त्यामुळे २०२९ मध्ये डिलिमिटेशन केलं तर २०३४ मध्ये ही ते लागू होऊ शकेल की नाही सांगता येत नाही. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगतच्या जनगणनाचे आकडे यासाठी ग्राह्य धरण्याचा विचार घेतला. सगळ्या राज्यात ५० टक्के जागा वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. कोणत्याच राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी होणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला गेला." असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाची चित्रफित सभेच्या ठिकाणी दाखवण्यात आली. नृत्य रूपाने स्त्रीशक्तीला कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदन करण्यात आले. आमदार चित्रा वाघ यांनी प्रास्ताविक केले.
 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राहुल गांधी यांची हिंदू धर्माविरोधी भाषणाची आठवण करून दिली. हिंदू धर्मातील शक्ती म्हणजे नारी शक्ती आहे त्या शक्तीचा विनाश करण्याची राहुल गांधी यांची संकल्पना पुन्हा एकदा या निमित्ताने दिसली आहे. फक्त महिला आरक्षणच नव्हे तर देशाच्या विकासाची वाटचाल रोखण्याचे काम विरोधकांनी केल आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ, लखपती दीदी यासारख्या योजनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला प्रवास शेवटी महिलांचे नेतृत्व तयार होण्यासाठी महिलाआरक्षणाच्या पर्यंत आला होता. पहिल्यापासून ज्या देशात स्त्रियांचा सहभाग आहे तोच देश विकासाच्या वाटेवर जात आहे.