मानवी आयुष्य सुकर करण्यात वैद्यकीय संशोधनाचा सिंहाचा वाटा आहे. वैज्ञानिक संशोधनामुळेच माणसाच्या जीवनाला अधिक सुरक्षित ठेवणे शक्य झाले. ‘देवी’, ‘पोलिओ’, ‘गोवर’ ते ‘कोविड’सारख्या आजार आणि महामारींवर नियंत्रण मिळवताना लसींची भूमिका महत्त्वाची ठरली. भारतासारख्या विशाल राष्ट्रात पावसाळ्यात डोके वर काढणाऱ्या ‘डेंग्यू’सारख्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘क्यूडेंगा’ या लसीच्या वापरास नुकतीच परवानगी मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘डेंग्यू’चा आजार आणि ‘क्यूडेंगा’ लस त्यावर कशी प्रभावी आहे, याचा घेतलेला मागोवा...
भारतात ‘डेंग्यू’ हा पूव ‘हंगामी ताप’ म्हणून ओळखला जात असे. साधरणतः पावसाळा आला की रुग्णालयात ‘डेंग्यू’चे रुग्ण अधिक संख्येने दिसून येत. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. हा आजार वेगाने उग्र रूप धारण करत असून, त्याचे परिणामही दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. ‘डेंग्यू’ आजाराचा प्रसार ‘एडीस एजिप्ती’ या डासामार्फत होतो. शहरांमध्ये साचलेले पाणी, अस्वच्छता अशा अनेक कारणांमुळे या डासांची वाढ होते. परिणामी, ‘डेंग्यू’चे प्रमाण वाढते. ‘डेंग्यू’ झाल्यावर सुरुवातीला ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, अंगदुखी अशी लक्षणे रुग्णांमध्ये दिसतात. काही रुग्णांमध्ये ‘प्लेटलेट्स’ कमी होतात, ज्यामुळे रक्तस्राव होण्याचाही धोका वाढतो. गंभीर अवस्थेत ‘डेंग्यू शॉक सिंड्रोम’ होऊन, रुग्णाची प्रकृती अत्यंत नाजूक होऊ शकते. त्यामुळेच ‘डेंग्यू’कडे दुर्लक्ष करणे धोकादायक असल्याचे पालिका प्रशासन आणि डॉक्टरांकडून सांगितले जाते. ‘डेंग्यू’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे ‘डीईएन्व्ही-1’, ‘डीईएन्व्ही-2’, ‘डीईएन्व्ही-3’, ‘डीईएन्व्ही-4’ असे चार वेगवेगळे प्रकार असतात. एकदा एका प्रकाराने जरी संसर्ग झाला, तरी दुसऱ्या प्रकाराने पुन्हा संसर्ग होऊ शकतो आणि तो अधिक गंभीर असण्याचीही शक्यता असते.
याच पार्श्वभूमीवर ‘डेंग्यू’विरोधातील लढा बळकट करण्यासाठी भारतातील औषध नियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीने ‘क्यूडेंगा’ अर्थात ‘टाके-003’ या लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. ही लस जपानमधील ‘टाकेडा फार्मास्युटिकल्स’ या कंपनीने विकसित केली असून, ही ‘लाईव्ह अटेन्युएटेड टेट्राव्हॅलेंट’ प्रकारातील लस आहे. म्हणजेच, ती लस कमकुवत केलेल्या विषाणूच्या साहाय्याने तयार केली जाते आणि डेंग्यूच्या चारही प्रकारांविरुद्ध लढण्यासाठी शरीराला सक्षम करते. या लसीचे उत्पादन भारतात हैदराबादमधील ‘बायोलॉजिकल ई लिमिटेड’च्या माध्यमातून भारतातच केले जाणार असल्याने, त्याचे माफक दरात उत्पादन शक्य होणार आहे.
‘क्यूडेंगा’ ही लस ‘लाईव्ह अटेन्युएटेड व्हायरस प्लॅटफॉर्म’वर आधारित आहे. यामुळे शरीरात चारही प्रकारच्या विषाणूंच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या ‘न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज’ तयार होतात, ज्या भविष्यातील संसर्गावेळी विषाणूचा प्रसार रोखतात. तसेच, ही लस पेशींची प्रतिकारशक्ती वाढवणारी असल्याने, दीर्घकालीन संरक्षणाच्या दृष्टीनेही ही लस महत्त्वाची मानली जाते. परिणामी, भविष्यात ‘डेंग्यू’चा संसर्ग झाला, तरी त्याची तीव्रता कमीच राहते. या लसीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, ती ‘डेंग्यू’चा गंभीर परिणाम कमी करते. यामुळे ‘डेंग्यू’चा रुग्ण लागण झाल्यावरही रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. भारतासारख्या विशाल देशात जिथे पावसाळ्यात ‘डेंग्यू’चे रुग्ण झपाट्याने वाढतात, तिथे हीच बाब अत्यंत महत्त्वाची आहे.
‘क्यूडेंगा’ ही लस साधारण तीन महिन्यांच्या अंतराने चार ते 60 वयोगटातील लोकांना दोन डोसमध्ये दिली जाते. विशेष म्हणजे, यासाठी पूव ‘डेंग्यू’ झाला आहे की नाही, हे तपासण्याची गरज नसल्याने, सार्वत्रिक लसीकरण करणे सोपे होते. मात्र, ही लस घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असल्याचे जागतिक संस्थांनी म्हटले आहे. तथापि, ‘क्यूडेंगा’ ही लस आली, म्हणून ‘डेंग्यू’ची समस्या पूर्णपणे संपणार नाही. कारण, ‘डेंग्यू’चा प्रसार हा डासांवर अवलंबून आहे. त्यामुळे घराच्या आजूबाजूला पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे, डास नियंत्रण करणे आणि जनजागृती वाढवणे, हे उपायदेखील तितकेच आवश्यक आहेत. ‘क्यूडेंगा’ ही लस भारताच्या आरोग्य व्यवस्थेत बदल घडवून आणू शकते. उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देण्याची ही सुरुवात आहे. ‘क्यूडेंगा’मुळे भारताने ‘डेंग्यू’विरुद्धच्या लढाईत एक मोठे पाऊल टाकले असून, ही लस निश्चितच ‘डेंग्यू’विरुद्धच्या लढ्यातील नवी संरक्षक ढाल ठरणार आहे.