धारणीय वेग ईर्षा भाग- १३

Total Views |

‌‘नको रे मना मत्सरू दंभ भारू॥‌’ असे ‌‘मनाच्या लोका‌’त समर्थ रामदास स्वामी सांगतात. कुणाविषयीही मत्सर अथवा अहंकार न बाळगण्याचे आवाहन स्वामी मनाला करतात. पण, वास्तविक जीवनात ईर्षा, मत्सर, अहंकार या भावनांनी मानवी जीवन व्यापलेले असते. परंतु, या भावनाही काहीशा भिन्न असतात. मागील भागात ‌‘ईर्षा‌’ या धारणीय वेगाची आपण माहिती करुन घेतली. आजच्या भागात ‌‘ईर्षा‌’ आणि ‌‘मत्सर‌’ या भावनांमधील नेमका फरक समजून घेऊया...

माणूस नेहमीच समूहात, कळपात, कुटुंबव्यवस्थेत राहणारा सामाजिक प्राणी (Social animal) आहे. माणूस इतर माणसांवर अवलंबून असतो आणि एकमेकांच्या परस्पर सहकार्याने जीवन जगत असतो. समाजात राहताना, वावरताना समाजभान असणे आणि अंगीकारणेही तितकेच महत्त्वाचे. अष्टांग योगातही यम आणि नियम हे पहिले दोन अंग क्रमशः सामाजिक नैतिकता (यम) आणि वैयक्तिक शिस्त (नियम) यांवरच आहेत. त्यांचे पालन केल्याने जीवनात स्थिरता, शांतता आणि नैतिक प्रगती घडवून आणण्यास मदत होते.

समाजात, सजीवांच्या समूहात, कुटुंबात राहतेवेळी प्रत्येक व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ, दुःखरहित, बाधामुक्त असणे गरजेचे असते. तेव्हाच ती व्यक्ती स्वतःशी घरातल्यांशी शेजार-पाजाऱ्यांशी नातेवाईकांशी इ.शी चांगले संबंध स्थापित करू शकते.‌‘कोविड‌’पूवची सामाजिक व्यवस्था आणि ‌‘कोविड‌’नंतरची रचना यात खूप बदल झालेला जाणवतो. ऑनलाईन, घरबसल्या विविध सेवांचा उपभोग प्रत्येक वयोगटात वाढला आहे. मनोरंजनाचे, खेळाचे व विविध बातम्यांचे इतके पर्याय उपलब्ध झाले आहेत की, प्रत्येक व्यक्ती भिन्न-भिन्न गॅझेट्सने वेगवेगळे, वैयक्तिक आवडीचे कार्यक्रम बघत असतो. आधी एका टीव्हीवरील कार्यक्रम बघण्यास पूर्ण घर-चाळ-गाव एकत्र येई. आता घराघरांतून एकाच वेळी वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येकजण बघत असतो. जेवणाच्या वेळा, झोपायच्या वेळाही बदललेल्या आहेत. एकत्र बसून संवाद हा खूप कमी झाला आहे. मित्र-मैत्रिणी भेटल्यावरही गप्पा रंगण्याऐवजी एखादा कार्यक्रम बघत बसतात. आपापसातला संवाद हळूहळू कमी होताना जाणवू लागला आहे. कुटुंब पद्धतीतही बदल झालेला आहे. (Joint family) एकत्रित कुटुंबे कमी होत गेली आणि आता केवळ नवरा-बायको किंवा पालक आणि अपत्य शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त भिन्न-भिन्न ठिकाणी राहणे, हेदेखील प्रमाण खूप वाढले आहे. घराघरांतून संवाद कमी होत चालला आहे. एकाकीपणा वाढत चालला आहे. त्यामुळे इतरांचे ऐकणे, त्यांच्याशी जमवून घेणे, समोरची व्यक्तीदेखील बरोबर असू शकते, हे मान्य करणे, पटणे, आपली चूक कबूल करणे, इतरांमधील दोष शोधत बसण्यापेक्षा आपल्यातील उणिवा भरून काढणे, इतरांमधील गुण हेरून तसे अंगीकारणे इ. इ. गोष्टी लोप पावू लागल्या आहेत. स्वतःशी आणि इतरांशी चांगले नाते प्रस्थापित करायचे असल्यास, टिकवायचे असल्यास भावनांच्या उद्रेकांवर आवर (control) घालणे महत्त्वाचे आहे. धारणीय वेगांना (Natural mental urges)ना रोखणे महत्त्वाचे आहे.

विविध मनोकायिक आजारांमध्ये मानसस्वास्थ्य/अस्वास्थ्य या घटकाची खूप महत्त्वाची, मोलाची भूमिका आहे. मानसिक स्वास्थ्य चांगले असल्यास मनोकायिक आजार, तक्रारी अधिक जोमाने वाढत नाहीत, पसरत नाहीत. त्यांची अभिव्यक्तीदेखील सीमित राहते व त्यांचे शारीरिक आजारात रूपांतरही होत नाही. याउलट, जर मानसिक स्वास्थ्यात बिघाड झाला, तर मनोकायिक आजारांची वृद्धी (वाढ) जोमाने होते आणि तीव्र स्वरूपात ते अभिव्यक्त होतात. काही आजार (stress)ने, (tension)ने झटकन वाढतात, हे आपण बघतोच.

विविध भावभावनांचा प्रभाव मज्जावह संस्था (nervous system)वर होतो आणि या भावनांचे नियमन (regulation) करण्यात ही nervous systemचे खूप मोठे योगदान आहे. याबद्दल सविस्तर पुढील लेखात वाचूया. भावना, भाव (emotions) हा मनातून उत्पन्न झालेला एक प्रतिसाद (reaction) आहे. आवडलेल्या व्यक्ती, वस्तू, घटना, सुगंध इ.ने सकारात्मक भाव उत्पन्न होतात आणि मनोनुकूल नसल्यास नकारात्मक भाव तरंग उमटतात. यांची तीव्रता मज्जासंस्थेशी निगडित आहे. म्हणूनच, भावनिक उद्रेक (Emotional outburst) झाल्यास त्याचा परिणाम विविध संस्थावर (systems) होताना दिसतो. आपले मन, मनःस्थिती, परिस्थिती, नाते-संबंध इ. प्रत्येक गोष्ट व्यक्त होते आणि ही व्यक्तता (अभिव्यक्ती) भावनेच्या स्वरूपातून होते. या भावना अंतर्गत किंवा बाह्य घटनांना प्रतिसाद म्हणून उमटतात. जेव्हा थोड्या प्रमाणात असतात, तेव्हा त्या लवकर शमतात, विरून जातात. पण, जेव्हा भावनांची तीव्रता अधिक असते. तेव्हा त्यांना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्या स्वतःहून शमत नाहीत. अशा उत्कट भावनांनाच ‌‘धारणीय वेग‌’ असे आयुर्वेदात संबोधिले आहे.

मागील लेखात ‌‘ईर्षा‌’ या भावनेबद्दल आपण वाचले. त्याबद्दल अजून थोडे सविस्तर आज वाचूया. ईर्षा आणि मत्सर/मार्त्स्य हे दोन धारणीय वेग काही वेळेस एकच आहेत, असा संभ्रम होतो. पण, ईर्षा(Envy) आणि मार्त्स्य (Jealousy) हे दोन भाव-धारणीय वेग भिन्न भिन्न आहेत. ते कसे, ते बघूया. उदा : वर्गातील इतरांचे कौतुक, नंबर आला, पुरस्कार मिळाला की, आपल्या मनात ‌‘मला मिळाले असते तर...‌’ ही जी भावना निर्माण होते, ती म्हणजे ईर्षा (Envy). ती उत्कट इच्छा, भावना जी इतरांच्या यशावर, कौशल्यावर, कर्तृत्वावर किंवा वस्तू बघून (posessions) आपल्याकडे असावे, अशी इच्छा निर्माण होऊन जी असूया निर्माण होते, ती म्हणजे ‌‘ईर्षा‌’ होय. ही इच्छा निर्माण होते, ती दुसऱ्या व्यक्तीकडे बघून. म्हणजे दोन व्यक्तींमधील परस्पर संवाद-क्रिया (Interaction) आहे. ईर्षा निर्माण त्या व्यक्तीमध्ये होते, जेव्हा ती व्यक्ती स्वतःला न्यूनतम (कमी लेखणे), गौण (Inferior) समजते किंवा त्या गोष्टीबद्दल आस, तळमळ, उत्कट इच्छा (Longing) बाळगून असते आणि इतरांना मिळाल्यावर चीड, नाराजी, संताप उत्पन्न होतो. आपल्याकडे नसलेल्या गोष्टी/स्वभाव/नाती इ.बद्दल अनामिक ओढ यात दिसते. यातून सकारात्मक परिणामही बघायला मिळतात. ती गोष्ट मिळविण्यासाठी धडपड, लक्षपूर्वक मेहनत. त्याने उत्तम फायदे मिळू शकतात. धन, संपत्ती, यश, प्रतिभा. एकच ध्यास मनाशी धरून मेहनत घेतल्यास ईर्षा ही सकारात्मक भावना होऊ शकते. पण, काही वेळेस असे न होता, न्यूनगंड (Inferority complex) आणि sense of failure, resentment उत्पन्न होते. हे वेळीच रोखणे गरजेचे आहे.

ईर्षा आणि मत्सर यांतील फरक बघायचा झाला, तर मत्सर म्हणजे आपल्याकडे असलेले, गमावण्याची भीती. मैत्री, संपत्ती इ. नात्यांमध्ये हे अधिक बघण्यास मिळते. ‌‘गमावण्याची भीती‌’ या मूळ भावनेतून संशय, असुरक्षितता (Sense of insecurity), अति चिंता, अविश्वास इ. नकारात्मक भाव उत्पन्न होतात. त्यामुळे प्रत्येकाशी तुसडे वागणे, कायम चिंतातुर, सतत हा विचार मनात राहणे की, आपली गरज संपली तर? आपली जागा इतरांनी घेतली तर? आपल्यापेक्षा इतर कोणी अधिक प्रिय झाला तर? इ. त्यामुळे ज्या व्यक्तीबद्दल असे वाटते, तिच्याशी आक्रमक वागणे, रागवून बोलणे इ. केले जाते. 'Sense of insecurity', 'fear of replacement' इ. भावना नकारात्मक आहेत. त्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.

मानसिक आवेगातून रजोगुण व तमोगुण वाढतो. या मनाच्या दोषांनी (सत्त्व, रज, तम हे तीन मानसिक गुण आहेत. सत्त्वाकडे जाणे, पोहोचणे, स्थिरावणे हे ध्येय असते.) या दोन्ही गुणांनी शरीरात क्रमशः पित्त व कफाची दुष्टी वाढते व विविध आजार उद्भवू लागतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये लक्षणांच्या तीव्रतेमध्ये आणि frequency मध्ये भिन्नता असते. पण, या दोन्ही गुणांना नियंत्रित करून सत्त्वभाव वृद्धिंगत करण्याकडे प्रत्येकाचा प्रयत्न असावा. (क्रमशः)

- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429
[email protected]

वैद्य कीर्ती देव

वैद्य सौ.कीर्ती देव, एम्.डी. (आयुर्वेद, मुंबई), आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजिस्ट. आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचा २५ वर्षांचा अनुभव. आयुर्वेदातील त्वचा व केशविकारांवरत उपचार तसेच सौंदर्य शास्त्र यांचा सखोल अभ्यास करून “आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजी” ही संकल्पना विकसित केली. गेली पंधरा वर्ष त्वचा व केश विकारांवर संपूर्णपणे आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करीत आहेत.
आयुर्वेद व सौंदर्य शास्त्राच्या प्रसारार्थ राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध व लेख प्रसिध्द.