काँग्रेसचे जड ओझे उतरविण्याची वेळ!

    21-Apr-2026
Total Views |

भाजप व रा. स्व. संघाला ‌‘द्रविड‌’ संस्कृतीविषयी तिटकारा असल्याची बेगडी टीका राहुल गांधी यांनी काल केली असली, तरी त्या राज्यात भाजपच्या मतांची टक्केवारी प्रत्येक निवडणुकीत वाढलेली का दिसते, त्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. खरे म्हणजे, सांगण्यासारखे काही नसल्याने आता ‌‘उत्तर विरुद्ध दक्षिण भारत‌’ अशी फूट पाडण्याचे पद्धतशीर प्रयत्न राहुल गांधींकडून सुरु आहेत. ‌‘वेताळ पंचविशी‌’त राजा विक्रमादित्य ज्याप्रमाणे पाठीवर कलेवर घेऊन फिरत असतो, तसा तामिळनाडूत नामशेष झालेल्या काँग्रेसचे कलेवर द्रमुक पाठीवर घेऊन फिरतो आहे, अशीच सद्यस्थिती!

तामिळनाडू विधानसभेच्या आगामी निवडणुकीत यावेळी द्रमुकच्या हातून सत्ता जाणार असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. कारण, द्रमुकच्या खुनशी, भ्रष्ट आणि सनातनविरोधी राजकारणाला मतदार कंटाळले आहेत. ते नव्या पर्यायांचा शोध घेत आहेत. त्यामुळे द्रमुकच्या नेत्यांमध्ये भीतीची लाट पसरली आहे. या राज्यात काँग्रेस पक्ष नामशेष झाला असला, तरी द्रमुकच्या पाठिंब्यामुळे तो ‌‘व्हेंटिलेटर‌’वर असतो. पण, द्रमुकचेच ‌‘कनेक्शन‌’ तुटले; तर ‌‘व्हेंटिलेटर‌’लाही वीजपुरवठा होणार नाही. त्यामुळे काँग्रेसकडून आता भावनिक राजकारण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप हे उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेतील राज्यांमध्ये भेद करीत असल्याचे ‌‘फेक नॅरेटिव्ह‌’ वाऱ्यासारखे पसरविले जात आहे. संसदेच्या जागांचे परिसीमन हे तामिळनाडूवर अन्यायकारक असल्याचा दावाही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. तसेच भाजप आणि रा. स्व. संघाला ‌‘द्रविड‌’ संस्कृतीचा तिटकारा आहे; पण त्यांना या राज्यात सत्ता हवी आहे, असा त्यांनी केलेला आरोपही या ‌‘फेक नॅरेटिव्ह‌’चाच एक भाग!

राहुल गांधी हे तद्दन खोटे ‌‘नॅरेटिव्ह‌’ पसरवितात, हे भारतातील जनतेला चांगलेच परिचयाचे. त्यामुळे मोदी हे उत्तर व दक्षिण असा भेद करतात, या त्यांच्या दाव्यात काडीमात्र दम नाही. उलट मोदींनी आजवर तामिळ संस्कृतीला केंद्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. वाराणसीतील ‌‘काशी-तामिळ संगम‌’ हा कार्यक्रम त्याचे उत्तम उदाहरण. शिवाय, मोदींनी लोकसभेत ‌‘सेंगोल‌’चीही प्रतिष्ठापना केली. मोदी तामिळनाडूतील विविध मंदिरांचे आवर्जून दर्शन घेतात. पूजाअर्चना करतात. तिकडची वेशभूषा स्वीकारतात. अगदी तामिळमधून भाषणाची सुरुवातही करतात. केवळ मोदीच नव्हे, तर दक्षिणेतील राज्यांमधील भाजप-संघाचे संघटन हे त्या-त्या राज्याची संस्कृती, मूल्ये, भाषा यांचा कायमच सन्मान करते. संघ-भाजपने कधीही ‌‘एक देश, एक संस्कृती, एक भाषा, एक परंपरा‌’ असा अट्टहास केलेला नाही. पण, सर्व संस्कृती-परंपरांचा मान राखत संपूर्ण देशाला एका धाग्यात गुंफणाऱ्या राष्ट्रवादाचा, भारतीयत्वाचाच कायम पुरस्कार केला. पण, राहुल गांधींना ‌‘उत्तर विरुद्ध दक्षिण भारत‌’ हा संघर्ष राजकीय पोळ्या शेकण्यासाठी आजही गरजेचा वाटतो. राहुल गांधी म्हणतात, त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‌‘भारत जोडो यात्रा‌’ केली. पण, त्यांना यानिमित्ताने भारत खरंच कळला का, हा प्रश्न अनुत्तरितच. उलट ‌‘भारत जोडो‌’च्या नावाखाली देशाला तोडण्याचीच भाषा त्यांनी केली. परिणामी, ही यात्रा ज्या ज्या भागांतून गेली, तिथे तिथे काँग्रेसच्या पदरी निराशाच आली.

दक्षिणेकडील कर्नाटक सोडल्यास कोणत्याच राज्यात भाजप आजवर सत्तेत आलेला नाही, हे खरे. मात्र, या सर्व राज्यांमध्ये भाजपच्या मतदानाच्या टक्केवारीत गेली काही वर्षे सातत्याने वाढच होताना दिसते. तामिळनाडूतही विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये वाढ होईल, याची दाट शक्यता आहे. याचे कारण, अण्णाद्रमुकशी भाजपने युती केल्यामुळे या पक्षाच्या पाठिंब्याचा भाजपला फायदा मिळेल. तामिळनाडूचे राजकारण प्रामुख्याने ‌‘द्रविड‌’ संस्कृतीभोवतीच फिरत असले, तरी आता काळानुसार मतदारांच्या निवडीतही बदल झालेला दिसतो. द्रमुक आणि अण्णाद्रमुक याच दोन पक्षांमध्ये आजवर त्या राज्यात सत्तेचे वाटप होत राहिले असले, तरी आता मतदारांना द्रमुकच्या विखारी राजकारणापासून सुटका हवी आहे. प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेता विजय याच्या नव्या ‌‘टीव्हीके‌’ पक्षाचीही चांगलीच हवा असली, तरी प्रत्यक्षात त्याला किती प्रतिसाद मिळतो, त्यावरही द्रमुकचे भवितव्य ठरेल. याचा अर्थ, द्रमुकची पकड ढिली पडत चालली आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत द्रमुकच्या नेत्यांनी उघडपणे सनातन धर्मावर गलिच्छ टीका केली. राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी केबल कनेक्शन कापणे, तिरुपारंकुंद्रम टेकडीवरील दीपथूनवर कार्तिगाई दीपम परंपरेला विरोध, संघाच्या संचलनाला विरोध करणे, मंदिरांवर बुलडोझर फिरवणे, या द्रमुकच्या हिंदूविरोधी कृत्यांमुळेही सामान्य मतदार बिथरलेला आहे. कारण, ‌‘द्रविड‌’ संस्कृती हाही सनातन धर्माचाच भाग आहे, हे सामान्य तामिळ माणूस जाणतो.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपला असलेला तीव्र विरोध आता मावळत चालल्याचे काँग्रेस व द्रविड पक्षांना दिसून आल्यामुळेच त्यांची बैचेनी वाढलेली दिसते. उत्तरेतील एकेकाळच्या ज्या मागास राज्यांमध्ये भाजप सत्तेवर आला, त्या राज्यांची स्थिती आमूलाग्र बदलते आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकेकाळी कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला होता आणि तेथे विकास भकास झाला होता. पण, भाजपची सत्ता येताच उत्तर प्रदेशचा कायापालट झाला असून, त्याच्या अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली आहे. त्या राज्यातील माफिया व गुंडांचे कंबरडे मोडले असून, औद्योगिक विकासाने वेग पकडला आहे. अशीच स्थिती मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान यांसारख्या राज्यांची. केंद्रात भाजप सत्तेत असल्याचा लाभ या राज्यांनाही होत आहे. असे असताना आपणच का मागे राहावे, असा विचार दक्षिणेकडील राज्यांतील मतदार करू लागले आहेत. या राज्यांमध्ये भाजपच्या मतदानाच्या टक्केवारीत होणारी वाढ हे त्याचेच द्योतक. यामुळेच द्रमुक आणि काँग्रेस यांसारख्या पक्षांमध्ये आता घबराट पसरली आहे. आजवर ‌‘द्रविड‌’ संस्कृतीचे, अस्मितेचे टोकाचे राजकारण करून या पक्षांनी सत्ता मिळविली असली, तरी अस्मितेच्या दिव्यातील तेल आता संपत आले आहे. सांगण्यासारखे काही कार्य न केल्यामुळे द्रमुक आणि काँग्रेसचे नेते आता ‌‘फेक नॅरेटिव्ह‌’ आणि भावनिक राजकारणावर भिस्त ठेवत आहेत.

‌‘वेताळ पंचविशी‌’मध्ये राजा विक्रमादित्य आपल्या पाठीवर कलेवर घेऊन फिरत असतो. त्या कलेवरातील वेताळ त्याला त्याचे कार्य करण्यात अडचणी आणत असतो. त्याचप्रमाणे तामिळनाडूच्या राजकारणात आपल्या पाठीवर बसलेल्या काँग्रेसच्या कलेवरातील द्रमुक या वेताळाला मतदारांनी आता खाली फेकून देण्याची वेळ आलेली आहे. कारण, कसलाही लाभ न देणारे काँग्रेसचे हे ओझे आता तामिळ मतदारांसाठी जड झाले आहे, हेच खरे!